Maharashtra Newsletter: महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी. व इतर बातम्या




 

मुंबई, दि. २९ :  राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.


सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.  यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.



वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये


मुंबई,दि 29 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार रु. थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये १ लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली असून वसंतराव  नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्यास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. रिक्त पदासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी दिले.


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 119 वी  बैठक  बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. संचालक दिलीप हळदे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत संचालक मंडळाच्या 118 व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस  मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या नियमित आस्थापनेवरील रिक्त असलेली  पदे भरण्यास मंजुरी, नियमित आस्थापनेवरील अधिकारी  कर्मचारी यांना पदोन्नती आदी विषय मंजुरीसाठी बैठकीत मांडण्यात आले.


बैठकीत महामंडळाच्या नियमित आस्थापनेवर  एकूण 96  पदे मंजूर असून  रिक्त पदे भरण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना व राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली या दोन्ही योजनांची वसुली वाढविण्याकरिता थकित कर्जावरील व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत लागू करणे आणि महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार थेट योजनेची मर्यादा रुपये 1 लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.



मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय!


मुंबई, दि. २९ : भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार असून या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन येत्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर,  ब्रिगेडियर डॉ. आचलेश शंकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस.चहल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 


सल्लागार आणि‍ डिझाईनर समितीची स्थापना


हे संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एका सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या आणि देशाच्या रक्षणासाठी  सीमेवर  प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या जवानांप्रती अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने या संग्रहालयात काही गोष्टींची अनुभूती घेता येईल अशीही व्यवस्था करण्यात यावी. बंकर कसे असतात,  सियाचीनसारख्या ठिकाणी उणे डिग्री सेल्सियसमध्ये आपले सैनिक कसे राहतात,  जड शस्त्रास्त्रे सोबत घेऊन आपले सैनिक वाळवंटातून कसे चालतात, जंगलात त्यांचा वावर कसा असतो, यासारख्या गोष्टींची माहिती  आणि अनुभव संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना मिळावा.


भारतीय लष्कराचे सामर्थ्य दर्शविणारी अनुभूती मिळावी


देशाचे लष्करी  सामर्थ्य आणि गौरव दर्शविणाऱ्या या  संग्रहालयाच्या माध्यमातून तीनही सैन्य दलाच्या पराक्रमाच्या यशोगाथा, विविध युद्धांची माहिती, यात वापरण्यात आलेले शस्त्रास्त्र आणि आयुध यासह तीन ही सैन्य दलामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील सैनिक, अधिकारी यांच्या पराक्रमाची माहिती, विविध युद्धात सहभागी होऊन शहीद झालेले राज्यातील सैनिक-अधिकारी, टँक, नौका, विमाने, पदके, लष्करी गणवेश, लष्करातील पदाधिकाऱ्यांचे रँक स्ट्रक्चर यासारख्या बाबी प्रदर्शित करण्यात याव्यात. युद्धात उपयोगात येणारी विमाने, नौका,  हेलिकॉप्टर्स, रणगाडे  यांच्या उभारणीसह इतर बाबींच्या प्रतिकृती येथे असाव्यात. येथे भारतीय स्वातंत्र्याची सर्व ऐतिहासिक माहिती मिळावी, हे राज्य संग्रहालय होत असल्याने यामध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी कौशल्यांची माहिती, त्यांचे नौदल नियोजन याची माहिती देणारे दालन असावे.  ॲम्फी थिएटर, नागरी सुविधा,  परमवीरचक्र, अशोक चक्र विजेत्यांची माहिती त्यांचा पराक्रम,  त्यांचे मेडल्स अशी सर्व माहिती या ठिकाणी मिळावी.


याठिकाणी एक ॲक्टीव्हिटी एरियाही तयार केला जावा  युवावर्गाला शारीरिक सुदृढतेसाठी काय करायला हवे, किमान सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे याची माहिती आणि मार्गदर्शन  येथे मिळावे.   भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने त्यांना यासाठी करावयाची तयारी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान देणारे काही कोर्सेस सुरु करता येतील का याचाही विचार केला जावा.


एकूणच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची सर्वंकष माहिती मिळताना या माध्यमातून नागरिकांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल अशी व्यवस्था ही याठिकाणी असावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


ब्रिगेडियर डॉ. शंकर यांनी देशभरातील राज्य लष्कर संग्रहालयाची माहिती देणारे सादरीकरण यावेळी केले.



शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी


मुंबई, दि.२९ : विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच 'आशा' असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नाविन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास  करणार आहे.


यावेळी  मुख्यमंत्र्यांचे अपर  मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर - सिंह , सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन , नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल. रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दिंगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.


उपयोगिता लक्षात घेऊनच विमानतळाचा विकास व्हावा


केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येऊ नये तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्याचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.


नागपूर मिहानमधील ज्या विविध कंपन्यांना जागा देण्यात आली आहे, त्याचाही आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला व तेथे उत्पादन योग्य रीतीने सुरू ठेवण्याबाबतही निर्देश दिले.


बैठकीत राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधा, विमानतळ विकास कंपनीच्या गत वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला.









टिप्पण्या