Permission to open temples and places of worship in Akola: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: अकोला जिल्ह्यातील मंदिरे व प्रार्थना स्थळे गुरुवार पासून उघडण्‍यास परवानगी; काय आहेत नियम व अटी जाणून घ्या…

District Collector's order: Permission to open temples and places of worship in Akola district on Thursday;  Learn what the terms and conditions are





अकोला, दि.2 : जिल्ह्यातील धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचे आरोग्‍य विभागाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यानुसार कोविड-19 चे प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे अवलंब करुन तसेच निश्चित करण्‍यात आलेल्‍या  मानक कार्यपध्‍दतीचा अवलंब करुन जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धार्मिक स्‍थळे, प्रार्थना व पूजास्‍थळे गुरुवार दि. ७ ऑक्‍टोंबर पासून उघडणाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.


या आदेशान्वये, 



धार्मिक स्थळे, पूजा व प्रार्थना स्थळे या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरीक येतात. कोविड संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अशा ठिकाणी  सामाजिक अंतर आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे गरजेचे राहील. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी विशिष्ट ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या विविष्ट उपाययोजना व्‍यतिरिक्त अवलंबल्या जाणाऱ्या विविध सामान्य सावधगिरीच्या उपायांचा उल्लेख केला आहे. प्रतिबंधात्‍मक क्षेत्रामध्‍ये  असलेली धार्मिक स्थळे, पूजा व प्रार्थना स्थळे ही बंद राहतील. केवळ प्रतिबंधात्‍मक क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे,  पूजा व प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी असेल.


सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना


वयाच्या 65 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, कोमार्बीड व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे. याकरीता धार्मिक संस्था यांनी सामान्य प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कोविडचा धोका कमी  करण्यासाठी  सार्वजनिक आरोग्य उपायांचा समावेश करुन या उपाययोजना सर्व सेवाधारी व भाविकभक्तांनी नेहमी अवलंब कराव्या. त्यात  सार्वजनिक ठिकाणी किमान सहा फुट अंतर ठेवणे आवश्यक, फेस कव्हर किंवा मास्‍कचा वापर करणे  अनिवार्य, साबणाने (किमान 40-60 सेकंदांसाठी) वारंवार हात धुवावे. जेथे शक्य असेल तेथे अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्स (कमीतकमी 20 सेकंद) चा वापर करावा, खोकलतांना किंवा शिंकतांना नाक व तोंड झाकण्‍यासाठी  टीशु पेपर, रुमाल, अथवा हाताच्‍या बाजुचा वापर करावा, आजाराची लक्षणे आढळल्‍यास तातडीने  हेल्‍पलाईनद्वारे आरोग्‍य यंत्रणेशी संपर्क साधावा, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्‍या आवारामध्‍ये थुंकण्यास सक्‍त मनाई राहील. आढळल्‍यास आवश्‍यक दंड आकारण्‍यात येईल, सर्व सेवाधारी  आणि येणाऱ्या भाविकभक्‍त यांनी आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा.


धार्मिक स्‍थळांच्‍या विश्‍वस्‍थांनी करावयाच्या उपाययोजना


1.प्रवेशद्वारावर  हात स्वच्छ करण्‍याकरिता सॅनिटायझर डिस्पेंसर व थर्मल स्क्रीनिंग ची सुविधा उपलब्‍ध  करावी.


2.ज्‍या व्यक्तींना कोविड-19 ची लक्षणे नाहीत अशा व्‍यक्‍तींना परवानगी देण्यात यावी.


3.मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींना प्रवेश  देण्‍यात यावा.


4.कोविड-19 चे अनुषंगाने प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्‍याचे दृष्‍टीने  सर्व पूजेच्‍या स्थानांमध्ये पोस्‍टर्स, भितीपत्रके, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपचा या साधनांचा  वापर  नियमितपणे करावा.


5.धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांमध्‍ये खेळती हवा राहण्‍याचे दृष्‍टीने  दर्शनाकरिता वेळेनुसार भक्‍तांची संख्‍या निश्चित करण्‍यात यावी. या करिता ट्रस्‍ट किंवा संस्‍था तसेच  स्‍थानिक प्राधिकरण यांनी आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍यात.


6.भाविकभक्‍तांनी आपली पादत्राने, शुज शक्‍यतोवर स्‍वतःच्‍या वाहनांमध्‍ये अथवा स्‍वतंत्र स्‍टॉलमध्‍ये ठेवावे.


7.पार्किंगच्या ठिकाणी आणि परिसराच्या बाहेर योग्य अंतरावर सामाजिक अंतर  नियमांचे पालन करावे.


8. आवाराच्‍या बाहेरील आणि परिसरातील दुकाने, स्टॉल्स, कॅफे इत्यादी व्‍यवसायीकांनी सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करावे.


