Omicron-Akola:आढावा बैठक: 95 हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन; तर विदेशातून आलेल्या त्या 74 जणांचा तपास पोलीसांकरवी होणार

                                     file image



अकोला: जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आतापर्यंत आढळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासनही सतर्क असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुसऱ्या डोसचे लसीकरणाची गती वाढवणे तसेच येत्या सोमवार (दि.३ जानेवारी) पासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. जिल्ह्यात या वयोगटातील ९५ हजार लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.





जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस 


जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटणकर, डॉ. मनिषा ठग तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.


            

ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात कोविड चाचण्या पूर्वक्षमतेने करण्यात याव्या. त्यासाठी ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक रुग्णालये येथे चाचणी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे,त्यानुसार सर्व सज्जता असल्याचे नियोजन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात संभाव्य लाट आल्यास करावयाचे रुग्ण उपचाराचे व्यवस्थापन, आवश्यकता भासल्यास  ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, अतिदक्षता विभाग सुविधा याबाबत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.




जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्या बाबत होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. 


येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील (२००७ पूर्वी जन्मलेले) विद्यार्थी, मुला मुलींचे लसीकरण करण्यासाठी करावयाच्या नियोजनाचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार, जिल्ह्यात ग्रामिण भागात ६० हजार तर शहरी भागात  ३५ हजार असे एकूण ९५ हजार  लाभार्थी असतील. तथापि जिल्ह्यात बाहेरगावचे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले असतात, त्यामुळे यापेक्षा अधिक म्हणजेच एक लक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.  


ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात ३९५ व्यक्ती विदेशातून आले आहेत. त्यापैकी  ७४ जण अद्यापही संपर्कात आलेले नसल्याने त्यांचा तपास पोलीसांकरवी करावा,असे निर्देश देण्यात आले.



टिप्पण्या