Wine-Festival-Akola-February: दारू दुकाने व बारवरील ‘वाईन’ अक्षरे हटविण्यास ‘लिकर्स असोसिएशन’ तत्त्वता राजी; प्रकाश पोहरे यांच्याशी झाली चर्चा, फेब्रुवारीला अकोल्यात वाईन फेस्टिव्हल

Liquor Association agrees to remove 'wine' letters from liquor shops and bars; discussions with Prakash Pohare Wine Festival in Akola in February





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : फळांचा शुद्ध केलेला बाटलीबंद उत्कृष्ट रस म्हणजे ‘वाईन’ होय. त्यामुळे ‘वाईन शॉप’ ऐवजी ‘लिकर शॉप’ किंवा वाईन बार ऐवजी ‘लिकर बार’ असे नामानिधान करण्याची मागणी ‘किसान ब्रिगेड’चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी शासनाला केली आहे. यासंदर्भात 20 व 21 डिसेंबरला ‘ महाराष्ट्र लिकर्स असोसिएशनचे अध्यक्षा सोबत झालेल्या चर्चेनंतर पोहरे यांच्या आवाहनाला मद्यविक्रेत्यांनी तत्त्वता सहमती दर्शविली.यामुळे 25 डिसेंबर रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.तसेच वाईन संदर्भात जनजागृती करण्यसाठी आणि गैरसमज दूर करण्यसाठी अकोल्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाईन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी सांगितले.


निशांत सभागृह येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश पोहरे बोलत होते. यावेळी अकोला वाईन क्लबचे अध्यक्ष राजा घुमन उपस्थित होते. प्रस्तावना शौकतअली मिरसाहेब यांनी केली.

      


‘वाईन’ला अबकारी खात्याऐवजी कृषी प्रक्रिया उत्पादनाचा दर्जा द्यावा


मुख्यत्वे दारू विकणाऱ्या दुकानांना सर्रास वाईन शॉप असे नाव दिल्या मुळे वाईन संदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत, त्यामुळे वाईन शॉपला लिकर शॉप असे नाव देण्यात यावे तसेच  ‘वाईन’ला अबकारी खात्याऐवजी कृषी प्रक्रिया उत्पादनाचा दर्जा द्यावा, अशी ठोस मागणी ‘किसान ब्रिगेड’चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी गेल्या काही वर्षांपासून लावून धरली होती. यासंदर्भामध्ये त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन प्रस्तुत मागणीचे निवेदन सादर केले होते.  दारूच्या दुकानावरील ‘वाईन’ ही अक्षरे हटवून ‘लिकर’ शब्द लिहावा असे आवाहनही पोहरे यांनी ‘लिकर्स असोसिएशन’ला  केले होते. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी 16 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन केला आणि ‘किसान ब्रिगेड’ची मागणी त्वरित मान्य न झाल्यास दारू दुकानावरील ‘वाईन’ या नावावर काळा रंग मारण्याचे आंदोलन 25 डिसेंबर 2021पासून छेडण्यात येईल, असा इशारा पोहरे यांनी दिला होता. 

      


प्रदीप लुल्ला यांच्याशी ऑनलाईन चर्चा


दरम्यानच्या काळात 21 डिसेंबर रोजी ‘महाराष्ट्र लिकर्स असोसिएशनचे प्रांताध्यक्ष प्रदीप लुल्ला, पुणे यांचे सोबत सामंजस्याने झालेल्या ऑनलाइन चर्चेतून ‘वाईन’ ऐवजी ‘लिकर’ शब्द लिहिण्यास  तत्त्वता आमची हरकत नसल्याचे त्यांनी प्राथमिक दृष्ट्या व तत्त्वता मान्य केले. असे लिहिल्याने आमच्या व्यावसायिक विक्रीवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या करिता लवकरच असोसिएशनचे पदाधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 



शासनानेच परिपत्रक काढल्यास सर्वव्यापी तोडगा निघेल


       

बैठकीत निर्णय झाल्यानंतर अबकारी खात्याला त्या नुसार अर्ज देऊन दुकानाचे नाव बदलून मागण्यात येईल किंवा मग त्यानुसार शासनानेच परिपत्रक काढल्यास सर्वव्यापी तोडगा निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेमुळे 25 तारखेला दारू दुकानावरील वाईन या अक्षरावर काळा रंग मारण्याचे आंदोलनामुळे निर्माण होणारा संघर्ष, कटुता व पर्यायाने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती तूर्तास टळली आहे. 




    

‘वाईन बार’च्या नावाने दिलेले ‘परमिट’ हे ‘लिकर’ च्या नावाने बदलवून द्यावे

 

भारतीय समाजात दारूला प्रतिष्ठा नसल्यामुळे ब्रिटिश काळात दारूची दुकाने लावण्याकरिता व दारू विक्रीसाठी ‘वाईन शॉपी’ नावाने शक्कल लढविण्यात आली. ती दुकाने स्वतंत्र भारतातही सुरू आहेत. त्या दुकानांचा व्यवहार राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत चालविला जातो. त्यामुळे शासनाने मद्यविक्रेत्यांचे ‘वाईन शॉपी’ किंवा ‘वाईन बार’च्या नावाने दिलेले ‘परमिट’ हे ‘लिकर’ च्या नावाने बदलवून देण्यात यावे, अशी मागणी पोहरे यांनी केली आहे. 



