Mahatma Gandhi-ncp-minority: महापुरूषा विषयी अनुद्गाराची बाब राष्ट्रासाठी घातक-शब्बीर विद्रोही यांचे मत

 



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: राष्ट्रात महात्मा गांधी विषयी अनुद्गार काढण्यात आले आहेत. राष्ट्रात महापुरुषांविषयी अनुद्गार काढण्याचा परिपाठ नित्यनेमाने होत आहे. यामुळे संविधान व देशाची मूल्ये पायदळी तुडवून समाजात विकृत व बकालपणा निर्माण होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही यांनी केले. बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महापुरुषाविषयी अनुद्गार काढणाऱ्या बाबीवर चिंता व्यक्त केली.



समाजातील विशिष्ट वर्गात आता 'सत्यमेव जयते' ऐवजी 'शस्त्रमेव जयते' असा विचार दृढ होत आहे. गांधीजींच्या विचारांचे अवमुल्यन होत आहे. देशात तीन महापुरुष असून यामध्ये महात्मा गांधी,नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अग्रणी आहेत. आता गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढले गेले आहेत, उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल व परवा सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल अनुद्गार काढतील. असे प्रकार राष्ट्रासाठी अत्यंत घातक सिद्ध होणार आहेत. अशा विकृतींना आळा घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. राष्ट्र हे एकतेचे व सामंजस्याचे आहे. अशात राष्ट्रात सद्भावाचा संदेश जाणे फार महत्त्वाचे असल्याचे शब्बीर विद्रोही यांनी यावेळी स्पष्ट केले. 



देशात व समाजात एकतेचे व सद्भावाचे बीज रुजवा. संविधान व देशाच्या मूल्यांचे संगोपन करा तरच हा देश व देशातील जनता एकोप्याने राहून निकोप विचार समाजात दृढ होणार आहेत. धर्म संसदेत अधर्माची भाषा वापरली गेली. धर्म हा स्नेह, ममता, समतेला निर्माण करून विकृतीला संपवितो. ज्या व्यासपीठावरून धर्माची गोष्ट व्हायला होती. त्या व्यासपीठावरून अधर्माची गोष्ट ही राष्ट्रात मान्य नसल्याचे विद्रोही म्हणाले. 



केंद्रातील सत्ताधारी वर्गाच्या विरोधात बोललात तर कठोर कारवाई होते.  देश सहिष्णुतावादी देश असून या देशात सर्व जातीधर्माच्या लोकांना एकोप्याने व आनंदाने राहता यावे याचा विचार करण्याची वेळ आता आली असून यासाठी सातत्याने एकोपा निर्माण करण्यासाठी जातीयतेला थारा न देता व विकृत व बेताल वक्तव्ये करणाऱ्यांना आळा घालून या देशात सद्भाव निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव जावेद जकारिया उपस्थित होते.

टिप्पण्या