Big Breaking: justice for darshan shukla: दर्शन शुक्लाचा मृतदेह अखेर सापडला ; मृत्यू मागील गूढ मात्र कायम...






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पूर्णा नदीत वाहून गेलेल्या दर्शन शुक्ला या युवकाचा मृतदेह सापडूनही पोलिसांच्या हलगर्जीमुळे गायब झाला होता. आज अखेर हा मृतदेह तापी नदीत सापडला आहे. मात्र, दर्शनच्या मृत्यूने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या सर्व घटनाक्रम मध्ये त्याच्या मृतदेहाची अवहेलना झाली असून,त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांचा शोध तरी पोलिसांनी तात्काळ घेवून त्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा दर्शनच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.



अखंड 11 दिवस सर्च ऑपरेशन राबवून दर्शन शुक्लाच्या मृतदेहाचा शोध अकोला जिल्ह्यातील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख (जिवरक्षक) दीपक सदाफळे यांनी घेतला आहे. आज सकाळी 9:30 वाजता तापी नदीपात्रात हतनुर डॅम नजिक मुक्ताई नगर तालुक्यातील मेहुन गावातील परीसरात मंदीराजवळ मृतदेह आढळला आहे. सध्या दर्शन शुक्लाचा मृतदेह पाण्याच्या विरुध्द दिशेने सुरक्षितस्थळी आणणे सुरू असल्याची माहिती सदाफळे यांनी दिली आहे.





दोन पोलीस कर्मचारी निलंबित


नदीमध्ये वाहून गेलेला युवकाचा मृतदेह सापडल्यानंतरही तो मृतदेह पोलिसांनी नदीपात्राच्या काठावर ठेवताच तो पुन्हा वाहून गेल्यानंतर या प्रकरणात कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीसाना निलंबित करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी रात्री दिले होते. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी युवक दर्शन शुक्ला हा गांधीग्राम येथे कावड घेऊन गेला होता. घरी न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यानंतर रामदास पेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यानंतर त्याचा मृतदेह बोरगाव वैराळे येथे नदीमध्ये सापडला होता. पोलिसांनी मृतदेह नदीपात्राबाहेर काढून तो काठावर ठेवला मात्र पाऊस वाढल्यानंतर मृतदेह नदीपात्रात वाहून गेला होता. यावेळी या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र मृतदेह पुन्हा वाहून गेल्याने यामध्ये संशय असल्याचा आरोप मृतक युवकाचे आई-वडिलांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मंगळवारी पोलीस कर्मचारी नेमाडे व झापर्डे या दोघांना निलंबित केले होते.




मित्र म्हणतात तो आमच्या सोबत नव्हता


दर्शन शुक्ला (वय 18 वर्ष) हा 29-08-2021 रोजी अकोला येथून श्री महादेव जलाभिषेक करिता कावडमधून पाणी आणण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत गांधीग्राम (वाघोली) येथे गेला होता. मात्र तो घरी परत आला नसल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांसोबत संपर्क साधला. मात्र, तो आमच्या सोबत नव्हता, आणि त्याच्या बद्दल आम्हाला माहिती नाही, अश्या शब्दात मित्रांनी उत्तर दिले. 



दिनांक 30-08-2021 रोजी कुटुंबीयांनी दर्शन बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली.याबाबत रीतसर अर्ज सुद्धा लिहला. त्यानंतर दिनांक 01-09-2021 ला रात्री 8:30 वाजता बोरगांव (वैराळे) त्याचा मृतदेह कुणीतरी गुराखीने नदी किनाऱ्यावर अत्यंत विद्रूप अवस्थामध्ये पाहिली. तेथील पोलीस पाटिल यांनी फोन करून त्याचा फोटो पाठविला. तसेच फोटोत त्याच्या हातातील कडा आणि काळी टी-शर्ट वरून त्याच्या कुटुंबीयांकडून ओळख पटविली. मात्र पाऊस आणि खूप रात्र झाल्याने मृत देह अकोल्यात आणण्यासाठी कोणतेही वाहन वा अन्य साधन नसल्या कारणाने दुसरे दिवशी सकाळी मृतदेह ताब्यात घेवून घरी आणण्याचे कुटुंबीयांनी ठरविले.तसे पोलिसांनाही कळविले. यामुळे मृतदेह वर देखरेख करण्यासाठी दोन पोलीस तैनात करण्यात आले होते.


