hunger strike-ravikant tupkar: राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीमुळे तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित;बुधवारी अजित पवार यांच्या सोबत होणार चर्चा

Ravikant Tupkar's hunger strike postponed due to Dr. Rajendra Shingne's mediation; discussion with Ajit Pawar on Wednesday





अन्नत्याग आंदोलनाला यश; शेतकर्‍यांच्या एकजुटीचा विजय-रविकांत तुपकर 






ॲड.नीलिमा शिंगणे-जगड 

अकोला: सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. दरम्यान तुपकर यांची तब्येत खालावली. आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्थी करत तुपकर यांची भेट घेवून रास्त मागण्या राज्य सरकार मान्य करणार असल्याबाबत आश्वस्त केलं. यामुळे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून, येत्या बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा होणार आहे.मात्र, यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.



पियुष गोयल यांनी केली राजू शेट्टी यांच्याशी चर्चा


केंद्र व राज्य सरकारने आता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देखील शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा केली व यानंतर सोयापेंड देशात आयात करणार नाही, याबाबत पुढील आठवड्यात आदेश करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. 




दिल्लीतील मंत्र्यांसोबत चर्चा करू-शरद पवार


जेष्ठ नेते शरद पवार यांनी सुध्दा सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्या तुपकर यांच्याकडून समजून घेतल्या व यासंदर्भात दिल्लीत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे. 



देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुपकर यांच्याशी फोन करून चौकशी करून, तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री व वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीचे  आश्वासन दिले.



सकारात्मक निर्णय घेणार;अजित पवार यांचे आश्वासन



राज्य सरकारसोबत आज बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्थी केल्याने, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  २४ नोव्हेंबर रोजी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २४ नोव्हेंबरला ही बैठक पार पडणार आहे व या बैठकीला संबंधित खात्याचे मंत्री व सचिव उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल,असे तुपकर यांनी सांगितले.




नागपूर येथून या आंदोलनाला सुरवात झाली होती. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी उशीरा रात्री पोलिसांनी तुपकर यांना अटक करून बुलडाणा येथे आणून सोडले होते.





टिप्पण्या