Contempt of court:Akola:pusad कोर्टाच्या आदेशाचा अवमान; पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षासह तिघांविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार

                                      file image



अकोला : बँकेत तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेने ताबा घेवू नये, असा कोर्टाचा आदेश असतांना देखील पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि विशेष वसुली अधिकारी यांनी मालमत्तेचा बळजबरी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कर्जदाराकडून सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.




अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक पुसद या बँकेच्या नागपूर बुटीबोरी शाखेतून अकोला येथील प्रशांत मधुकरराव रायपुरे व अतुल मधुकरराव रायपुरे यांनी त्यांच्या भागीदारी फर्मसाठी मालमत्ता तारण देवून कर्ज घेतले आहे. हे कर्ज थकीत झाल्यानंतर या कर्ज प्रकरणाच्या अनुषंगाने रायपुरे यांनी उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. या कर्ज प्रकरणात तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेने ताबा घेवू नये, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे.



प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना व मालमत्तेचा ताबा घेवू नये असा आदेश असतांनाही बँकेचे अध्यक्ष शरद आप्पाराव तसेच विशेष वसुली अधिकारी गजानन बापुराव पोळकट व आनंद धोटे यांनी अकोला येथे येवून रायपूरे यांच्या राऊतवाडी भागातील मधुनंदा अपार्टमेंट मधील त्यांच्या मालकीच्या फ्लॅट क्र. ३०१, ३०२, ३०३ व ४०३ अशा एकूण ४ फ्लॅटमध्ये काही लोकांना सोबत घेवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती होताच रायपूरे त्या ठिकाणी पोहोचले व या तिघांनाही गैरकृत्य थांबविण्यास सांगितले.



या स्थावर मालमत्तेवर मनाई हुकुम असतांना बँकेकडून ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी रायपूरे यांना शिवीगाळ करीत जीवे मारून टाकण्याची धमकी देखील दिली, याबाबतची तक्रार प्रशांत रायपुरे व अतुल रायपुरे यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन व अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिली आहे. विशेष म्हणजे पुसद अर्बन बँक कडून न्यायालयाचा अवमान झाला आहे. 



२४ जून रोजी तारण मालमत्तेच्या लिलावाची जाहिरात अकोल्यातील दोन वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केली होती. त्यानंतर या प्रकाशित जाहिरातीवर रायपूरे यांनी हरकत घेणारी जाहिरात त्याच वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केली आहे. तरी देखील बँकेने पदाधिकारी यांच्या मार्फत ही मालमत्ता काही लोकांना दाखविण्याचे गैरकृत्य केले आहे. यासोबतच न्यायालयाचा आदेश मोडून मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे रायपुरे यांनी  तक्रारीत नमुद केले आहे. याबाबत बँकेकडे विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही.

टिप्पण्या