Political:VBA:NCP:Barti: funds: बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वलग्ना,अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात - वंचित युवा आघाडी








अकोला/मुंबई, दि. १३ :राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी सवंग घोषणा  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केली असली तरी सहा महिने होऊन देखील केली गेलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करीत असून वंचित बहूजन युवा आघाडीने या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला आहे. अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात असल्याचा आरोप देखील युवा आघाडीने केला आहे.


बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत. 


गेली सहा महिने बार्टीच्या योजनांची केली जाणारी दुरावस्था पाहता अनुसूचित जाती मध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या साधार बातम्या प्रसिद्ध झाल्या. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, ह्या साठी सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय कालच प्रदेश युवा आघाडीने घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता.


सरकारने केलेली अल्प तरतूद अनुसूचित जातीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने जाणिवपूर्वक गेली सहा महिने निधी मंजूर करण्यात चालढकल केली आहे. सामाजिक न्यायमंत्री " घरवाली, बाहरवाली" मालिकेत अडकुन पडल्याने त्यांची धडपड स्वतःचे मंत्रिपद वाचविण्यासाठी सुरू आहे. त्याचा गैरफायदा अनुसूचित जातीचा निधी हडपण्यात माहिर असलेल्या अर्थखात्याचे म्होरके अजित पवार ह्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती साठीचा निधी सिंचना साठी वळवून त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रकरणात भाजपा सोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी करून त्या प्रकरणात क्लीन चीट मिळविली आहे.त्यानंतर आरक्षित वर्गाच्या पदोन्नती मध्ये आरक्षण नाकारले गेले.आता अजित पवारांनी पुन्हा आपला डाव अनुसूचित जातीच्या योजना बंद करून त्यातील तरतूद इतरत्र वळविण्यासाठी टाकला असल्याचा आरोप वंचितने केला आहे.


वंचित बहूजन युवा आघाडी ह्या विरुद्ध लवकरच " जवाब दो आंदोलन " उभे करणार असल्याचा इशारा वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे  यांनी दिला आहे.



बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित; बार्टीच्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे


91.50 crore to Barti immediately;  No Barty scheme will be allowed to run short of funds - Social Justice Minister Dhananjay Munde



डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला 91.50 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.


बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी 90 कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण 91.50 कोटी रुपये स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.


काही प्रसारमाध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होत असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यापैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, उलट सर्व योजना अधिक व्यापक करण्यासाच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत, असा निर्वाळा देखील श्री.मुंडे यांनी केला आहे.


बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची सद्यस्थिती जाणून घेत काही नवीन योजना देखील आखण्यात येत आहेत, याबाबत बार्टी स्तरावर लवकरच एक सर्वंकष बैठक घेण्यात येणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.


बार्टीला कोविडच्या आर्थिक संकटात देखील तातडीने 91.50 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.


महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याबाबतची योजना बार्टी मार्फत सुरू केली असून, या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू आहे. याचप्रमाणे आणखी काही नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या तर काही योजना प्रस्तावित असून कोणत्याही योजनेच्या निधीला धक्का लागणार नाही व कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या