Akola news letter:Eid-e-Milad: मार्गदर्शक सूचना जारी:ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा;जिल्हाधिकारी यांचे आदेश

                                      file photo




अकोला,दि.18: कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेवून या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस मंगळवार/बुधवार दि. 19 किंवा 20 रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) साध्या पध्दतीने व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.  


मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :


कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रकनुसार ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे.


शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद-ए-मिलाद शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. 

तथापि मिरवणूका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणूकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच इसमांस परवानगी अनुज्ञेय राहील. 


मिरवणूकादरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.

मिरवणूकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनी प्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.


मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधीत महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. 


पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहीत नियमांचे पालन करावे.



सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे.


प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टि.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.


ई-ए-मिलाद निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील लावण्यात येतात. सबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील च्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.

कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत.या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.


या सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाला असतील.


कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.


                       *****

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण


अकोला: कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण होण आवश्यक आहे. याकरीता सर्व यंत्रणेनी प्रयत्न करुन लसीकरणाचा वेग वाढवा. लसीकरण वाढविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील स्वस्त राशन केंद्रावरुन लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य वितरीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले.


जिल्ह्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत  आज आढावा घेण्यात आला. याबैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता व बाल विकास अधिकारी डॉ. मनिष शर्मा, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी अस्मिता पाठक, तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसिलदार, प्राथमिक आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.


आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले की, लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा, अंगणवाडी व शिक्षकाच्या माध्यमातून लसीकरण मोहिम वेगाने वाढवावी. याकरीता शिक्षकांनी जी मुले शाळेत येतात यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत खात्री करावी, 18 वर्षे वयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावे. आशा व अंगणवाडी सेविका ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटी दिल्याचे त्या त्या गावातील सरपंचाकडून खात्री करावी. ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे व लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी व त्यांचे पात्र गटातील कुटुंब सदस्य यांचे लसीकरण झाल्याबाबत खातरजमा करा. ग्रामीण व शहरी भागातील दुकाने, उद्योग इ. ठिकाणी लसीकरणाबाबत पाठपुरावा करा. नोडल अधिकारी यांनी तालुकास्तरावर थेटी देवून लसीकरणाबाबत आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.


यावेळी संजय खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविणे हे तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत आहेत. तालुका पातळीवर लसीकरणाचे नियोजन करुन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आढावा घ्यावा.


                      ******


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन




अकोला,दि.18: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात येत आहे. कर्जमुक्ती होण्याकरीता विशिष्ट क्रमांक प्राप्त लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही अशा खाताधारक शेतकऱ्यांकरीता    दि. 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.


योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचेमार्फत 1 लक्ष 16 हजार 544 कर्जखाती पोर्टलवर आजपर्यत अपलोड करण्यात आलेली असुन त्यापैकी 1 लक्ष 4 हजार 369 खात्यांना विशिष्ट क्रंमाक पोर्टलवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी 1 लक्ष 2 हजार 411 खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील 1 लक्ष 225 खात्यावरील रु.628.17 कोटीची कर्जमुक्तीची रक्कम संबधीत खात्यावर जमा करण्यात आली आहे.  उर्वरित खात्यांवरील रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेत आहे. तसेच आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 1958 खात्यांधारक शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहकार विभागामार्फत दि.15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात संबंधित शेतकरी यांच्याशी जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणा व ईतर संस्था यांच्या मदतीने संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाला आहे. त्यापैकी ज्या खातेदार शेतकऱ्यांनी आजपर्यत आधार प्रमाणीकरण केले नाही त्या शेतकऱ्यांनी ते ज्या ठिकाणी राहत असतील तेथील नजिकच्या सेवा केंद्राला भेट देवुन आपला कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्याकरीता अंतिम संधी असून त्याचा लाभ घ्यावा. यात काही अडचण किंवा शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा जिल्ह्यातील कोणत्याही सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.   




टिप्पण्या