- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Cyclone Gulab:heavy rain:State: गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला जोर: अकोला जिल्ह्यात पुरस्थिती; प्रशासकीय यंत्रणा सज्ज; पुरस्थितीत वाहने नेतांना दक्षता घेण्याचे निर्देश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्याना पूर आला आहे.धरणे 95 टक्केच्या वर भरली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात पुलावरून बस वाहून गेल्याच्या मोठी घटना घडली. या पार्श्वभूमीवर पुरस्थितीत वाहने नेतांना दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव
गुलाब चक्रिवादळाचे आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसतील. येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई, ठाणे पण. विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यात पुरस्थिती; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
अकोला जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात २५.१ मिमि इतके पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात जवळपास सर्वच नद्या नाल्यांमधुन पूर्ण क्षमतेने पाणी वाहत असून गेल्या २४ तासात कोणतीही आपत्तीजनक स्थिती निर्माण झालेली नाही. तथापि, प्रशासकीय यंत्रणा सज्ज व सतर्क असून आवश्यकतेनुसार आपत्ती व्यवस्थापन तसेच शोध बचाव कार्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली.
जिल्ह्यात अकोला तालुक्यातील अकोला ते अकोट हा रस्ता सुरु आहे, तसेच अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्गही सुरु आहे. तालुक्यातील सर्व नद्यांना व नाल्यांना पूर आहे. बार्शी टाकळी तालुक्यातही पुरस्थिती आहे, मात्र कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ३५२.८२ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दगड पारवा प्रकल्पातून २.०५ क्युमेक विसर्ग होत आहे. मोर्णा तसेच काटेपूर्णा नदीला पूर आहे. अकोट तालुक्यात सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. पोपटखेड प्रकल्पातून ९३.२२ क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तेल्हारा तालुक्यात वान प्रकल्पात पाण्याची आवक पाहून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो असे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. बाळापूर तालुक्यातही मन प्रकल्पातून १२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पातुर तालुक्यात कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. मोर्णा प्रकल्पातून ३९.४६ तर निर्गुणा प्रकल्पातून १३.४१ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मुर्तिजापुर तालुक्यातील उमा प्रकल्पातून ७८.६४ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
जिल्ह्यात पुरस्थिती असली तरी कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन कृती दल व शोध बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पुरस्थितीत वाहने नेतांना दक्षता घेण्याचे निर्देश
हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे इ. मधुन पूर्ण क्षमतेने पाणी वाहत आहे.अशा परिस्थितीत वाहने नेतांना वाहनचालकांनी दक्षता घ्यावी, अशा सुचना देण्यात याव्या, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत.
पुरस्थितीत एस.टी. बस वा अन्य खाजगी प्रवासी वाहने यांनी पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहन नेऊ नये, तसेच वाहने नेतांना अधिक दक्षता घ्यावी,असे आपल्या वाहनचालकांना व वाहकांना कळवावे,असे विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना निर्देश देण्यात आले आहेत. तर खाजगी बसेस, यात्रा कंपनी यांना व त्यांच्या वाहनचालकांना सुचना देण्याबाबत उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाचा आढावा
विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यांमुळे औरंगाबाद शहरात मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक भागात पाणी साचले मुंबईतही दुपारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. ठाणे, नवी मुंबईत देखील जोरदार पावसाला सुरू आहे.
दरम्यान राज्यात सर्वाधिक पाऊस हा अकोला, वाशीम या जिल्ह्यात होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात बस पाण्यात वाहून गेल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर तीन प्रवासी बेपत्ता आहेत, उर्वरित दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प पूर्ण भरल्याने या प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा