Aadhar Card: Akola: Nagpur: चिमुकल्या 'परी' ला आधारकार्ड नोंदणी मुळे परत मिळाला आईबाबांच्या कुशीचा 'छोटासा पॅलेस'

The Department of Women and Child Development had undertaken the Aadhaar registration of children.  The result of this initiative was the reunion of a girl who was separated from her family. (Symbolic archived images)



*हरवले ते गवसलेः ‘आधार’ नोंदणीमुळे मिळाले बालिकेस कुटुंब




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला, दि.२७: प्रत्येक बालकांचे सुख हे आईबाबांच्या कुशीत असते. ही कुस स्वर्गातील इंद्र महल पेक्षाही अधिक वैभवशाली आणि सुरक्षित बालकांसाठी असते. काही बालकांपासून तर नियती हे सुख हिरावून घेते. जन्मोजन्मांतर परत हे सुख त्यांच्या नशिबी येत नाही. मात्र, अकोल्यातील एका चिमुकल्या परीला हे सुख परत मिळालं ते केवळ आधार कार्ड नोंदणी मुळे. आणि हा घटनाक्रम एखाद्या परीकथे पेक्षा कमी नाही. चिमुकल्या परीला अजाणत्या वयातच आयुष्यातील खडतर असा प्रवास करावा लागला. 


आईवडिलांपासून तीन वर्षांपूर्वी दुरावलेल्या चिमुकल्या परीला केवळ आधार कार्ड नोंदणी मुळे तिचे कुटुंब परत मिळाले. हरवलेली चिमुकली परी आता बलिकाश्रम सोडून आई बाबांसोबत आपल्या हक्काच्या उबदार अश्या मायेच्या आणि प्रेमाच्या छोट्याशा पॅलेस मध्ये राहायला गेली आहे. या घटनेमुळे आधार कार्डचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.




महिला व बालविकास विभागाने बालकांच्या आधार नोंदणीचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाची फलश्रृती झाली ती ‘आधार’ नोंदणी दरम्यान एका कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला पुन्हा तिचे कुटुंब मिळण्यात.




परीची परीकथा 


सन २०१९ मध्ये येथील गायत्री बालिकाश्रम येथे एका बालिकेस दहिहांडा पोलीस स्टेशन मार्फत दाखल करण्यात आले. ही बालिका तिचे राहण्याचे ठिकाण हे बिहार, पटना, दिल्ली  असे काहीतरी सांगत होती. तिला घरच्यांचे  नाव व अन्य माहितीही सांगता येत नव्हती. तिचे नाव ती ‘परी’ असे सांगत होती. बालिकाश्रमात दाखल झाल्यानंतर या बालिकेच्या पालकांचा तपास करण्यास सर्व तपास यंत्रणा काम करीत होत्या.




दरम्यान, बालगृहातील बालकांचे बॅंक खाते उघडणे व त्यासाठी आधारकार्ड नोंदणी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी महिला व बालविकास विभागाला दिले होते. त्यानुसार, महिला व बालविकास विभागाच्या सर्व बालगृहातील बालकांच्या आधारकार्ड नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ४ सप्टेंबर रोजी गायत्री बालिकाश्रमातील बालकांचे आधार कार्ड साठी नोंदणी करण्यात आली. त्यावेळी संपर्कासाठी अधीक्षक वैशाली भटकर यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. 




दहा दिवसांनंतर  ‘परी’ चे आधार कार्ड नोंदणी रद्द झाली असल्याचा मेसेज श्रीमती भटकर यांना आला. त्याचे कारण ह्या बालिकेचे आधारकार्ड यापूर्वीच म्हणजे सन २०१५ मध्येच काढण्यात आले होते. तथापि, आधार च्या कस्टमर केअर सेंटरने तिची संपूर्ण माहिती गोपनीयतेच्या कारणास्तव देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानुसार महिला व बालविकास विभागाचे सुनिल लाडुलकर यांनी आधार कार्डचे जिल्हा समन्वयक सौरभ जैन यांना संपर्क केला. त्यांनी शाळा क्रमांक १४ येथील आधार केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे या बालिकेस तेथे नेऊन तिचे अंगठ्याचे ठसे घेऊन तिचे मुळ आधारकार्ड डाऊनलोड करण्यात आले.  त्यावर तिचा पत्ता व अन्य माहिती मिळाली. विशेष म्हणजे हा पत्ता अकोल्याचाच होता. आणि तिचे नाव ‘लक्ष्मी’ होते. आधार कार्डावर दिलेल्या पत्त्यावर जाऊन महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क केला.  तेव्हा हे कुटुंब येथून नागपूर येथे स्थलांतरीत झाल्याचे समजले. तेथून काही लोकांकडून  बालिकेच्या वडीलांचा नंबर मिळवला. त्यावर संपर्क केला असता, सर्व उलगडा झाला.




या मुलीच्या पालकांची आणि तिची ओळख पटवण्याचे सर्व सोपस्कार  पार पाडल्यानंतर शनिवार २५ रोजी या बालिकेस घेण्यासाठी तिचे पालक नागपूरहून अकोल्यात आले. ‘लक्ष्मी’ ला महिला व बालविकास विभागाने तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.




जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे,  सुनिल लाडूलकर, अधीक्षक वैशाली भटकर व अन्य कर्मचाऱ्यांनी ह्या तपासाची चक्रे गतिमान ठेवल्याने अणि आधार कार्ड नोंदणी मुळे कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला तिचे कुटुंब पुन्हा मिळाले.

टिप्पण्या