Mahatma Gandhi:kalicharan maharaj: कालीचरण महाराज यांचा अंतरिम जामीन अर्ज अकोला सेशन कोर्टाने फेटाळला



                                     file photo




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या धर्मसभेत अकोला येथील मूळ रहिवासी कालीचरण महाराज यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद देशभरात उमटत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जात आहे. कालीचरण महाराज यांना अटक व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातुन होत आहे. दरम्यान,आज अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कालीचरण महाराज यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 1 जानेवारी रोजी पुढील तारीख कोर्टाने दिली असून, यावर अंतिम युक्तीवाद होणार असल्याची माहिती ऍड.नजीब शेख यांनी दिली.




रायपूर (छत्तीसगड) येथे धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरून वादग्रस्त विधान केले होते. फिर्यादी प्रशांत गावंडे यांच्या तक्रारी वरून अकोल्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कालीचरण महाराज यांनी कोर्टात धाव घेवून अंतरिम जमानत अर्ज दाखल केला. आज या अर्जावर अकोला न्यायालय येथे सुनावणी झाली. न्या. शर्मा यांच्या समोर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. गावंडे यांची बाजू ऍड. नजीब शेख यांनी मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कालीचरण महाराज यांचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर केला. 



दरम्यान, सोमवारी अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिल्यानंतर अखेर साडे चार तासानंतर पोलिसांनी या अर्जाची दाखल घेऊन कालीचरण महाराजांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. 


कालीचरण महाराजांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून तत्काळ भारतीय दंड विधान कलम 153 अ,कलम 499, 500,295, 298,425,427 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी यांनी सुरुवातीला केली होती. 



विधानसभेत कालीचरण महाराजांवर कारवाईचा सूर उठला


दरम्यान, धर्म सभेत कालीचरण महाराजाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्यमंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. कालीचरण महाराज विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी नवाब मलिक यानी केली होती. 


महात्मा गांधीजींच्या विचारांचा सन्मान अवघ्या जगाने केला असून, 57 देशात महात्मा गांधीजींचे पुतळे उभारलेले आहेत. अशा अपमान करणाऱ्या वर कडक  कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी देखील आहे केली. संजय निरुपम यांनी सुध्दा कालीचरण महाराज यांच्यावर अटकेची कारवाई करावी,असे म्हंटले होते. सोमवारी संपूर्ण विधानसभेत कालीचरण महाराजांवर कारवाईचा सूर उठला होता. सरकारची बाजू मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले.विरोधी पक्षाने देखील समर्थन दिले,हे येथे उल्लेखनीय आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय खराब शब्द वापरणाऱ्या तसेच गांधीजींच्या मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या मुळचा अकोल्यातील असलेल्या कालीचरण नामक व्यक्तीवर कडक कारवाईची मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली होती.







 

टिप्पण्या