environmental tax:old vehicles: जुन्या वाहनांना नोंदणी नुतनीकरण व पर्यावरण कर भरणे अनिवार्य; १५ दिवसांची मुदत

Mandatory renewal of registration and payment of environmental tax on old vehicles; Term of 15 days (file photo)



अकोला: जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या  दुचाकी, तीनचाकी वाहनांपैकी ज्या वाहनाची वयोमर्यादा नोंदणी दिनांक पासून १५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा वाहनांची नोंदणी १५ वर्षानंतर विधीग्राह्य नाही, त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी नुतनीकरण मोटार वाहन नियम १९८९ नियम ५२(१) अन्वये येत्या १५ दिवसांत करणे अनिवार्य आहे. अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली आहे.



या वाहनांना पर्यावरण कर भरणे आवश्यक


ज्या खाजगी वाहनांना नोंदणी दिनांक पासून १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. तसेच परिवहन संवर्गातील मालवाहतुक करणारे लोडींग ऑटो, टेम्पो, ट्रक तसेच सर्व बसेस यांना वयोमर्यादा आठ वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा वाहनांना पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे.



वाहनांचा लिलाव करण्याचीही तरतूद


विहीत कालावधीत पर्यावरण कराचा भरणा न केल्यास दोन टक्के प्रति महिना व्याज आकारण्यात येते. याबाबत शासनाने तसेच महालेखाकार यांनी थकीत पर्यावरण कराबाबत आक्षेप घेतला आहे. देय पर्यावरण कराचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा १९५८ कलम १२(बी) अन्वये वाहन अटकावून ठेवण्याची तसेच कराचा भरणा न केल्यास वाहनधारकाकडून जमीन महसुल कायदा २० अंतर्गत वसुली करण्याची तरतूद आहे. वाहनधारकाकडून देय कराची वसुली न झाल्यास जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव करण्यात येतो.



पंधरा दिवसांची मुदत


त्यामुळे १५ वर्षे पूर्ण झालेल्या खाजगी वाहनधारकांनी  व आठ वर्षे पूर्ण झालेल्या ट्रक, टेम्पो, बसेस या वाहनधारकांनी वाहनासह १५ दिवसांच्या आत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा व वाहनाची नोंदणी नुतनीकरण तात्काळ करून घ्यावे व पर्यावरण कराचा भरणा करावा. तसे न केल्यास विहित मुदतीनंतर, वाहन जप्त करण्याची व त्यानंतर लिलाव करण्याची कारवाई करण्यात येईल याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

टिप्पण्या