Illegal moneylenders:raids:Akola: अवैध सावकारी:अकोला शहरात एकाच वेळी सात ठिकाणी धाड: ज्वेलर्स व प्रोव्हिजन संचालकांच्या दुकान व घरातुन आक्षेपार्ह कागदपत्रे व रोख जप्त

Illegal moneylenders: Simultaneous raids at seven places in Akola city: Seizure of objectionable documents and cash from shops and houses of jewelers and provision directors





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : शहरातील ज्वेलर्स व प्रोव्हिजन संचालकासह अन्य अवैध सावकारांच्या दुकान व घरावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत धाड टाकली. पथकाने एकाच वेळी सात ठिकाणी छापेमारी करून खरेदी खत, इसार पावती, खरेदी करारनामे, कोरे आणि सही असलेली धनादेश असे आक्षेपार्ह कागदपत्र अवैध सावकारांकडून जप्त केली आहेत.




सात ठिकाणी धाड 



जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांच्या मार्गदर्शनातील पथकाने बुधवारी हे धाड सत्र राबविले. अवैध सावकारांच्या विरोधात शासनाच्या आदेशावरून विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेतंर्गत रणपिसे नगर मधील अशोक दंडगव्हाळ यांच्या आप्पास्वामी ज्वेलर्स व घरी आर. टी. पालेकर व वाय. पी. लोटे यांच्या पथकाने छापा टाकून १० पावती पुस्तक, सात कोरे धनादेश सहा लाख रुपये रोख रक्कम, ३७ पावत्या खरेदी खताच्या प्रती व एक पेनड्राइव्ह जप्त केला. 




आर. आर. विटणकर यांच्या पथकाने शिवणी येथील अवैध सावकार शेख मुस्ताफ शेख लतीफ यांच्या दुकान व घरावर धाड टाकून ५ खरेदीखत कोरे बॉन्ड ६२, कोरे धनादेश १७ यासह आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केले. 




व्ही एम वोराळे यांच्या पथकाने शिवणी मधीलच राजु गिरी या अवैध सावकाराच्या निवासस्थानी छापा टाकला असता खरेदी खत इसार पावती आणि खरेदी करारनाम्याची १८ कागदपत्रे सोबतच कोरे बॉण्डस् आणि ७४ धनादेश आणि कागदपत्रे व ४९ कोरे आणि सही केलेले धनादेश आढळून आले. 



पी आर लाड यांच्या विशेष पथकाने कौलखेड परिसरातील रिजनल वर्कशॉपच्या मागे राहत असलेले शंकरराव सोनाजी इंगोले यांच्या निवासस्थानी छापा टाकून ४ खरेदीखत ३ बॉन्डपेपर, धनादेश व इतर दस्तावेज जप्त केले. 




एस एस खान यांच्या विशेष पथकाने चांदखा प्लॉट येथील रहीवासी अब्दुल नइम अब्दुल रशीद यांच्या निवासस्थानी छापा टाकून ३४ खरेदीखत एक मुखत्यारपत्र, एक भागीदारी करारनामा असा मुद्देमाल जप्त केला. 



ज्योती मलिये यांच्या विशेष पथकाने गीतानगर मधील ओम प्रॉव्हिजनचे संचालक अक्षय चंद्रशेखर शर्मा यांच्या दुकानावर छापा टाकून १ खरेदीखत, दोन गहाणखत, १० पासबुक, २ मालमत्ता पत्रक व ३ रजीस्टर जप्त केले. १४ पंच समोर या कारवाई करण्यात आली.



या सर्व कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांच्या आदेशावरुन करण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या कागद पत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.





या विशेष धाड सत्रासाठी सहकार विभागाचे २४ अधिकारी व कर्मचारी. पोलीस विभागाचे २१ अधिकारी व कर्मचारी असा ताफा तयार केला होता. या सातही पथकाने एकाचवेळी सात ठिकाणी धाड टाकली, हे येथे उल्लेखनीय आहे.



टिप्पण्या