Back to School : कोविड मुक्त गावात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचे आवाहन; गर्दी होणारे कार्यक्रमांवर कडक निर्बंध

                                     file image




अकोला:  कोरोना संसर्ग आटोक्यात येत असून ठिकठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्यास शासन परिपत्रकान्वये परवानगी दिली आहे, त्यानुसार अकोला जिल्ह्यातील शाळाही टप्प्या टप्प्याने सुरु कराव्या, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. वैशाली ठग व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप तायडे यांनी केले आहे.


शासनाने या संदर्भात ७ जुलै रोजी परिपत्रकाद्वारे  सुचना जारी करुन १५ जुलै पासून  राज्यातील कोविड मुक्त भागात शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव करुन  मार्गदर्शक सुचनांनुसार  पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. 




अकोला जिल्ह्यातही जिल्हाधिकारी अकोला यांच्या मान्यतेने  कोविड मुक्त भागात शाळा सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक यांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक) डॉ. वैशाली ठग व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप तायडे यांनी केले आहे.


शासन परिपत्रकानुसार  ग्रामपंचायतींनी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. शाळांच्या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल त्यात तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे सदस्य तर ग्रामसेवक हे सदस्य सचिव असतील.



शाळा सुरु करण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी


शाळा सुरु करण्यापुर्वी किमान एक महिना आधीपर्यंत त्या गावात कोविडचा रुग्ण आढळून आलेला नसावा. शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे, तसेच नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे. गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळा परिसरात प्रवेश देऊ नये. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करावी व शाळेचे निर्जंतूकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण व वैद्यकीय  अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावे. शाळा सुरु करतांना विद्यार्थ्यांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवावे.  एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्ग खोइळीत जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी , सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करुन घेणे. शाळेतील शिक्षकांनी गावातच रहावे व सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर न करण्याची दक्षता घ्यावी. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत आढावा घ्यावयाचा आहे.


शाळांमध्ये तापमापक(इन्फ्रारेड डिजीटल), जंतूनाशक, साबण पाणी इ. आवश्यक वस्तूंची उपलब्धता करावी. शाळेची  स्वच्छता व निर्जंतूकीकरण  स्थानिक प्रशासनाने करावे. वाहतुक सुविधेचेही निर्जंतुकीकरण करावे.  ज्या शाळांमध्ये विलगीकरण केंद्र होते ते स्थानिक प्रशासनाने इतरत्र हलवावे. शाळा इमारत शाळा व्यवस्थापन समितीकडे हस्तांतरीत करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने इमारत पूर्ण निर्जंतूक करुन द्यावी. शाळेच्या दर्शनी भागात  परस्पर अंतर राखणे, मास्कचा वापर,  इ. बाबत सुचना  प्रदर्शित कराव्या. शाळेत परिपाठ स्नेहसंमेलन इ. गर्दी होणारे कार्यक्रमांवर कडक निर्बंध आहेत. शिक्षक पालक बैठकाही ऑनलाईन घ्याव्यात. आजारी व लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्याला पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांची उपस्थिती ही पुर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल इ. सुचनाही परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या