MIDC Police-Akola-Shivani-youth: शिवणी येथील खदानीत बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह आढळला

The body of a missing youth was finally found in a mine at Shivani







नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शिवणी येथील खदान मध्ये पोहण्यासाठी गेलेला युवक बुडल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. परिसरातील नागरिकांनी युवकास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र असफल राहिले. यानंतर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करुन युवकास शोधले. मात्र युवकाचा मृतदेहच हाती लागला. अखेर 30 फुट खोल पाणी असलेल्या खदानीतुन युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 




सविस्तर वृत्त असे की, 




शिवणी परिसरातील राहुल नगर  येथील ऋषी पंजाब लोखंडे (वय अंदाजे 18 वर्ष) या युवकाने आज दुपारी आंघोळीसाठी एमआयडीसी नं. 2 ला लागुन असलेल्या  खदानीत उडी घेतली असता, तो पाण्यात बेपत्ता झाल्याची माहीतीवरुन स्थानिक नागरिकांनी मृतदेह शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु 30 फुट खोल पाणी असल्याने काहीच मिळुन आले नाही. यामुळे शिवनी येथील प्रविण पातोळे आणि एम आय डी सी पो.स्टे.चे ठाणेदार विजय चव्हाण यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. 



दीपक सदाफळे हे लगेच आपल्या सहका-यांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे  यांच्या सहकार्याने  जिल्हाधिकारी कार्यालयातुन रेस्क्यु बोट घेऊन घटनास्थळी पोहचले, आणि सर्च ऑपरेशन चालु केले. जिवरक्षक  सदाफळे यांनी खदानीत चित्तथरारक अंडर वाॅटर बॅक डाईव्ह सर्चिंग केले असता, दोन तासात मृतदेह शोधुन बाहेर काढला. 



सर्व ऑपरेशनसाठी अकोला म.न.पा.ची अग्निशमन दलाची टीम विभाग प्रमुख मनिष कथले यांच्या नेतृत्वात अशोक प्रधान, उमेश भिरड, प्रकाश बनकर, राहुल वाकोडे, वाहन चालक गजानन दामोदर हे सहभागी होती. स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी एमआयडीसी पो.स्टे. ठाणेदार विजय चव्हाण आणि त्याचे सहकारी हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या