Akola news letter: शहीद जवान निलेश धांडे यांचे पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार: व इतर महत्वाच्या बातम्या

Martyr Nilesh Dhande's last rites on earth at Warur Jaulka





अकोला,दि.4: वरुर जऊळका (अकोट) येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी या वीर जवानास अखेरचा निरोप दिला.



शहीद निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सिमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर या पदावर सन 2013 पासून कार्यरत होते. नागालँड येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.4) विशेष विमानाने नागालँड येथून नागपूर व नागपूर येथून विशेष वाहनाने मुळगावी आणण्यात आले.  त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दिड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे.


याप्रंसगी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तहसिलदार निलेश मडके, जऊळका सरपंच उषा काठोडे, ग्रामसेवक रेखाते, सुभेदार मेजर डी.पी. धांडे, माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.एस. पडोळे आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी  भावपूर्ण शब्दात निलेश धांडे यांना श्रद्धाजंली वाहिली.






मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर छायाचित्र नसलेल्या ६३ हजार १२० मतदारांची नावे वगळली



The special revision program of the voter list removed the names of 63,120 voters who did not have public photographs



अकोला,दि.४: मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.१ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर राबविण्यात येत आहे. त्यात छायाचित्रासह मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या  मतदारांची नावे तपासणे व घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो गोळा करणे हे कामकाम करण्यात आले. या मोहिमे अखेर  जिल्ह्यात एकूण १५ लक्ष ६७ हजार ८०० मतदारांपैकी छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या ६८ हजार ८२६ इतकी होती. या मोहिमेत घरोघरी जाऊन ५ हजार ७०६ मतदारांची छायाचित्रे संग्रहित करण्यात आली, त्यानंतर ६३ हजार १२० मतदारांची  नावे वगळण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.


मतदार संघ निहाय आकडेवारी 


२८-अकोट- एकूण मतदार २ लाख ९१ हजार ५५१, छायाचित्र नसलेले मतदार ७२६१, संग्रहित केलेले छायाचित्र १२३७, वगळणी केलेले मतदार संख्या ६०२४.


२९-बाळापूर- एकूण मतदार २ लाख ९४ हजार ८३२, छायाचित्र नसलेले मतदार ५१४७, संग्रहित केलेले छायाचित्र ३८८, वगळणी केलेले मतदार संख्या ४७५९.


३०-अकोला पश्चिम- एकूण मतदार ३ लाख ३२ हजार ७०१, छायाचित्र नसलेले मतदार २४२१४, संग्रहित केलेले छायाचित्र ८५६, वगळणी केलेले मतदार संख्या २४२१४.


३१-अकोला पूर्व- एकूण मतदार ३ लाख ४२ हजार ११०, छायाचित्र नसलेले मतदार १६२०७, संग्रहित केलेले छायाचित्र २५, वगळणी केलेले मतदार संख्या १६१८२.


३२-मुर्तिजापूर- एकूण मतदार ३ लाख ६ हजार ६०६, छायाचित्र नसलेले मतदार १५९९७, संग्रहित केलेले छायाचित्र ३२००, वगळणी केलेले मतदार संख्या १२७९७.


या पाचही मतदार संघात  मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे तपासणे, घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो गोळा करणे तसेच दिलेल्या पत्त्यावर वास्त्यव्यास नसलेल्या मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही करण्यात आली.


वगळणीची कार्यवाही पूर्ण होत असून  वगळणी होत असलेल्या मतदारांची नावे  https://akola.gov.in  या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांची तसेच वगळणी केलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे.



१ नोव्हेंबर पासून दावे हरकती स्विकारणार


दरम्यान दि.१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत  राज्यातील तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झालेला असून  सोमवार दि.१ ते मंगळवार दि.३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी  मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावे वगळणे, इ. करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन  द्यावे. मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत होणार आहे. जिल्ह्यातील पात्र मतदार नव मतदार यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी  www.nvsp.in  या संकेतस्थळावर जाऊन  आपले नाव नोंदवावे. तसेच voter helpline app च्या सहाय्यानेही मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याव्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदविता येईल.  तरी मतदारांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.




जि.प., पं.स. निवडणुकः आज (दि.५) मतदान; प्रशासनाची सज्जता


Z.P., P.S.  Election: Voting today ; Administration readiness


अकोला, दि.४ : जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद निवडणुक विभाग व २८ पंचायत समिती गणात  होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या दि.५ रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून  यानिवडणूकीत तीन लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.


४८८ मतदान केंद्र


जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात 488 मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी मतदान व बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात 77, अकोट तालुक्यात 81, मुर्तिजापूर तालुक्यात 83, अकोला तालुक्यात 85, बाळापूर तालुक्यात 74, बार्शिटाकळी तालुक्यात 49 व पातूर तालुक्यात 39 असे एकूण 488 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.


मतमोजणी  बुधवारी (दि.6)


या निवडणूकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल.


मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे- तेल्हारा येथे नवीन इमारत तहसिल कार्यालय, अकोट येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन, मुर्तिजापूर येथे शासकीय धान्य नवीन गोडाऊन, अकोला येथे शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम, बार्शीटाकळी येथे पंचायत समिती सभागृह तर पातुर येथे पंचायत समिती सभागृह, पातूर या ठिकाणी मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे.


