election 2021-legislative council: विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१: मतदान पथके साहित्यासह केंद्राकडे रवाना; प्रतिबंधात्मक आदेश जारी

Legislative Council Local Authority Constituency Election 2021: Polling squads left with literature;  Prohibition order issued




अकोला, दि.९: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि.१० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी नियुक्त मतदान कर्मचारी पथकांना मतदान केंद्रनिहाय साहित्याचे वाटप आज करण्यात आले व ही पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले.




दरम्यान या पथकांनी सुनियोजितपद्धतीने आपले नेमून दिलेले कामकाज करावे व मतदान प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी,असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक  तसेच निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिले.





 

आज सकाळी नऊ वाजेपासून नियोजन भवनातून मतदान साहित्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, डॉ. निलेश अपार, बाबासाहेब गाडवे तसेच सर्व मतदान कर्मचारी उपस्थित होते.





यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र निहाय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मतदान प्रक्रियेची उजळणी करुन सांगण्यात आली. त्यानंतर निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना किरकोळ दुर्लक्षामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य चुकांबाबत सांगितले. निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना आत्मविश्वास असावा, प्रत्येक प्रक्रिया ही काटेकोरपणे राबवावी. सर्व टप्पे बिनचुक पार पाडावे. साहित्याची, दिलेल्या मतपत्रिकांची आकडेवारीचा ताळमेळ जुळला पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक कर्मचाऱ्याने खबरदारी घ्यावी,असेही त्यांनी सांगितले.



 प्रतिबंधात्मक आदेश 



विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया अकोला-बुलडाणा- वाशिम मतदार संघासाठी राबविली जात आहे. ही प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निमा अरोरा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.


आदेशात नमूद केल्यानुसार,


१)ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून २०० मिटर परिसरात पक्षांचे मंडप,  दुकाने, मोबाईल फोन,  पेजर,  वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले अन्य इलेक्ट्रॉनिक  उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षांचे चिन्हांचे प्रदर्शन तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त  कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.


२) ज्या ठिकाणी निवडणूक साहित्य कक्ष (Strong Room) आहेत, तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आणि ज्या ठिकाणि मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी २०० मिटर परिसरात  प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.


३) तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.


हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण  होईपर्यंत  लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहेत.

टिप्पण्या