Income tax department raids: अभिनेता सोनू सुदच्या मुंबई-दिल्ली कार्यालयासह 28 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे

Income tax department raids Mumbai-Delhi office of actor who helped migrant workers financially during Corona period (file photo)





नवी दिल्ली : कोरोना महासंकटात हजारो स्थलांतरित मजुरांना आर्थिक मदतीचा हात देवून ऑफस्क्रीनही नायक बनलेला प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांसह अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने  त्याच्या विरोधात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण उघड केली आहे.



अभिनेता सोनू सूद व त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या घरासह  कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरी संबंधित पुरावे सापडले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. तसेच, अभिनेत्याने बनावट संस्थांद्वारे बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. तर सोनू सूदने एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून परदेशी देणगीदारांकडून 2.1 कोटी जमा केले आहेत, असे आयकर विभागाने सांगितले आहे.


आयकर विभागाने मुंबईत सोनू सूदच्या विविध भागात आणि पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतलेल्या लखनौ स्थित औद्योगिक क्लस्टरमध्ये छापे आणि जप्तीची कारवाई केली. सीबीडीटीनुसार, मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली, गुरुग्रामसह एकूण 28 परिसरांवर सलग तीन दिवस छापे टाकण्यात आले.




अशी झाली कारवाई


प्राप्तिकर विभागाने आज मुंबईत या  अभिनेत्याच्या विविध संकुलांवर आणि पायाभूत सुविधा विकासात कार्यरत असलेल्या लखनौच्या एका उद्योग समूहावर देखील छापे घातले. मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील एकूण 28 संकुलांवर छापे घालून शोधमोहीम राबवण्यात आली आहे,अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे.


या अभिनेत्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या संकुलांमध्ये राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे आढळले आहेत. आपले बेहिशोबी उत्पन्न लपवण्यासाठी हा अभिनेता अनेक बनावट आस्थापनांच्या माध्यमातून तारणविरहित बनावट कर्जाचे वाटप करण्याच्या पद्धतीचा अवलंब करत होता.


आतापर्यंतच्या चौकशीत अशा प्रकारच्या वीस नोंदी उघड झाल्या आहेत. या पुरवठादारांनी अशा प्रकारच्या बनावट नोंदी केल्याचे मान्य केले आहे. रोख रकमेच्या बदल्यात धनादेश जारी केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. कर चुकवण्यासाठी खातेवहीत व्यावसायिक पावत्या कर्जाच्या रुपात दाखवण्यात आल्या होत्या. चौकशीत असे देखील आढळले की या बनावट कर्जांचा वापर गुंतवणुकीसाठी आणि मालमत्ता खरेदीसाठी केला जात होता. या माध्यमातून आतापर्यंत 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा कर चुकवण्यात आला आहे.


21 जुलै 2020 रोजी या अभिनेत्यांना स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेने 1-4-2021 पासून आतापर्यंत 18.94 कोटी रुपयांच्या देणग्या जमा केल्या आहेत आणि त्यापैकी 1.9 कोटी रुपये विविध प्रकारच्या मदतकार्यावर खर्च करण्यात आले आहेत तर उर्वरित 17 कोटी रुपये या संस्थेच्या बँकेच्या खात्यात आजपर्यंत वापराविना पडून असल्याचे आढळले आहे. तपासात असे देखील आढळले आहे की परदेशी देणगीदारांकडूनही 2.1 कोटी रुपयांच्या देणग्या या धर्मादाय संस्थेने स्वीकारल्या आहेत आणि हा एफसीआरए कायद्याचा भंग आहे.


लखनौच्या एका पायाभूत सुविधा समूहाच्या विविध संकुलांवर एकाच वेळी छापे घालण्यात आले ज्या समूहामध्ये हा अभिनेता एका संयुक्त बांधकाम प्रकल्पामध्ये सहभागी झाला होता आणि त्याने यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधीची गुंतवणूक केली होती. यामधून करचुकवण्याशी संबंधित आणि खातेपुस्तकांमध्ये अनियमितता आढळली आहे.


हा समूह उपकंत्राटी खर्चाच्या बनावट पावत्या बनवण्यामध्ये आणि निधी इतरत्र वळवण्यामध्ये गुंतला होता असे तपासात आढळले आहे. अशा प्रकारच्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या बनावट कंत्राटांचे पुरावे सापडले आहेत. बेहिशोबी रोख रक्कम, बेहिशोबी भंगार विक्री आणि बेहिशोबी रोख रकमेच्या व्यवहारांचा डिजिटल डेटा यांचे पुरावे सापडले आहेत. त्याशिवाय हा पायाभूत सुविधा समूह/कंपनी जयपूरच्या एका कंपनीसोबत 175 कोटी रुपयांच्या बनावट वर्तुळाकार व्यवहारातही सहभागी होता. चुकवलेल्या करांचे एकूण आकारमान निर्धारित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


छाप्यादरम्यान 1.8 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि 11 लॉकर्स प्रतिबंधात्मक आदेशाखाली ठेवण्यात आले आहेत. ही शोधमोहीम अजूनही सुरू आहे आणि पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

टिप्पण्या