Akola:crime news: अडत्यांची कोटीने फसवणूक करणाऱ्या शिवकुमार रूहाटीया व जावेद कादरी यांना अटक, रुहाटीयाच्या प्रकृतीत बिघाड उपचारार्थ सर्वोपचारात


 

अकोला:  कृषी उत्पन्न बाजार समिती  अडत्यांना १ कोटी ८७ लाखाचा घातला गंडा घातल्याची तक्रार रामदास पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून ख्यातनाम रूहाटिया ग्रुप अंतर्गत असलेल्या नर्मदा साल्वेक्य प्रा.लि संचालक शिवप्रकाश उर्फ शिवकुमार कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन संचालक शेख जावेद शेख हसन कादरी या दोघांना शनिवारी रात्री अटक केली आहे.अटकेनंतर शिवप्रकाश रूहाटिया यांची प्रकृती बिघडल्याने रूहाटीया यांना रात्रीच सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. आर्थिक फसवणुक झालेल्या दहा अडत्यांच्या वतीने सतीश शांतीलाल जैन यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.



शहरातील दोन बड्या हस्तीना अटक झाल्याने बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका आमदारासह काही व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही कंपन्यांचे संचालक केवळ एक कोटी १० लाख रुपये देण्यास तयार झाले. यापेक्षा अधिक एकही रुपया देणार नसल्याची भूमिका या कंपन्यांनी घेतल्यामुळे प्रकरण आपसात करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन विभागाचा थेट परवानाधारक नर्मदा साल्वेस प्रा.लि. ने सोयाबीन खरेदीसाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा शेख जावेद शेख हसन कादरी याला अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. नर्मदा साल्वेक्यसाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनने अकरा अडत्यांकडून सोयाबीन खरेदी केली. जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त क्विंटल सोयाबीन विकला गेला आहे.




हा संपूर्ण व्यवहार 1 कोटी 87 लाख रुपयांचा आहे. परंतु, नर्मदा आणि लक्ष्मी फर्मकडून दोन महिने उलटूनही व्यवहाराचे पैसे दिले गेले नाही. त्यामुळे सर्व अडत्यानी नर्मदा साल्वेस यांच्याकडे व्यवहाराचे पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याबाबत अडत्यांनी शांततेत प्रकरण निपटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही बाजूकडून नकारघंटा येत असल्याने अखेर अडत्यानी रामदास पेठ पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.



अडत्यानी दिलेल्या तक्रारी वरून रामदासपेठ पोलिसांनी आरोपी विरोधात भादवि कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून, शिवप्रकाश कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा जावेद हुसेन कादरी यास अटक केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहे.


1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक


कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अडत्यांची एकूण 1 कोटी 87 लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. यामध्ये अजय भीमराव चिंचोलकर यांचे 29 लाख 88 हजार 612, प्रशांत प्रल्हादराव देशमुख यांची 15 लाख 29 हजार 757 व 15 लाख 35 हजार 100 रुपये, भास्‍कर जगन्‍नाथ मानकर यांचे 19 लाख 46 हजार 203, अतुल मोहनराव राठोड यांची 39 लाख 2 हजार 233,अनिल कांतीलाल जैन यांची 37 लाख 5 हजार 646, स्नेहल प्रकाश गांधी यांची 2 लाख 41 हजार 756 रुपये सतीश शांतीलाल जैन यांची 10 लाख 69 हजार 952 रुपये, अमर कमलकिशोर मालानी यांची नऊ लाख 50 हजार 530 रुपये, अजय रामकुमार अजमेरा यांची 1 लाख 61 हजार 992 रुपये, अरुण मधुकर सिंगरूप यांची 7 लाख 46 हजार 602 रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. 


टिप्पण्या