परंतू दिनांक-02-09-2021 ला जेव्हा कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहचले तर मृतदेह तेथून गायब झालेला होता.कुटुंबीयांनी आजूबाजूचा संपूर्ण परिसरात शोध घेतला मात्र काहीच हाती सापडलं नाही. यानंतर स्थानिक प्रशासनाची आपत्ति व्यवस्था पथकाशी सकाळी सम्पर्क केला असता सायंकाळी 4:30 वाजता पथक घटनास्थळी पोहचले. सायंकाळ झाल्या कारणाने नदीत शोध घेतला जावू शकणार नाही,असे पोलिसांनी कुटुंबियांना सांगितले असल्याचा आरोप दर्शनच्या नातेवाईकांनी केला आहे.



 कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले

रामदासपेठ ठाणे पोलीसानी दर्शनची बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतरही शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? मृतदेह मिळाल्या नंतरही जबाबदारीने का सांभाळून ठेवला नाही?


रात्रीच आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावुन मृतदेह सुरक्षित जागी का ठेवला गेला नाही? मृतदेह नजीक दारूच्या बॉटल कुठून आल्या? मृतदेह सापडला त्या ठिकाणचा पंचनामा तात्काळ का केला गेला नाही? मृतदेह सापडल्यावर शवविच्छेदन साठी का पाठविण्यात आला नाही?, तसेच दर्शन हा मित्रांसोबत जातो असे घरी सांगितले होते,मग आता मित्र तो आमच्या सोबत नव्हता असे का म्हणत आहेत?,असे अनेक प्रश्न दर्शनच्या कुटुंबिय नातेवाईकां सह सामान्य नागरिकांनाही पडले आहेत.




असे झाले सर्च ऑपरेशन


सर्च ऑपरेशन दर्शन शुक्ला अकोला मिशन पुर्णानदी


सर्च ऑपरेशन 4 सप्टेंबर चे शनिवार, जीगाव ते घोडसगाव पुल अंदाजे 60 की.मी. 


4 सप्टेंबर रोजी जीगाव ते घोडसगाव पर्यंत सर्च ऑपरेशन राबविण्यात आले परंतु काही मिळुन आले नाही.पाच सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा घोडसगाव  पासुन ते मुक्ताईनगर  चांगदेव मंदीर तापीनदी- पुर्णानदी संगमाकापर्यंत केले जाईल जिवरक्षक - दीपक सदाफळे 


पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाकडुन शोधकार्य सुरु आहे 



अकोला येथील दर्शन शुक्ला याचा मृतदेह शोधण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आरडीसी संजय खडसे  यांच्या मार्गदर्शनाखाली मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, गोकुळ तायडे,चेतन इंगळे, संकेत देशमुख, हे रेस्क्यु बोटसह आणि शोध व बचाव साहीत्यासह जीगाव येथे सकाळी पोहचले. आणी सर्च ऑपरेशन चालु केले. पहिल्या दिवशी सायंकाळी जीगाव पासुन ते घोडसगाव पुलापर्यंत सर्च ऑपरेशन राबविण्यात आले परंतु काही मिळुन आले नाही. अंधार पडल्याने सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले होते. दुसरे दिवशी सकाळी मुक्ताई नगर तालुक्यातील घोडसगाव पुलापासुन सात वाजता पुन्हा सर्च ऑपरेशन चालु करण्यात आले होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली होती .



अकोला जिल्हाधिकारी तसेच अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर ,अकोला आरडीसी संजय खडसे हे या प्रकरणी स्वतः लक्ष ठेवून होते. आव्हाळे,उरळ पो.स्टे.चे ठाणेदार वडतकर आणि पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे पथकाच्या सोबत होते.




आज सापडला मृतदेह


"चाहे कुछ भी होगा लाश को धुंडकरही रहुंगा"- दीपक सदाफळे 


अखंड 11 दिवसाच्या सर्च ऑपरेशन मध्ये दर्शन शुक्लाचा मृतदेहाचा शोध अकोला जिल्ह्यातील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख (जिवरक्षक) दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषीकेश राखोंडे,गोकुळ तायडे, चेतन इंगळे यांनी आज सकाळी 9:30 वाजता तापी नदीपात्रात हतनुर डॅम नजिक मुक्ताई नगर तालुक्यातील मेहुन गावातील परीसरात मंदीराजवळ शोधुन काढलाच. दर्शन शुक्लाचा मृतदेह पाण्याच्या विरुध्द दिशेने सुरक्षितस्थळी आणणे चालु असल्याची माहिती पथक प्रमुख सदाफळे यांनी दिली आहे. दर्शन शुक्लाचा मृतदेह कितीही बिकट परिस्थिती आली तरी शोधून काढणारच, अशी खूणगाठ सदाफळे यांनी बांधली होती. आज हे अवघड शोध कार्य सदाफळे यांनी पूर्ण केले आहे,याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.





टिप्पण्या