Doctors day 2021: डॉक्टर्स डे’ निमित्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार; संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता पुर्ण क्षमतेने तयार रहा- जितेंद्र पापळकर




अकोला,दि.1: ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने व कोविड-19 महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना यौद्धा म्हणून केलेल्या कार्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता पूर्ण क्षमतेने तयार रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.


यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, डॉ. दिनेश नैताम, डॉ. श्यामकुमार सिरसाम, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल,  जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी तसेच वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोरोना महामारीमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये वैद्यकीय अधिकारी व संबंधित सर्व यत्रंणेने केलेल्या कार्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतूक केले व सर्वजणांनी उभे राहून त्यांच्या कार्याचा सन्मानजनक गौरव  केला. कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करुन जिल्यारीला कोरोना मुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक उणीवा दिसून आल्या परंतु शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने दुसऱ्या लाटेला थोपवण्यास मोलाचे कार्य केले. जिल्हा आता ऑक्सीजनच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता पहिल्या व दुसऱ्या लाटेतील उणीव दुर करुन पुर्ण क्षमतेने तयार रहावे. तसेच कोरोना रुग्णांना स्थानिक व ग्रामस्तरावरच उपचार मिळतील याकरीता यंत्रणेने नियोजन करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता कुसूमाकर घोरपडे यांनी केले. तर सुत्रसंचालन दिलीप सराटे व आभार प्रदर्शन डॉ. दिनेश नैताम यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या