Prabhakar Jog: Singing Violin: 'गाणारे व्हायोलिन' आता मूक झाले;जेष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

'Singing Violin' is now silent; Senior musician Prabhakar Jog passes away




मुंबई, दि. ३१ : ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतासोबत भावगीताच्या दुनियेतही त्यांनी मोठे योगदान दिले. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून कारकीर्द गाजविली. गदिमा आणि बाबूजींसोबत गीत रामायण मधील रचनाचे संगीत संयोजन केले. दादा कोंडके यांच्या 'आंधळा मारतो डोळा' चित्रपटाचे संगीत प्रभाकर जोग यांनी दिले. यामधील 'हिल हिल पोरी हिला' (hil hil pori hila) हे गाणं आजही लोकांच्या ओठी आहे. तर मंगलप्रसंगी या गाण्यावर आजची तरुणाई थिरकतात.



गाणारे व्हायोलिन आता मूक झाले


प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे.


गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. त्यांच्या व्हायोलिनचे  सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

टिप्पण्या