Akola: close liquor shop; संसाराची राखरांगोळी करणारे दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा मळसुरात एल्गार!

जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांना निवेदन सोपविताना मळसूर गावातील महिला



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: आमच्या संसाराची राखरांगोळी करणारे देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, या मागणीसाठी पातूर तालुक्यातील मळसूर (सोपीनाथ) येथील महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना निवेदन सादर करीत महिलांनी मतदानाची मागणी केली आहे. 




दोन वर्षांपूर्वी याच मागणी संदर्भात गावकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आठ दिवस उपोषण केले होते. मात्र, यावेळी शासनाच्या अधिकृत नमुन्यात निवेदन सादर करून जिल्हाधिकारी यांना मतदान घेण्यासाठी साद घातली आहे. 



जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सुद्धा गंभीर दखल घेत कारवाई करण्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर गावकरी महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.




विठ्ठलराव देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य वैशाली अनिल काळे, मथुरा समाधान देवकते, सुनीता पद्माकर काळे, प्रयागबाई संपतराव देवकते, वैशाली विवेक देवकते,  लीला सुपाजी ढोकने, लता गजानन करहे, पुंजाबाई रामकृष्ण पांडे, द्वारकाबाई हनवते यांच्या सह बाराशे महिलांच्या सह्या आहेत. ग्रामस्थ महिलांनी घेतलेल्या या भूमिके मुळे देशी दुकान मालकाचे धाबे दणाणले असून, पुढील होणाऱ्या कारवाई वर परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या