- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Important news of Akola district: अतिवृष्टीचा अंदाज: सतर्कतेचा इशारा ; पुर पाहणाऱ्यांची गर्दी रोखण्याचे निर्देश,कोरोना अलर्ट व इतर बातम्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला, दि.२७: भारतीय हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार, दि.३० पर्यंत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जनतेने व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी नद्यांना आलेले पूर पाहण्यासाठी काही लोक गर्दी करत असून पुराच्या पाण्यात उड्या मारुन पोहत असल्याची दृष्ये विविध वृत्तवाहिन्यांवरुन दाखविली जात आहेत. अशा अनाठायी साहस करणाऱ्यांची गर्दी रोखण्याची व त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देशही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.
वादळात तसेच विजांचा कडकटात होत असतांना नागरिकांनी पूर्वकल्पना आल्यास घराबाहेर पडू नये. मोकळ्या जागेत असल्यास जवळच्या सुरक्षित इमारतीत सहारा घ्यावा. घराच्या बाल्कनी, ओटे येथे थांबू नका. घरात सुरु असलेली विद्युत उपकरणे तात्काळ बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब तसेच अन्य लोखंडी वस्तुंपासून दुर रहा. आकाशात विजा चमकत असल्यास मोबाईलचा वापर करु नका.
पूरस्थितीत नागरिकांनी पूर प्रवाहात प्रवेश करु नये. गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इ. पासुन दूर रहा. विद्युत खांब आणि तुटून खाली पडलेल्या वीज वाहिनीपासून दूर रहा. ड्रेनेजची ठिकाणे, धोक्याची ठिकाणे यासारख्या ठिकाणी सतर्क रहावे. पूराच्या पाण्यात वाहने नेऊ नका. पुलावरुन पाणी वाहत असल्यास आपली वाहने त्यातून नेऊ नका. तलाव, ओढे, धरणक्षेत्र, नदीपात्र याठिकाणी मोबाईलद्वारे सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.
अकोला जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही वेळी विसर्ग केला जाऊ शकतो, त्याअनुषंगाने नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेऊन सज्ज रहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात सर्वच धरणे भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग होत असून नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. अशा परिस्थितीत पूर पाहणारे, त्यात पोहणारे अशा अनुचित घटना रोखण्यासाठी संबंधित तहसिलदारांनी अधिनस्त पोलीस स्टेशनला आवश्यक निर्देश द्यावे, जेणेकरुन पुरात वाहुन जाणे, बुडणे अशा दुर्घटना टाळता येतील,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.
******
जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: माघारीनंतर जि.प.साठी ६८ तर पं.स. साठी ११९ उमेदवार रिंगणात
अकोला दि.२७: जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या पोट निवडणुक कार्यक्रमानुसार जेथे अपिल नाही तेथे उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (दि.२७ सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी ६८ तर पंचायत समिती गणांसाठी ११९ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.पं.स. निवडणुक संजय खडसे यांनी दिली आहे.
अंतिम शिल्लक वैध उमेदवारांचा तपशील खालीलप्रमाणे -
अनुक्रमे तालुका विभागांची संख्या वैध उमेदवार माघार उमेदवार अंतिम शिल्लक उमेदवार
१ तेल्हारा ३ १९ ०३ १६
२ अकोट २ १५ ०५ १०
३ मुर्तिजापुर २ १० ०२ ०८
४ अकोला ३ २६ ११ १५
५ बाळापुर २ ११ ०३ ०८
६ बार्शिटाकळी १ ८ ०२ ०६
७ पातुर १ ६ ०१ ०५
एकुण १४ ९५ २७ ६८
अनुक्रमे तालुका निर्वाचक गणांची संख्या,
निर्वाचक गणातील वैध उमेदवारांची संख्या, निर्वाचक गणातील माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या, निर्वाचक गणातील अंतिम शिल्लक उमेदवारांची संख्या
१ तेल्हारा ४ २१ ०३ १८
२ अकोट ४ २० ०३ १७
३ मुर्तिजापुर ४ १९ ०६ १३
४ अकोला ५ २८ ०७ २१
५ बाळापुर ४ २७ ११ १६
६ बार्शिटाकळी ४ २६ ०५ २१
७ पातुर ३ २० ०७ १३
एकुण २८ १६१ ४२ ११९
******
आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह; तीन जणांना डिस्चार्ज
अकोला,दि.२७: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 82 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले, तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57859(43253+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 321419 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 317798 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3219 नमुने होते. आजपर्यंत एकूण 321419 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 278166 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.
तीन डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
15 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57859(43253+14429+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56708 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 159 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.26) दिवसभरात झालेल्या 159 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला महानगर पालिका येथे 116, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 43 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 159 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.
******
क्रीडा नैपुण्य चाचण्या ५ ऑक्टोबरपासून
अकोला, दि.२७: आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडु घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडुंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
खेळांमध्ये खेळाडुंची दर्जेदार कामगिरी व्हावी यासाठी मुलांना लहान वयातच क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट यांचे संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथील डायव्हिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी व वेटलिफटींग या खेळाच्या प्रवेशाकरीता मंगळवार दि.५ ते शुक्रवार दि.८ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे फक्त मुलांकरीता जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या चाचण्यांचे वेळापत्रक या प्रमाणे-
वयोगट १० ते १४ वर्षे (जन्मदिनांक १/१/२००८ ते १/१/२०१२ दरम्यान असावा). क्रीडाप्रकार- बॉक्सिंग दि.५ ऑक्टोबर, कुस्ती, दि.६ ऑक्टोबर, ॲथेलेटिक्स दि. ७ ऑक्टोबर, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग व डायव्हिंग(जन्मदिनांक १/१/२०१० ते १/१/२०१४ दरम्यान असावा) दि.८ ऑक्टोबर.
क्रीडाप्रकार निहाय मुल्यांकन तक्त्यानुसार किमान ८० टक्के गुण प्राप्त करणारे खेळाडु पुढील चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक खेळाडुंनी आधारकार्ड /जन्माचा दाखला सादर करुन आपल्या नावाची नोंदणी दि.१ ऑक्टोबर पर्यंत करावी व खेळनिहाय चाचणीसाठी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी दहा वा. जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे उपस्थित राहावे.कोवीड १९ कालावधी विचारात घेता खेळाडुंनी मास्क, सॅनिटायझर, वॉटर बॅग इत्यादी साहित्य सोबत आणावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.
******
यु.पी.एस.सी. उत्तीर्ण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार
अकोला,दि.27: युपीएससी परीक्षा ही कठीण परीक्षा आहे. परंतु सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्नाने विद्यार्थी आय.ए.एस होवू शकतो. मोठे आव्हान स्विकारताना अनेक अपयश येतात. त्याला घाबरुन न जाता आत्मविश्वासाने सामोर जावे, अशा शब्दात जिल्ह्यातील आयएएस परीक्षा उत्तीर्ण आश्विन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2020 च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात अकोला जिल्ह्याचे आश्विन राठोड हे 520 क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहे. त्यांचा आज जिल्हाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आश्विनी राठोड यांचे आई व वडील उपस्थित होते.
यु.पी.एस.सी. अत्यंत कठीण परीक्षा असून या परीक्षेत आश्विन राठोड यांनी यश संपादन केले ही, जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे यु.पी.एस.सी. परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांनी काढले.
सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्नाने विद्यार्थी आय.ए.एस होवू शकतो. मोठे आव्हान स्विकारताना अनेक अपयश येतात. त्याला घाबरुन न जाता आत्मविश्वासाने सामोर जावे, अशा शब्दात आश्वीन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा