Deglur biloli by-election:Nanded: देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी: राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असताना जनतेने दिलेला हा कौल महत्त्वाचा -अशोक चव्हाण

Congress' Jitesh Antapurkar wins Deglur by-election (file photo)




नांदेड: देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला साथ दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी तर  ही निवडणूक प्रतिष्ठेचीच होती. महिन्याभरापासून अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्येच तळ ठोकून होते.



नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यासह इतर उमेदवार निवडणूक रिंगणात होते.



काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे तब्बल 41 हजार 933 मतांनी विजयी झाले आहेत.भाजपच्या सुभाष पिराजीराव साबणे यांना पराभवाचा सामना करावा लागला.काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. महिनाभर ते देगळूरला तळ ठोकून बसले होते. भाजपकडूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या.



राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असताना जनतेने दिलेला हा कौल महत्त्वाचा -अशोक चव्हाण


देगलूरच्या विजयाने महाविकास आघाडी व राज्य सरकार भक्कम नक्कीच झाले आहे. राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असताना जनतेने दिलेला हा कौल महत्त्वाचा आहे. देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालावरुन जनता भाजपच्या विरोधात आहे हे चित्र स्पष्ट आहे,अशी प्रतिक्रिया जेष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.देगलूर पोट निवडणूकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.



देगलूर पोटनिवडणुकीत मी विकासाचा अजेंडा मांडला, तर भाजपने वैयक्तिक टिकेवर भर दिला. परिणाम सर्वांसमोर आहे,असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले.


एमआयएम किंवा वंचितला मत देणं भाजपसाठी फायदेशीर ठरतं, याची मतदारांना जाणीव झाली आहे. या निवडणुकीत वंचितचा उमेदवार असणं भाजपच्याच रणनीतीचा भाग होता. पण लोकांनी ही रणनीती ओळखली,असे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.



काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी उमेदवारी देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय असो, राहुल गांधींची त्यामधील भूमिका असो, त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शरद पवार साहेब असोत, या सर्वांच्या आशीर्वादाने देगलूरला जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत,असे चव्हाण म्हणाले.


जितेश अंतापूरकरांना विजयी करून मतदारांनी स्व. आ. रावसाहेब अंतापूरकरांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे,अश्या भावना यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केल्या.


टिप्पण्या