निवडणूक प्रक्रियेसाठी २४२८ कर्मचारी तैनात


ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकुण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षणही पार पडले आहे. या शिवाय  पोलीस बंदोबस्तही सज्ज करण्यात आला आहे. निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यात तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला व बाळापूर येथे प्रत्येकी चार तर बार्शी टाकळी व पातुर येथे प्रत्येकी एक पथकांचा समावेश आहे.


प्रतिबंधात्‍मक आदेश लागू


निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. त्यानुसार शस्‍त्र परवानाधारकास शस्‍त्र वाहून नेण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे. तसेच ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे, त्‍या मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्‍या कामा‍व्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे. तसेच ज्‍या ठिकाणी निवडणूक साहित्‍य कक्ष (STRONG ROOM) आहेत, तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आणि ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू राहतील.


क्षेत्रीय अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत


निवडणुक विषयक विविध जबाबदारी पार पाडण्याकरीता क्षेत्रीय अधिकारी व सहायक क्षेत्रीय अधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (129)(133)(143)(144) अन्वये जिल्हा परिषद व  पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीकरीता कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.  


मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर


यानिवडणुकीत मतदारांना आप्ला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  संबंधित मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, तसेच कामानिमित्‍त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांना  निवडणुकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी मंगळवार दि. 5 ऑक्‍टोबर रोजी भरपगारी सुट्टी देण्‍यात आली आहे. तसेच अपवादात्‍मक परिस्थितीत कामगार,अधिकारी, कर्मचारी इत्‍यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल अशा मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्‍यात यावी,असे आवाहन सर्व खाजगी संस्‍था, व्‍यापारी संस्‍था, दुकाने व कारखानदार यांना करण्यात आले आहे.  


मद्यविक्री बंद


निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जेथे निवडणूका आहेत त्या भागात मतदानाच्या एक दिवस आधी (दि.४), मतदानाच्या दिवशी (दि.५) व मतमोजणीच्या दिवशी (दि.६) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.  तसेच जेथे मतमोजणी आहे त्या तालुका मुख्यालयी, महापालिका हद्दीत मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


मंगळवार व बुधवार (दि.5व 6) आठवडी बाजार बंद


ज्या भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात पोटनिवडणुक होत आहेत तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर व मतमोजीणीच्या दिवशी बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.


मतदानासाठी ओळखीचे पुरावे


जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीत मतदान करतांना मतदारांना  स्वतःची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त अन्य 17  प्रकारच्या कागदपत्रांची यादी निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी कोणतेही एक कागदपत्रे दाखवून मतदार आपली ओळख पटवू शकतात. त्यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड,  केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम,  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले फोटो ओळखपत्र, राष्ट्रीयकृत  बॅंक  अथवा टपाल पासबुक, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांने अनु.जाती, अनु. जमाती, इमाव, भटक्या जमाती, वि.मा. प्र इ. ना फोटो सहित दिलेले प्रमाणपत्र,  सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला  अपंगत्वाचा दाखला, फोटो सहित असलेले मालमत्ता कागदपत्रे, फोटोसहित शस्त्रपरवाना, राष्ट्रीय रोहयो अंतर्गत फोटो ओळखपत्र,  निवृत्त कर्मचाऱ्याचे पासबुक, निवृत्त कर्मचारी अवलंबित  व्यक्ती यांचे फोटो ओळख पत्र,  निवृत्ती वेतनधारक, त्यांच्या विधवा यांचे फोटो ओळखपत्र,  आरोग्य विमा योजनेचे फोटो ओळखपत्र, शिधा पत्रिका (कुटुंबातील सर्व सदस्य सोबत आल्यास, एकच व्यक्ती असल्यास वास्तव्याचा अन्य पुरावा), आधार ओळखपत्र, या ओळखपत्रांचा समावेश आहे.




आज ‘शून्य’:एकास डिस्चार्ज


Today 'zero': one discharge


अकोला,दि.४: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ७८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८  अहवाल निगेटीव्ह तर कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.३) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६२(४३२५६+१४४२९+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शून्य


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२३२८६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१९६६२ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२२२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३२३२८६अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८००३० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


‘शून्य’ पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात आरटीपीसीआर तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.


 


एकास डिस्चार्ज


दरम्यान आज दिवसभरात होम आयसोलेशन मधील एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


१४ जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६२(४३२५६+१४४२९+१७७) आहे. त्यात ११३७मृत झाले आहेत. तर ५६७११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः ७६चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.३) दिवसभरात झालेल्या ७६चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.



काल दिवसभरात अकोला महानगर पालिका क्षेत्रात येथे ६०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे ७६ जणांच्या चाचण्या होऊन त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.



उद्या दिनांक 05/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

7) GMC अकोला

8) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

9) आर .के .टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ वेळ सकाळी9 ते दुपारी 1 राहील



18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covishield (100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ] साठी पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covexin (100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [200 कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ] साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


अकोला महानगरपालिका अकोला.





टिप्पण्या