Vidharbha:Akola:chandrapur:VBA विदर्भातील समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आवश्यक; तर चंद्रपूर मधील घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद- रेखा ठाकूर यांचे वक्तव्य

Vidharbha: Akola: chandrapur An independent Vidarbha state is needed to solve the imbalances and problems in Vidarbha;  The role of police in the incident in Chandrapur is doubtful - Rekha Thakur's statement





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: राज्यात पुन्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक झाली असून शेकडो गावामध्ये पुराचं पाणी शिरल. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेकांचे बळीही घेतले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे. मात्र विदर्भातील नागरिक आणि शेतकरी, व्यापारी मात्र वा-यावर सोडले आहेत. विदर्भातील पुरासाठी ९०० कोटीची मागणी केंद्र सरकार कडे करण्यात आली आणि केंद्राने केवळ १५१ कोटी दिल्याचे राज्य सरकार सांगते. विदर्भातील अन्याय कायम असून विदर्भातील असमतोल आणि समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आवश्यक असल्याचे मत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष (प्रभारी) रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले.



शासकीय विश्रामगृह येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वेगळा विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी उघडकीस आलेली घटना या दोन विषयावर प्रामुख्याने ठाकूर यांनी पक्षाची भूमिका यावेळी मांडली.



पूर येण्याला नेमकं काय कारण 

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भात विक्रमी पाऊस होत आहे. या ढगफुटीमुळे भंडारा, नागपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात महापूर आला आहे. या पुरमय परिस्थितीमुळे विदर्भात हाहाकार उडाला आहे. तब्बल २७ वर्षानंतर विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९९४ च्या काळानंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे. पण मुद्दा हा आहे कि संततधार असतांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात पूर येण्याला नेमकं काय कारण याचे उत्तर सरकार कडे नसल्याचे ठाकूर म्हणाल्या.


विदर्भाच्या वाट्यावर कायम उपेक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनीही राज्यांच्या पुनर्रचनेसाठी "एक राज्य एक भाषा" तत्त्वाची बाजू घेतली होती, ते "एक भाषा एक राज्य" धोरणाच्या विरोधात होते. त्यांचा असा विचार होता की एका राज्यात एकच भाषा असावी परंतु त्याच वेळी कार्यक्षम प्रशासनाच्या गरजेनुसार एकाच भाषेसाठी दोन किंवा त्याहून अधिक स्वतंत्र राज्ये असू शकतात. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राचे एका मोठ्या मराठीभाषिक राज्याऐवजी मराठी भाषिक लोकांची कमीतकमी दोन स्वतंत्र राज्ये तयार करण्याबाबत आपले मत मांडले. "एकटे सरकार संयुक्त महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याचे प्रशासन करू शकत नाही," असे म्हणत त्यांनी नागपूर राजधानीसह "विदर्भ" राज्याला स्पष्टपणे पसंती दिली होती. १९६३ च्या नागपूर करारामध्ये प्रस्तावित मराठी राज्यातील सर्व प्रदेशांच्या न्याय्य विकासाचे आश्वासन देण्यात आले आहे. नागपूर कराराचा सर्वांत मुख्य कलम असे आहे; विदर्भाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चेसाठी नागपूर शहरात दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे एक अधिवेशन होते. मात्र विदर्भाच्या वाट्यावर कायम उपेक्षा आली असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.


नदीजोड प्रकल्प


नेहमी पूर व त्यापासून उद्भवणाऱ्या समस्यांना जनतेस सामोरे जावे लागते. त्यावेळी जलदुर्भिक्ष्यांच्या क्षेत्रातील जनतेस दुष्काळी परिस्थिती व त्याच्याशी निगडित समस्यांशी मुकाबला करावा लागतो. या गंभीर बाबींकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी लक्ष्य केंद्रित करून नदीजोड प्रकल्पाची प्रथम मांडणी केली होती. नदीजोड प्रकल्पामुळे सिंचन, नौकानयन, औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी जलऊर्जा विकसित करणे अर्थात भारताच्या आर्थिक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सतत प्रयत्नशील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३ जानेवारी १९४४ रोजी कलकत्ता येथील अधिवेशनात स्पष्ट केले की, दामोदर प्रकल्पाचा हेतू केवळ महापूर थांबविणे एवढाच नसून त्याद्वारे विद्युतशक्तीची निर्मिती, सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा, जलवाहतूक आणि औद्योगिक वापरासाठी या प्रकल्पाचा हेतू साध्य होतो, इत्यादी बाबी स्पष्ट केल्या, अशा प्रकारे श्रम विभागाने केवळ जलसंपत्तीच्या बहुउद्देशीय विकासाबाबत शिफारशी केल्या नसून प्रांतीय, राज्य सरकार आणि स्थानिक मंडळामध्ये बहुउद्देशीय विकासाची योजना आणि त्याचा वापर करण्यासाठी त्यांच्यात पूर्ण समन्वयाची आवश्यकता वर्तविली होती, असे देखील ठाकूर यांनी यावेळी सांगितले.




चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा घटना उघडकीस


जिवती (जि. चंद्रपूर) येथून १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खूर्द या गावात जादूटोणा ल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात आहे. अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला. बाहेरच्या व्यक्तीना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप रेखाताई ठाकूर यांनी यावेळी केला.




पत्रकार परिषदेत प्रामुख्याने प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरूंधती शिरसाट, जि प अध्यक्ष प्रतिभा भोजने, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट,  महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, महीला आघाडी जिल्हा महासचिव शोभा शेळके,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या