Shivshankar Patil: Shegoan: कर्मयोगाचा दीपस्तंभ विझला: श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे शिवशंकर पाटील 'श्री' चरणी लीन; उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक



अकोला: मॅनेजमेंट गुरू अशी जगभर ख्याती प्राप्त संत श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांची आज बुधवार,  4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते. भाऊंच्या निधनामुळे शेगाव नगरीसह विदर्भ आणि जगभरातील श्रीभक्त शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली,नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.



काल सकाळपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते. तीन दिवसापासून शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती मल्टीऑर्गन फेलीयुअरमुळे चिंताजनक झाली होती. डॉक्टर हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात  वैद्यकीय उपचार सुरू होते. आयुर्वेदतज्ञ डॉक्टर गजानन पडघन हे देखील सेवेत हजर होते. मात्र,काही भक्तांकडून कालच त्यांच्या निधनाचा चुकीचा संदेश समाज माध्यमातून फिरत होता. परंतू आप्त स्वकीयांकडून खुलासा झाल्यानंतर अफवा बंद झाल्या होत्या.परंतू आज भाऊ सर्व भक्तांना पोरके करून गेले. सायंकाळीच त्यांच्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.






शोक संदेश



नम्र निवेदन


कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आमचे वडील श्री शिवशंकर सुकदेव पाटील यांचे आज दि. ४/८/२०२१ दुपारी ५ वाजतां अल्पशा आजाराने / वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत आज सायं. ६:३० वा. होईल. परमेश्वर त्यांना चिरशांती देवो ! हीच श्रीचरणी प्रार्थना ! भावपूर्ण श्रध्दांजली !


आपण सर्व आमच्या दुःखात सहभागी आहातच आपण आपले घरूनच श्रध्दांजली अर्पण करावी ही नम्र विनंती.


- शोकाकुल


श्री निळकंठ शिवशंकर पाटील


श्री श्रीकांत शिवशंकर पाटील




मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला


मुंबई :  शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.


श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचितांची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील असे पण सत्य आहेत.


श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

टिप्पण्या