Short-film-festival-Akola:महाराष्ट्र: ड‌ॅडी देशमुख स्मृती लघु चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मांदियाळी- प्रा. तुकाराम बिडकर



*सांस्कृतिक भवन पूर्णत्वास यावे-प्रा खड्डक्कर    



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : ड‌ॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव आयोजन समितीच्या वतीने २७ डिसेंबर  सोमवार रोजी, स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृह, अकोला येथे सायंकाळी ५ वाजता लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या एकदिवसीय महोत्सवात अनेक ख्यातनाम चित्रपट निर्मात्यांचे लघुचित्रपटांची मेजवानी अकोलेकर रसीकांना लाभणार असल्याची माहीती आयोजन समितीचे प्रा तुकाराम बिडकर, प्रशांत देशमुख, प्रा. सदाशिव शेळके, राजेश देशमुख, पंकज देशमुख, डॉ संजय खडक्कार, प्रा मधु जाधव यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. 





           

विदर्भाच्या कलाक्षेत्रात अष्टपैलु कर्तुत्व गाजविणारे विदर्भ चित्रपट पंढरीचे चित्रपटमहर्षी ड‌ॅडी देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या राज्यस्तरीय लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन २७ डिसेंबररोजी सायंकाळी ५ वाजता माजी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते व माजी मंत्री  खान मोहम्मद अजहर हुसैन यांचे अध्यक्षतेत होईल. याप्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, अभिनेता गणेश देशमुख, डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक संजय आखाडे आदींची मुख्य उपस्थिती राहील. 



        

कार्यक्रम दरम्यान कला क्षेत्रात आयुष्यभर निस्वार्थी व निगर्वी वृत्तीने भरीव कामगीरी करणारे शाहिर वसंतराव मानवटकर यांना "जीवनगौरव" पुरस्काराने आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचे हस्ते सन्मानीत केले जाईल. तसेच अकोला येथील चित्रपट निर्माते प्रशांत मानकर, "खिसा" सिनेमातील बालकलावंत वेदांत क्षीरसागर आणि सा.. रे.. ग.. म.. प... फेम बाल गायिका श्रृती भांडेचा सत्कारही यावेळी अतिथींच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहीती प्रा बिडकरांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना दिली. 



उदघाटन नंतर लगेच विविध भाषेतील दहा उत्कृष्ट चित्रपट पडद्यावर प्रदर्शीत करण्यात येतील असेही प्रा बिडकरांनी सांगीतले. या महोत्सव मध्ये जवळपास 120 चित्रपटांचा सहभाग असून, यात इतर राज्य व विदेशातुनही प्रवेशिका आलेल्या आहेत. त्यातील विविध विषयांवरील 10 उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यात आली असून, हे चित्रपट मोहत्सवात पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तहान,फर्स्ट वेडिंग, इट्स फेअर, दिशा शक्ती, स्पीक अप, स्लोगन, उपमा,जादूगार, क्षण असे विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत.याशिवाय ड‌ॅडी देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खिसा चित्रपट यावेळी दाखविण्यात येणार असल्याचे प्रा.बिडकर यांनी सांगितले.

             


कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामधे स्पर्धेत पात्र ठरलेल्या लघुचित्रपटांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल,सदर बक्षीस वितरण समारोह  महापौर अर्चनाताई मसने ह्यांचे शुभहस्ते व लघुचिपट महोत्सवाचे परिक्षक  दिग्दर्शक विराग जाखड, संजय शर्मा, वैशाली केंधळे यांच्या उपस्थितीत संपन्न होईल,अशीही माहीती याप्रसंगी प्रा बिडकरांनी दिली. 

             


लघुचित्रपट महोत्सवाचा लाभ अकोलेकर चित्रपट रसीकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहनही यावेळी स्व ड‌ॅडी देशमुख स्मृति लघु चित्रपट महोत्सव आयोजन समितीच्या वतीने प्रा तुकाराम बिडकर यांनी केले. 

         


पत्रकार परिषदेस स्वागत समिती, मार्गदर्शक समिती, व्यवस्थापन समिती, परीक्षण समिती, कार्यक्रम समिती सदस्यांसह प्रसिध्दी समितीचे प्रा अशोक भराड, डॉ प्रभाकर मोहे यांची उपस्थिती होती.



सांस्कृतिक भवन पूर्णत्वास यावे


अकोल्यात व्यवसायिक तसेच हौशी नाटकं सादर करण्यासाठी एकमेव प्रमिलाताई ओक हॉल आहे.मात्र,काही दिवसांनंतर हा हॉल नाटक सादर करण्यास उपलब्द नसणार.या करिता सांस्कृतिक भवनाचे काम शासनाने त्वरित पूर्णत्वास न्यावे,अशी मागणी यावेळी प्रा.संजय खड्डक्कार यांनी केली. तर पालकमंत्री बच्चू कडू यांनी याकडे लक्ष देऊन मागीलवर्षीच्या महोत्सव प्रसंगी दिलेल्या वचनाची पूर्ती करावी. पालकमंत्री कडू यांनी पुढील वर्षी हा लघु चित्रपट महोत्सवात सांस्कृतिक भवनात होईल,अशी ग्वाही दिली होती, अशी आठवण याप्रसंगी प्रा. मधू जाधव यांनी काढली. 

टिप्पण्या