    

25 डिसेंबरचे संभाव्य आंदोलन तात्पुरते स्थगित


लवकरच वाईन शॉप असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप लुल्ला व पदाधिकारी, भारतीय वाईन उत्पादक असोसिएशनचे ( IWMA) अध्यक्ष जगदिशजी होळकर, नासिक व पदाधिकारी , किसान ब्रिगडचे पदाधिकाऱ्यांसह प्रकाश पोहरे हे उत्पादन शुल्क मंत्री  अजित दादा पवार यांची भेट घेऊन या संदर्भात भूमिका मांडणार आहेत. 25 डिसेंबर चे संभाव्य आंदोलन त्यामुळे तात्पुरते स्थगित करण्याचे पोहरे यांनी मान्य केले आहे. 




    

वाईन’ ऐवजी ‘लिकर’ ची विक्री!


प्रत्यक्षात आपल्या देशात ‘वाईन शॉप’मधून ‘वाईन’ऐवजी बहुतांश ‘लिकर’ म्हणजे दारूचीच विक्री करण्यात येते. दारू दुकानांमधून झालेल्या वाईन व लिकरच्या विक्री वरून नजर  टाकली तरी ही बाब स्पष्ट होते. मात्र दारू दुकानांना वाईन शॉप नाव दिल्यामुळे  ‘वाईन’बाबत समाजात गैरसमज निर्माण झाले आहेत. भारतात ‘वाईन’ हे पेय राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत असल्याने त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांवर अनेक बंधने आलेली आहेत. वाईन’ विक्रीवरील जाचक अटी आणि गैरसमजामुळे या फळआधारित उद्योगात शेतकरी प्रवेश करण्यास घाबरतात. त्यातून या कृषिआधारित उद्योगाच्या विकासाचा संकोच झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची याची फळे वाया जातात आणि शेतकरी तोट्यात येऊन आत्महत्या करीत आहेत.  




       

वाईन’ला कृषी उत्पादनाचा दर्जा द्यावा


हे चित्र लक्षात घेता ‘वाईन’ला कृषी उत्पादनाचा दर्जा द्यावा. तसेच विविध सवलती, तांत्रिक ज्ञान आणि अनुदाने देऊन ‘वाईन’ उद्योग भरभराटीला आणावा अशी मागणी ‘किसान ब्रिगेड’ने दोन वर्षांपूर्वीच केली आहे. 



कर्नाटक, गोवा, केरळ राज्यात घरोघरी वाईन उत्पादन

    

कर्नाटक, गोवा, केरळ याराज्यात वाईन संदर्भात तेथील राज्यसरकारची भूमिका स्पष्ट असल्यामुळे या राज्यात शेतकरी घरोघरी वाईन उत्पादन करतात. 

कर्नाटक मधील कुर्ग ह्या जिल्ह्यात घरोघरी सुग्रण गृहिणी विविध फळांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 150 प्रकारच्या वाईन बनवतात, ज्यात द्राक्ष, जांभूळ, डाळिंब, पेरू, गाजर, काकडी, मुळा, बीट रूट, शुगर बिट, रत्नाळी, केळी, संत्रा, मोसंबी,  चिकू, सीताफळ, महुवा, टोमॅटो, सफरचंद, अंगुर, किवी, आंबा, मिरची, स्ट्रॉबेरी, लिची,फणस, कोकम, ड्रॅगन फ्रुट, चेरी, विविध प्रकारच्या बेरी, अंजीर, उसाचा रस, टरबूज, खरबूज, पपई व इतर बहुतांश पिकल्यावर गोडवा आलेल्या सर्व फळांच्या व कंदमुळांच्या वाईनचा समावेश होतो. त्यामुळे कुर्गला "वाईन डिस्ट्रिक्ट" ही ओळख प्राप्त झाली आहे. जगात तर बहुतांश देशात या संदर्भात अतिशय व्यापक, शेतकरी हितैशी व आरोग्यवर्धक भूमिका आहे आणि अजिबात गैरसमज नाहीत. 

     


अकोल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाइन फेस्टिव्हल


नागपूरला नुकताच 4 व 5  जानेवारी रोजी 8 वा वाईन फेस्टिव्हल पार पडला होता, त्याला समाजातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित वर्गातील अनेक  कुटुंबीयांनी भरभरून प्रतिसाद दिला होता या वरून वाईन संदर्भातील गैरसमज हळूहळू दूर होत असल्याचे हे सूचिन्ह असल्याचे पोहरे म्हणाले. 




त्यामुळे वाइन बद्दल  भारतीय समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्याकरिता लवकरच  राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्थानिक वाईन क्लब व किसान ब्रिगेडतर्फे वाइन फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे.

  


अकोल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाइन फेस्टिव्हलचे आयोजन करण्याचे अकोला वाइन क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ घुमन यांनी जाहीर केले आहे.

टिप्पण्या