nehal thakur - music industry: गायन क्षेत्रात चिमुकल्या नेहल ठाकुरची गगनभरारी; संगीत क्षेत्रातील दिग्गजानी केले कौतुक

                 nehal thakur




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: श्री गणेशाची अनेक ख्यातनाम गायकांनी भजने व भक्ति गीते गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले आहे. याच पंक्तीत आता अकोल्याची नेहल विकल्प ठाकुर ही चिमुकली विराजमान झाली आहे. आपल्या जादुई आवाजाने तिने दिग्गज गायकांनाही  चकित केले. एवढेच नव्हेतर ख्यातनाम म्युझिक कंपनीला देखील तिने आपल्या आवाजाची दखल घेण्यास भाग पाडले. अल्प वयातच नेहल हिने गायन क्षेत्रात गगन भरारी घेत कलेवर वयाची मक्तेदारी नसते हेच सिध्द केले आहे.




म्युझिक कंपनीने घेतली दखल


दहा वर्षीय नेहल ही स्कुल ऑफ स्कॉलर मध्ये इयत्ता तिसरीत शिकते. घरात संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आज नेहलने लहान वयातच जगभर गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.मोठमोठ्या म्युझिक कंपनीने तिच्या कडून गाणे गावून घेतले आहे. या गोड गळ्याच्या गायिकेचे ख्यातनाम संगीत निर्माण कंपनी टी सीरिज ने "माय फ्रेंड गणेशा" हे भक्ती गीत निर्माण करून तिच्या जादुई आवाजास लोकमान्यता मिळवून दिली आहे. इतकेच नव्हे तर शेमारु या तितक्याच मोठ्या संगीत निर्माण कंपनीने नेहलचे "बाप्पा मोरया" या श्री गणेशाची महिमा असणाऱ्या गीताची निर्मिती केली. 


गणेशोत्सवात गाण्याची धूम 

यंदाच्या गणेशोत्सवात या दोन्ही गाण्याची धूम होती. घरोघरी हे दोन्ही गाणे सकाळ संध्याकाळ आरती वेळेसही लावल्या गेले. इतकंच नव्हेतर अनेकांनी या गाण्याची मोबाइल रिंगटोन ठेवली. समाज माध्यमात सुद्धा दोन्ही गाणे चांगलेच व्हायरल झाले. कुणी स्टोरी तर कुणी रील साठी हे गाणे वापरले. एकंदरीत नेहलने गीत  गायन क्षेत्रात  लहानवयातच नवा किर्तीमान स्थापित केला आहे.



कौतूकाची थाप

श्री अनुप जलोटा यांच्या सोबत नेहल 


मुंबईत या गीतांच्या रेकॉर्डिंग प्रसंगी पार्श्वगायन क्षेत्रातील दिग्गज म्हटले जाणारे पार्श्वगायक सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, अनुप जलोटा, अनु मलिक आदींनी तिच्या गोड स्वरांना दाद देत तिला सफल पार्श्वगायिका बनण्याचा आशीर्वाद प्रदान करून तिला कौतुकाची थापही दिली. 



गायन कोकिळा पुरस्कार


नेहलचे आजोबा माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ समाजसेवी वशिष्ठ नारायणसिंह ठाकुर व आई सौ.सुरभी ठाकुर यांच्या सततच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने अगदी लहानपणापासूनच नेहलने गायन क्षेत्रात रुची निर्माण करीत ख्यातनाम गायक राम पांडे व संगीतकार युवक आदित्य पांडे यांच्या तालमीत गायनाचे धडे घेत गायनाचे विविध प्रकार आत्मसात केलेत.तिच्या अश्या गुणामुळे तिला अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने 'गायन कोकिळा' या बालवयातच पुरस्कार मिळून तिचे समाजातही कौतुक झाले.तिच्या या 'जादुई" गोड गळ्याची कीर्ती संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीत निर्माण करणाऱ्या कंपन्यात पोहचून तिला 'माय फ्रेंड गणेशा" व अन्य गीत निर्मितीचे आमंत्रण मिळाले. आपले संपूर्ण कसब पणाला लावून तिने हे गीत रेकॉर्ड करीत पार्श्वगायन क्षेत्रात अल्पवयातच पदार्पण केले. ख्यातनाम संगीत दिग्दर्शक संजयराज गौरीशंकर यांचे संगीत व राम पांडे यांचे गीत तिला मिळून एक उत्कृष्ट अजरामर कलाकृती निर्माण करीत तिने सर्वांची वाहवा मिळवली. 



प्रादेशिक चित्रपटात गायनाच्या संधीचा प्रस्ताव



भक्तिगीता व्यतिरिक्त इतर गायनात ही तिचे प्राविण्य असून वेगवेगळ्या प्रकारचे गीत अगदी या बालवयात ती सुरेख गात असते. तिचे समाज माध्यमावरील युट्युबवर "नेहल ठाकुर रायझिंग स्टार' हे स्वतःचे बाल चैनल असून यातील "मेरी माँ के बराबर के बराबर कोई नही" हे तिचे आईला समर्पित केलेले व्हिडीओ गीत लोकप्रिय ठरले आहे. तिला आता अनेक प्रादेशिक चित्रपटातही गायनाच्या संधीचा प्रस्ताव आला असून आपणास भविष्यात एक सफल पार्श्वगायिका बनण्याचा मनोदय तिने व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम संगीत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तिची दखल घेतल्यामुळे गायन क्षेत्रातील तिची ही गगन भरारी मैलाचा एक मोठा टप्पा ठरत असून तिची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा