Akola Today's news: BJP:sport: भाजयुमोचे आंदोलन व रणधीर सावरकर यांचा पाठपुरावामुळे कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर व इतर बातम्या वाचा

 



        अकोला आजचे बातमीपत्र





अकोला: भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करते. विद्यार्थी शेतकरी व्यापारी तसेच समाजातील पीडित वंचितांच्या पाठीशी उभी राहते. यामध्ये भारतीय जनता पक्ष सतत न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरत असून, माजी केंद्रीय राज्यमंत्री  संजय  धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी भाजयुमोचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोच्या कृषी तंत्रज्ञान यांच्या विद्यार्थ्यांच्या कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या प्रवेशासंदर्भात कृषी विद्यापीठ येथे आंदोलन केले होते. 




राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जन आंदोलन उभे केले. यासंदर्भात अकोला पंजाबराव कृषी विद्यापीठाने आंदोलनाची दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर करावा, अशी विनंती महाराष्ट्र कृषि अनुसंधान केंद्र यांच्याकडे केली आहे. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी  यासंदर्भात भाजयुमोच्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना चर्चा करून न्याय देण्याची मागणी केली होती.



राज्यातील  विनाअनुदानित महाविद्यालयात 45 हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व भाजपा भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कानेरकर यांच्या पाठपुराव्याने शक्य झाले आहे. आज या संदर्भात राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे.



आमदार रणधीर सावरकर यांनी या संदर्भात राज्याचे कृषिमंत्री, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता.   विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर न्याय देण्याची मागणी केली होती. पंजाबराव कृषी विद्यापीठ सोपान कानेरकर जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख  उमेश गुजर व विविध पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना थकित शुल्क व नोंदणी परीक्षेचे अर्ज काढण्यात येऊ नये व विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधीचा सुद्धा मार्ग सुकर होणार आहे. याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची पाठपुरावा करण्याची शैली व सातत्याने न्याय मिळवून देण्याची भूमिका केंद्रीय माजी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात निर्माण झालेले आमदार सावरकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत अठरा तास काम करणारे नेतृत्व आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी आंदोलन केले आहे. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सुद्धा याची दखल घेतली आहे.


…………...



नकाशी जि.प. शाळेत वृक्षारोपण



अकोला: नकाशी येथील जि.प. शाळेमध्ये देगावचे केंद्रप्रमुख मनसागर वानखडे हे तपासणीकरीता आले असता, त्यांचे उपस्थितीत मुख्याध्यापिका विमल डोंगरे यांनी सहकारी शिक्षकांचे सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी केंद्र प्रमुख वानखडे यांचे मार्गदर्शनात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शीतलभाऊ तायडे यांचे प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक सौ. डोंगरे, पदवीधर शिक्षक गजानन वानखडे, शिक्षक विजय, सुभाष कदम, व सहाय्यक शिक्षकांनी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. यावेळी श्री मगर यांनी प्रत्येकी एक झाड लावून शाळा निसर्गरम्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व शिक्षक आणि सहाय्यक शिक्षिका उपस्थित होत्या.


…………………...



बस स्थानक जवळ नीलगिरीचे झाड उन्मळून पडले



अकोला: नवीन बसस्थानक परिसरातील एक जुने नीलगिरीचे झाड आज बुधवारी  सकाळी उन्मळून पडले.यामध्ये तीन ऑटो रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले.सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे विशाल वृक्ष पडले असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती शहरात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.


…………………..



अ.भा. शिकाऊ उमेदवारी परीक्षेसाठी अर्ज मागविले


अकोला: १११ व्या अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षेसाठी विविध आस्थापनांमधील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेतलेल्या  प्रशिक्षणार्थींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दि.१५ एप्रिल २०२१ पर्यंत ज्या ज्या उमेदवारांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी आपापल्या संबंधित आस्थापनांनी संपर्क साधून  आपले परीक्षा अर्ज भरावे, अधिक मार्गदर्शनासाठी  अंशकालिन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक  सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला यांनी कळविले आहे.


……………………...



केंद्रशासनाच्या आयकर विभागाची खेळाडु भरती 2021 करीता राष्ट्रीय शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणीत करण्याबाबत.


 

अकोला: सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देशानुसार केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरीलसहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुकरीता विविध पदाच्या खेळाडु भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. सदर जाहीरातीमधील परिच्छेद 2 व 3 नुसार भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय कीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडु पात्र ठरणार आहेत. परिच्छेद 4 व परिच्छेद 5 मधील मुद्दा क्रमांक 4 अन्वये सबंधित खेळाडुंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी क्रीडा संचालनायाद्वारा प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे.



या खेळाडु भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातुन अनेक खेळाडु क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी प्रमाणीत करुन घेण्यासाठी व्यक्तीश: उपस्थित राहुन अर्ज दाखल करीत आहेत. राज्यातील कोवीड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावाचा विचार करता, राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी प्रमाणीत करुन घेण्यासाठी राज्यातील खेळाडुंनी पुणे येथे व्यक्तीश: उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते. यास्तव आयकर विभागाच्या खेळाडु भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या अकोला जिल्हयातील पात्र खेळाडुंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी प्रमाणीत करुन घेण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा प्रमणापत्रासह आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम, स्टेशन रोड, अकोला येथे दिनांक 30 जुलै,2021 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे श्री. आसाराम जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला यांनी कळविलेले  आहे.







टिप्पण्या