Swabhimani and MSEDCL:रविकांत तुपकर यांनी वाशिम मध्ये केलेल्या वक्तव्या विरोधात नाशिकात पोलिस तक्रार; 'स्वाभिमानी' व महावितरणमध्ये संघर्षाची सुरूवात




Complaint lodged with Nashik police against Ravikant Tupkar's 'that' statement; struggle between 'Swabhimani' and MSEDCL




बुलडाणा, दि. २९: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वाशीम जिल्हा दौऱ्यावर असतांना पदाधिकारी मेळाव्यात तसेच प्रसार माध्यमांसमोर बोलताना 'गावात वीज कापायला आलेल्या कर्मचाऱ्यांना आधी समजावून सांगा आणि नाही ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा' असे आक्रमक विधान केले होते.  त्यांच्या या विधानामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून नाशिकमध्ये तुपकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राज्यात इतरही ठिकाणी तक्रारी दाखल करण्याच्या तयारीत विज कर्मचारी संघटना आहे. आता या घटनेमुळे  राज्यात महावितरण आणि 'स्वाभिमानी' यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

                     


तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुपकर नेहमीच आक्रमक भूमिका मांडतात.  गेल्या आठवड्यात ते वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि प्रसार माध्यमांसमोर बोलतांना त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यां बाबत आक्रमक विधान केले होते. थकीत वीजबिलापोटी महावितरण ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करीत आहे, यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत, या विषयीच्या वाढत्या तक्रारी पाहता 'गावात महावितरणचे कर्मचारी वीज कट करायला आल्यास त्यांना आधी समजावून सांगा आणि नाहीच ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा' असे चिथावणीखोर विधान तुपकर यांनी केले. इलेक्ट्रानिक मीडिया तसेच सोशल मीडियावर त्यांच्या विधानाचे वृत्त राज्यभर पसरले आणि त्यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. उपनगर पो.स्टे. नाशिकरोड येथे महाराष्ट्र राज्य विज वर्कस फेड्रेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. 



तुपकरांच्या या चितावणीखोर वक्तव्यामुळे काही समाजकंटक महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याची दाट शक्यता असल्याने वीज कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे तक्रारीत नमुद आहे. पोलिसांनी तुर्तास ही तक्रार चौकशीवर ठेवली आहे. 




या तक्रारीनंतर आता राज्यात इतर ठिकाणी देखील तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी देण्याचे सत्र सुरु होण्याची शक्यता आहे, यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महावितरण यांच्यात राज्यात आता नव्या संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 


 महावितरण कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीला आपण महत्व देत नाही: तुपकर


शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत असताना आजपर्यंत अनेक तक्रारी झाल्या. अनेक गुन्हेही आमच्यावर दाखल झाले. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीला आपण महत्व देत नाही. महावितरणच्या जाचाने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, त्यांच्या भावना पाहता हे विधान केले असून, या विधानावर आपण ठाम असल्याचे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे. 

टिप्पण्या