BJP Shiv Sena alliance: Akola: भविष्यात भाजप-शिवसेना युती होणार नाही; 'आम्ही एकला चलो' ची भूमिका घेतलीय- चंद्रशेखर बावनकुळे

There will be no BJP-Shiv Sena alliance in future;  We have taken the role of 'Let's go alone' - Chandrashekhar Bawankule




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महाविकास आघाडी सरकार सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करतात. चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या स्तरावर टीका करतात. ही नवीन संस्कृती महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने निर्माण केली आहे. यासाठीच भविष्यात अथवा आगामी निवडणूकांमध्ये भाजपा शिवसेना युती होणार नाही. कारण आम्ही 'एकला चलो' ची भूमिका घेतली असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 



जन आशीर्वाद यात्रा निम्मित चंद्रशेखर बावनकुळे काल पासून अकोला दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी भाजपाचे आगामी कार्यक्रम आणि उपक्रम विषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आमंत्रित केली होती.शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत त्यांनी युवा वॉरिअर्स अभियान, मराठा आरक्षण, वैधानिक मंडळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक सत्र आदी विषयावर विस्तृत मते मांडली.



युवा वॉरिअर्स अभियान



22 फेब्रुवारी पर्यंत 48  लोकसभा 288 विधानसभा प्रत्येक बुथवर युवाशक्ती कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असून, यासाठी सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जनसंपर्क अभियान विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. 



ओबीसी व मराठा समाजावर राज्यसरकार अन्याय करत आहे



ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय दोन्ही समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी यावेळी केला. हाच मुद्दा पुढे करीत, केंद्र सरकारकडे प्रत्येक बाबतीत बोट दाखवण्याचा प्रकार असून 2011 च्या जनगणने मध्ये 219 चुका राज्य सरकारने केले आहे. हा चुकीचा डाटा ओबीसींवर अन्याय होणार नाही का? 2019 आणि 2011 मध्ये ओबीसींची संख्या वाढली नाही काय? यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव या ग्रामपंचायतीने ओबीसींचा डाटा जमा करण्याची पद्धत सांगितली आहे. हीच पद्धत राज्यसरकारने अवलंबून ओबीसींना न्याय द्यावा. ओबीसी आरक्षण नाकारणार नाही. उलट राज्य सरकारने कोर्टामध्ये ओबीसींच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले. 



नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध

प्रत्येक बाबतीमध्ये राज्य सरकार  एक क्रमांक असल्याचा दावा करते. परंतु भ्रष्टाचार, खंडणी, भाई -भतिजा वाद, जनतेची फसवणूक यातही एक नंबरवर आहे. मंत्रालयात अन आता घरून बसून काम करण्यातही एक नंबर आहे.इतकंच नाहीतर विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रकारात सुध्दा एक नंबरचे सरकार असल्याचे म्हणत नारायण राणे यांच्या अटकेचा बावनकुळे यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.



पत्रकार परिषदेत यांची उपस्थिती

यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा,  हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, किशोर पाटील, जयंत मसने, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडफोटे, गिरीश जोशी, हरिभाऊ काळे, विनोद मनवाणी, उमेश गुजर, अक्षय जोशी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या