Voting Akola Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections: अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात प्रारंभ; अनेक मतदारांची मतदार यादीतून नावे गहाळ,ऐनवेळी मतदारांची उडली तारांबळ

Voting for Akola Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections begins in earnest;  The names of many voters are missing from the voter list





ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदानाला अकोल्यात उत्साहात सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. मात्र बहुतांश ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांना आपली नावे मतदार यादीत दिसत नसल्याने गोंधळ उडाला आहे. तर काहींची नावे दुसऱ्याच केंद्राच्या यादीत गेल्याने या केंद्रातून त्या केंद्रात जाण्यासाठी अनेक मतदारांची ऐनवेळी तारांबळ उडालेली दिसत आहे.



       मतदार यादीचा गोंधळ 



अकोला जिल्ह्यातील पळसोबडे मतदान केंद्रावर अनेक मतदाराची नावे गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला. 50 च्यावर मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या चुकीच्या क्रमांकामूळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पळसोबडे हे गाव अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे गाव आहे,हे येथे उल्लेखनीय.



सकाळपासून मतदार हे आपले नाव मतदार यादीत शोधत आहे. मागील सर्वच निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांना मतदार यादीतील नावाच्या गोंधळामुळे त्यांच्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करता येत नसल्याने निराशा झाली आहे.




निवडणूक अधिकारीकडे तक्रार



जिल्हा परिषद गट कुरणखेड मधील मौजे पळसो बु येथील बऱ्याच मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाले आहेत. एका यादीतील नावे दुसऱ्या यादीत असा हा घोळ झाला आहे. येथे सहा मतदार यादी असून सकाळी सात ते सव्वा अकरा वाजेपर्यंत एकूण 45 मतदारांची नावे यादीत नसल्याचे निदर्शनात आले. तर काहींची नावे एका यादीतून दुसऱ्या केंद्राच्या यादीत गेले आहेत. यामुळे मतदारांची ऐनवेळी तारांबळ उडत आहे,  अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य(पळसो बु) प्रवीण साहेबराव इंगळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी (तहसिल कार्यालय अकोला) यांच्याकडे नोंदविली आहे. अशी अवस्था जवळपास सर्वच मतदान  केंद्रावर दिसून येत आहे.



तीन लाख ७१ हजार ६९० मतदार 



जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद निवडणुक विभाग व २८ पंचायत समिती गणात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज दि.५ रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून  या निवडणूकीत तीन लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.


४८८ मतदान केंद्र



जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात 488 मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आज मंगळवार  5 ऑक्टोंबर रोजी मतदान व उद्या बुधवार 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात 77, अकोट तालुक्यात 81, मुर्तिजापूर तालुक्यात 83, अकोला तालुक्यात 85, बाळापूर तालुक्यात 74, बार्शिटाकळी तालुक्यात 49 व पातूर तालुक्यात 39 असे एकूण 488 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.




मतमोजणी उद्या बुधवारी 


या निवडणूकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल.



मतमोजणीची ठिकाणे 


तेल्हारा येथे नवीन इमारत तहसिल कार्यालय, अकोट येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन, मुर्तिजापूर येथे शासकीय धान्य नवीन गोडाऊन, अकोला येथे शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम, बार्शीटाकळी येथे पंचायत समिती सभागृह तर पातुर येथे पंचायत समिती सभागृह, पातूर या ठिकाणी मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे.



निवडणूक प्रक्रियेसाठी २४२८ कर्मचारी तैनात


ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकुण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षणही पार पडले आहे. या शिवाय  पोलीस बंदोबस्तही सज्ज करण्यात आला आहे. निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यात तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला व बाळापूर येथे प्रत्येकी चार तर बार्शी टाकळी व पातुर येथे प्रत्येकी एक पथकांचा समावेश आहे.



कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश


निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. त्यानुसार शस्‍त्र परवानाधारकास शस्‍त्र वाहून नेण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे. तसेच ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे, त्‍या मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्‍या कामा‍व्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे. तसेच ज्‍या ठिकाणी निवडणूक साहित्‍य कक्ष (STRONG ROOM) आहेत, तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आणि ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू राहतील.



मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश


या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  संबंधित मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, तसेच कामानिमित्‍त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांना  निवडणुकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी मंगळवार 5 ऑक्‍टोबर रोजी भरपगारी सुट्टी देण्‍यात आली आहे. तसेच अपवादात्‍मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्‍यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल अशा मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्‍यात यावी,असे आवाहन सर्व खाजगी संस्‍था, व्‍यापारी संस्‍था, दुकाने व कारखानदार यांना करण्यात आले आहे. यामुळे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.




टिप्पण्या