Convocation:PDKV:Agricultural:डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ :सामर्थ्यशील भारताच्या निर्माणात योगदान द्यावे-राज्यपाल कोश्यारी

Convocation of Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University: Contribute to building a strong India: Governor Koshyari




अकोला,दि.२९: नव्या व सामर्थ्यशील भारताचे निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर, संशोधकांनी योगदान द्यावे,अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारताला आता ह्या संशोधकांनी  दर्जेदार व अधिक पोषणमूल्य असणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्मिती करावी,असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती कृषि विदयापीठ मा. श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 



अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संकरीत पद्धतीने (प्रत्यक्ष तथा अभासी ) कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात अत्यंत शिस्तीत पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तथा कुलपती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मा. श्री.भगत सिंह कोश्यारी हे अभासी पद्धतीने उपस्थित होते, तर  महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे  उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू  डॉ. अशोक ढवण (अभासी पद्धतीने) यांचे सह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले, विदयापीठ कुलसचिव  डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम एल मदन (अभासी पद्धतीने), डॉ.शरदराव निंबाळकर,  डॉ. व्यंकटराव मायंदे (अभासी पद्धतीने), विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य तथा सदस्य  विधान परिषद आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी  तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्मानीय इतर सदस्य श्री मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, माजी कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश कंडारकर, श्री विनायक सरनाईक व मा.विद्यापीठ विद्या परिषद सदस्य आदी  मान्यवर उपस्थित होते.



३५५९ स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान



यावेळी उपस्थित मान्यवरांना  सन्मानाने दीक्षांत मिरवणुकी द्वारे पदवीदान सोहळ्यास पाचारण करण्यात आले.  कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिहं कोश्यारी यांच्या अनुमतीने पदवीदान सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रागीताने प्रारंभ झालेल्या या दीक्षांत समारंभात एकूण ३५५९ स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या, यामध्ये बी.एस्सी (कृषि) २४८९, उद्यान विद्या १८७, वन विद्या २८, कृषि जैव तंत्रज्ञान १११, कृषि व्यवसाय व्यवस्थापन ७०, बी. एस्सी. अन्नशास्त्र ८१,  बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) ८९, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) २१८, उद्यान विद्या ३१, वनविद्या ०२, कृषि अभियांत्रिकी ०७, एम. बी. ए (कृषि) १९, पीएच.डी २७ आदीचा समावेश आहे. उपरोक्त १२५८ स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात २४ आचार्य पदविधारक स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारली व उर्वरित १२३४ स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी स्वीकारतील. तर ३१ सुवर्ण, १६ रौप्यपदके, ३३ रोख तर तीन जणांना पुस्तकी स्वरुपात असे एकूण ८३ जणांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. २७ जणांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉपीची पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठांमधील शिक्षण त्याचा संशोधन कार्यामध्ये आपले उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षक तथा संशोधकांना विविध पदके तथा पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला.




कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविकपर भाषण करुन विद्यापीठाचा कार्य अहवाल सादर केला. त्यानंतर प्रति कुलपती श्री. दादाजी भुसे तथा इतर मान्यवरांचे शुभ हस्ते विधीवत पदवीदान व पारितोषिक वितरण पार पडले.



भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे  उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करतांना विद्यापीठाच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल कौतूक केले. विद्यार्थ्यांचे तसेच नव संशोधकांचेही त्यांनी कौतुक केले. आपले संशोधन हे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे व सुलभ असावे. तसेच संशोधनाच्या क्षेत्रात  आपल्या विद्यापीठांचे बहुमोल योगदान असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


आपल्या मार्गदर्शनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, १९६० च्या सुमारास आपला देश आयात अन्नधान्यावर अवलंबून होता. आज आपण अन्नधान्य उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण आहोत. याचे श्रेय कृषी संशोधक व शेतकऱ्यांना आहे. देशात हरित क्रांती झाली. नंतर श्वेत क्रांती झाली आता आपले पंतप्रधान नील क्रांती करण्याची धोरणे आखत आहेत. आपल्या देशात अन्नधान्य उत्पादन विपुल होत असले तरी ते पोषणमूल्याने परिपूर्ण असावे यासाठी अधिक संशोधन व्हावे. आपली कृषी उत्पादने अधिक दर्जेदार असावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, नवा व समर्थ भारत घडविण्यासाठी संशोधकांनी ,युवक युवतींनी पुढे यावे, सुंदर भारत व सुंदर विदर्भ हेच युवक घडवू शकतात, अशा शब्दात त्यांनी युवा शक्तीवर आपला विश्वास व्यक्त केला. 




देवेंद्र काळे सन्मानित



देवेंद्र नरेंद्र काळे सहायक शाखाधिकारी यांना डॉ पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ अकोला येथील 35 व्या दीक्षांत समारंभ मध्ये उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार  कृषी मंत्री दादाजी भुसे व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम.  भाले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.



टिप्पण्या