Jammu and Kashmir: tourists: पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; कोरोनापश्चात काळात पर्यटनाला पुन्हा बहर

Jammu and Kashmir eager to welcome tourists;  In the post-Corona period, tourism here flourished again (file photo)




मुंबई, दि. १५ : जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यात विविध सण, महोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून पर्यटनाशी संबंधित घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे, पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि काश्मिर तसेच तेथील लोक उत्सूक आहेत, असे आवाहन काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी आज येथे केले.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रॅव्हल एजन्ट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे अध्यक्ष फारुख कुथू, जम्मू आणि काश्मिरचे मुंबई येथील सहायक पर्यटन अधिकारी बशीर अहमद वानी यावेळी उपस्थित होते.

काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू म्हणाले की, जम्मू-काश्मिर आणि महाराष्ट्रामध्ये खूप जुने संबंध आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरला नेहमीच पसंतीचे स्थान दिले आहे. माता वैष्णोदेवी, हजरतबल दर्गा यांसारखी धार्मिक पर्यटनस्थळे, पहलगाम, सोनमर्ग, दल सरोवर, गुलमर्गसारखी विपुल नैसर्गिक सौंदर्य लाभलेली स्थळे यासह इथली खाद्यसंस्कृती, हस्तकला, पारंपारिक संगीत-नृत्य हे सर्व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. आता कोरोनापश्चात काळात येथील पर्यटनाला पुन्हा बहर येत असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. पर्यटकांनी लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी केली असल्यास उत्तमच होईल. पण हे केले नसले तरी पर्यटक तिथे येऊ शकतात. तिथे आल्यानंतर अँटीजेन चाचणी करुन पर्यटकांना पर्यटनासाठी संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू आणि काश्मिरमधील पर्यटन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय पर्यटन व्यावसायिक, घोडेवाले, बोटींग व्यावसायिक, शिकारा चालक, टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांचे कर्मचारी, हॉटेल स्टाफ, पर्यटन संबंधीत सेवा पुरवठादार यांचेही प्राधान्याने लसीकरण करण्यात आले असून ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. याशिवाय या सर्व घटकांना कोरोना प्रतिबंधासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, पर्यटकांची कशी काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षणेही देण्यात आली आहेत, तसेच ठिकठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. पर्यटकांची सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून त्यामुळे पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये न घाबरता पर्यटनासाठी यावे, असे आवाहन डॉ. इटू यांनी केले.


जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय म्हणाले की, जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिने पर्यटनासाठी विविध उपक्रम, महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या काळात नवरात्र, दसरा, लोहडी, दिवाळी, ख्रिसमस, नववर्ष, पुढील वर्षात येणारी होळी असे अनेक सण-उत्सव आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारी बर्फवृष्टी, टुलीप फुलांचा महोत्सव, केसर महोत्सव, शरद ऋतुतील विविध महोत्सव यासह या काळात अद्भूत असे निसर्ग सौंदर्य पाहण्याची पर्यटकांना संधी आहे. बर्फातील विविध खेळ, पक्षी निरीक्षण, ट्रेकींग, हेरीटेज टुरीजम यांनाही जम्मू आणि काश्मिरमध्ये आता बहर येत आहे. पर्यटकांची संख्याही हळुहळु वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याने तसेच पर्यटनाशी संबंधीत सर्व घटकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने विविध निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर स्थळ असलेल्या जम्मू  आणि काश्मिरला येत्या काळात अवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्व जम्मू आणि काश्मिरवासीय पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सूक आहेत, असे त्यांनी सांगितले.


यावेळी कोरोनापश्चात काळातील जम्मू आणि काश्मिरमधील बदलत्या पर्यटनाचे तसेच पर्यटकांसाठी घेण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.

टिप्पण्या