9. दर्शनाकरिता असलेल्‍या रांगामध्‍ये सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्‍ट चिन्‍हांचा वापर करावा.


10. शक्‍यतोवर भाविकभक्‍तांसाठी येण्‍याकरिता व जाण्‍याकरिता स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करावी.


11. प्रवेशासाठी रांगा लावताना  किमान सहा फूट शारीरिक अंतर राहील याकरिता पूजास्थळाचे विश्‍वस्‍थ यांनी खबरदारी घ्‍यावी.


12. नागरीकांनी धार्मिक स्थळे, पूजा/ प्रार्थना स्थळांच्‍या आवारामध्‍ये  प्रवेश करण्यापूर्वी आपले हात पाय साबणाने व पाण्याने धुवावेत.


13. सामाजिक अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्‍यात यावी. वातानुकूलन किंवा वेंटिलेशनसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान आसन 24-30 डीग्री सेंटीग्रेटच्या श्रेणीत असले पाहिजे, सापेक्ष आर्द्रता 40-70 डीग्रीच्या दरम्‍यान असणे आवश्यक आहे. शक्‍य तितकी खेळती हवा राहील या बाबत नियोजन करावे.


14. पुतळे, पवित्र पुस्तके इत्यादिंना स्पर्श करता येणार नाही.


15. मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे धार्मीक कार्यक्रम किंवा सभा घेता येणार नाही.


16. कोविड-19 च्या संक्रमणाचा संभाव्‍य प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता,भक्ती संगीत, गाणी वाजविली जाऊ शकतात. गायक-गायिका किंवा गायन गटांना परवानगी राहणार नाही.


17. एकमेकांना अभिवादन करताना शारीरिक संपर्क टाळावा.


18. प्रार्थनेकरिता भक्तांनी स्वतःची प्रार्थना चटई किंवा कापडाचा वापर करावा.


19. धार्मिक स्थळाच्या आंत प्रसाद, वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडण्‍यास परवानगी राहणार नाही.


20. शौचालये, हात आणि पाय धुण्याचे ठिकाण, परिसरामध्ये प्रभावी स्वच्छता राखली जाईल, यावर विशेष लक्ष केन्‍द्रीत करावे.


21. धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाद्वारे वारंवार साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे.


22. धार्मिक स्‍थळाच्‍या परिसरातील तळजमीन वारंवार स्वच्छ  करावी.


23. भाविक  भक्‍तांनी किंवा कर्मचाऱ्यांनी वापरलेले मास्‍क,  ग्‍लोव्‍हजची योग्य विल्हेवाट लावावी.


24. धार्मिक स्‍थळामध्‍ये काम करणारे कर्मचारी, कामगार यांनी कोविड-19 चे सुरक्षाच्या अनुषंगाने कोविड-19 च्या नियमावलीनुसार आवश्‍यक ती कार्यवाही करावी. कामावर हजर होतांना व गर्दीच्‍या ठिकाणी काम करणारे कर्मचारी,  कामगार यांनी आठवडयातून एक वेळेस  कोविड-19 ची चाचणी करुन घ्‍यावी.


25.  शौचालय आणि खाण्याच्या ठिकाणी गर्दी टाळावी.


26.  सर्व धार्मिक स्‍थळांच्‍या ठिकाणची माहिती  संबंधीत पोलीस स्‍टेशन, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांना नियमित सादर करावी.


27. धार्मिक स्‍थळ, प्रार्थना व पुजा स्‍थळ या ठिकाणी संशयीत व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास करावयाच्‍या उपाययोजनांबाबत.


अ.आजारी असलेल्‍या व्‍यक्‍तीला विलगीकरणात ठेवण्‍यात यावे.


आ.  डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत मास्‍क, फेस कव्‍हरचा वापर करण्‍यात यावा.


इ. जवळच्या वैद्यकीय सुविधा (रुग्णालय किंवा क्लिनिक) त्वरित कळविण्‍यात यावे. अथवा राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईनवर संपर्क करावा.


ई. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे (जिल्हा आरआरटी​​/उपचार करणारे चिकित्सक) जोखीम मूल्यांकन केले जाईल. आणि प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍याचे दृष्‍टीने आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात यावी.


उ. बाधित व्‍यक्‍ती आढळलेल्‍या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे.


 


कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे तसेच प्रशासनाव्दारे निर्गमित केलेल्या आदेशाचे  उल्‍लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.  कोविड नियमांचे  उलंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक कारवाई  करण्‍याबाबतचे आदेश यापूढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक, महसूल विभाग तसेच  ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका व नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील.


हे आदेश गुरुवार दि. 7 ऑक्टोंबर 2021 पासून संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. या आदेशांचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आदेशात म्हटले आहे.  

टिप्पण्या