Armed robbery Crime: Akot कोरोना लसीकरण पथक असल्याचा बनाव करून अकोटात भरदिवसा सशस्त्र दरोडा; दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद

Armed robbery all day in Akota pretending to be a corona vaccination squad




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना लसीकरण पथक असल्याचा बनाव करीत अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आज भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना  घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी घरातील तिघांना गंभीर मारहाण केली. तोडांत बोळे कोंबली. दोराने हातपाय बांधून एका खोलीत कोंडून ठेवले होते. दरम्यान,पोलीस दरोडेखोरांचा सुगावा लावत असून,हे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेराबद्ध झाले आहेत. 


 बुधवार वेस परिसरात ही घटना घडली


अकोट शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या जवाहररोड लगतच्या बुधवार वेस परिसरात ही घटना घडली. या परिसरात  व्यापारी अमृतलाल सेजपाल यांचे घर आहे. ते आपल्या कुंटबासह माळ्यावर राहतात. त्यांच्या घरी आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३ वाजता सुमारास काही महिला आणि पुरुष आले. त्यांनी  दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे सांगितले. यावेळी दरवाजातच सेजपाल यांची नात हिने 'मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नाही', सांगितले. त्यामुळे या बनावटी कोरोना लसीकरण पथकाने घरात कोणकोण आहे, अशी विचारणा केली असता नात डेलिशा हिला शंका आल्याने तीने ओळखपत्र मागितले. मात्र, दरोडेखोर टोळीतील एका महिलेने दरवाजा जोरात आत लोटत घरात प्रवेश मिळविला. घरात असलेले  वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल, त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल आणि नात देलिशा यांना मारहाण करीत त्यांच्या तोडांत बोळे कोंबून वर चिकटपट्या लावल्या. दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले. दरम्यान, दरोडेखोरांनी अमृतलाल सेजपाल यांना सशस्त्र मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर घरातील सामान अस्तावेस्त फेकून कपाट फोडली.


याच दरम्यान दुसरीकडे एका खोलीत बंद असलेल्या आजी आजोबा आणि नातीने मोठ्या धैर्याने चिकटपट्ट्या आणि बोळे काढून खिडकी मधून आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली. तिघेही घाबरलेल्या आणि धास्तावलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, दरोडेखोरांनी घरातून पळ काढलेला होता. अमृतलाल सेजपाल जखमी असल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. विशाल इंगोले यांनी उपचार केले.



अमृतलाल सेजपाल यांचा मुलगा यश्वीन, सुन भावना व लहान नातु शौर्य बाहेरगावी खामगाव गेले होते. दरोडेखोरांनी घरातील  एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम, दागिने असा ऐवज लुटून नेला आहे.




सीसीटीव्ही क्लिप पोलिसांच्या हाती

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस निरिक्षक प्रकाश अहिरे व त्यांच्या चमूने धाव घेतली. घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर डिबी स्काँडसह पोलीस कर्मचारी विविध दिशेने पाठविले आहे. घटनास्थळी श्वान पथक बोलावून परिसराची पाहणी केली. दरम्यान,  दरोडेखोर या परिसरातून जात असल्याची एक सीसीटीव्ही क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. यावरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.हे दरोडेखोर लवकरच जेरबंद होतील,असा विश्वास पोलिसांना आहे.


टिप्पण्या