Akola: Vitthal temple:Ashadhi: आषाढी एकादशी निम्मित प्राचीन श्रीविठ्ठल मंदिरात परंपरेने अखंड हरीनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ


Traditional Akhand Harinam Week begins in the ancient Shri Vitthal temple on the occasion of Ashadi Ekadashi





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जुने शहर येथील 318 वर्ष  पुरातन श्रीविठ्ठल मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात परंपरेनुसार आषाढ शुद्ध नवमी म्हणजे आज 18 जुलै रोजी प्रथेप्रमाणे झाली. 




सर्वप्रथम वेदापाठी ब्राह्मण वृंदानी नित्य पूजा अर्चना करून संकल्प केला. या संकल्प पूजेचे यजमानपद मंडळाचे कार्यकर्ते  विजय बंकूवाले यांनी सपत्नीक भूषविले. यावेळी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, पदाधिकारी यशोधन गोडबोले, नितीन खोत, विकास वाणी यांची उपस्थिती होती.




तसेच या सप्ताहातच नवनाथ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, हे पारायण वेदशास्त्र संपन्न ज्योतिषचार्य  दत्ता महाराज जोशीं हे करीत आहेत.



88 वर्षांची परंपरा


हा अखंड हरीनाम सप्ताह गेली 88 वर्ष साजरा होत आहे. सुरुवातीला मंडळाचे प्रथम सर्वसेवाधिकारी स्व. मांगीलाल शर्मा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या सप्ताहास सुरुवात केली. तेव्हापासून गेली 88 वर्ष हा अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. सध्या गेली 35 वर्ष सर्वसेवाधिकारी आमदार  गोवर्धन शर्मा यांचे मार्गदर्शनात आणि व्यवस्थापक  रमेश अलकरी यांचे कुशल नेतृत्वात हा अखंड हरीनाम सप्ताहाचा कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये अखंड वीणा वादन आणि विठूनामाचा जयघोष, सोबत भजन प्रवचन कीर्तन आदी कार्यक्रमांची दरवर्षी रेलचेल असते. सप्ताहाच्या समाप्तीला श्री पंढरीनाथाची भव्य शोभायात्रा शहरात निघते. त्याच्या दर्शनार्थ भाविकांची रिघ लागते. तसेच मुख्य अभिषेक पूजा आषाढी एकादशीचे दिवशी पहाटे 4 वाजता मंडळाचे सर्वसेवाधिकारी  गोवर्धन शर्मा व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे हस्ते संपन्न होत असते.


मागील वर्षीपासून कोविड परिस्थितीमुळे जरी कार्यक्रमांवर मर्यादा आली असली तरी धार्मिक परंपरेनुसार आणि प्रथेप्रमाणे या ही वर्षी हा अखंड हरीनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

टिप्पण्या