Marathi sahitya sammelan:MH: ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात:‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्यगाथा जगासमोर पोहचणार – सुभाष देसाई




नाशिक : मराठी भाषा विभागाच्यावतीने ‘अभिजात मराठी दालन' उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे याची माहिती व ‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा या दालनाच्या माध्यमातून जगासमोर पोहचणार आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ‘अभिजात मराठी दालना’चे उद्घाटन प्रसंगी केले आहे.


मराठी भाषा मंत्री पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला अभिजात मराठी भाषा समजण्यास या दालनात मराठी भाषेच्या पुराव्याच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. संमेलनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अभिजात मराठी दालनास भेट देवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सहभागी होऊन मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी उभे रहावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सर्व मराठी बांधवांना केले आहे.


अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला जाणार आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, 19 व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा दोन हजारी वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासा दरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ. निवडक गाथा आदीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात ठेवण्यात आल्या असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.


मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राष्ट्रपतींना ‘पत्र’



केंद्र सरकारने 2004 साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. मराठी प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिध्द झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे. तरी कृपया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी विंनती यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. तसेच या दालनास भेट देणाऱ्या प्रत्येकाने या पत्रावर स्वाक्षरी करुन राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत विंनती करावी, असे आवाहनही यावेळी श्री. देसाई यांनी केले आहे.



ग्रंथ दिंडीने सुरुवात



कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.



यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गिता,

ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली.


साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.



टिप्पण्या