Akola Rain live update: पावसाचा कहर: मुसळधार पावसाचा महावितरणला झटका; पाचशेच्या वर वीज खांबाचे नुकसान, अजूनही काही गावे अंधारातच

दुरूस्तीसाठी महावितरणचे युध्दस्तरावर प्रयत्न 


अकोला: मुंबई, कोकण सह राज्यात सर्वत्र पावसाने कहर केला आहे. बुधवार २१ जुलै रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार झटका जिल्ह्यातील महावितरणला बसला आहे. पाचशेवर वीज खांब आणि त्यावरील वीज वाहिन्यांचे नुकसाने झाल्याने अनेक गावे अंधारात गेली होती. महावितरणने बिकट परिस्थितीतही युध्दस्तरावरील प्रयत्नाने बऱ्याच गावाचा वीज पुरवठा पुर्ववत केला आहे. परंतू काही गावे संपर्काबाहेर असल्याने अजूनही अंधारातच आहे. शिवाय तेथील नुकसानाची परिस्थिती अद्यापही महावितरणला कळली नाही. मोर्णा नदीची पुरस्थिती कमी होताच बाकी गावांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली आहे. 


वीज खांब पुरात गेले वाहून


विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदिकाठची गावे पाण्यात गेली आहे. पुराचा वेग एवढा प्रंचड होता की,या पुरात मोर्णा नदिच्या काठालगतचे १५ उच्च दाब वाहिनीचे तर २ लघूदाब वाहिनीचे वीज खांब आणि त्यावरिल वीज वाहिनी वाहून गेली आहे. उच्च व लघूदाब वाहिनीचे १७५ वीज खांब जमीनदोस्त झाले आहे. ६१ वीज खांब तुटले आहे ,तर २८१ वीज खांब जमिनीलगत झुकले आहे. याचबरोबर १० वितरण रोहित्रेही पडले असल्याने मोर्णा आणि पुर्णा नदिपरिसरातील २४ गावे ही अंधारात गेली होती.

   


बिकट परिस्थितीवर मात


अशा परिस्थितीतही महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यासह, कंत्राटदारांच्या मदतीने युध्दस्तरावर कामाला सुरूवात केली. सर्वत्र चिखल, पाणी असल्याने वीज खांब, वीज वाहिन्या वाहून नेणे आणि अशा दलदलित वीज यंत्रणेची उभारणी करणे अशक्यप्राय अशी कामे करण्यात आली. परिणामी निंभी, म्हैसपुर, रिधोरा, सुकोडा, पाचमोरी, न्यु सुकोडा, जुना सुकोडा, अमानतपुर, ताकोडा, जलम, टाकळी, वाकापूर, गडंकी व  RPTS या भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. 



अर्धे गावे अजूनही अंधारात


लोणी, भोडव, सांगवी, मोहाडी, कानडी, वाखी, आखतवाडा, आगर, लोणाग्रा, दुधाळा, मांडला, कांचनपुर, बदलापूर, नवथळ आणि खेकडी या गावाचा वीज पुरवठा खंडित आहे. वीज पुरवठा बंद असलेली सर्व गावे ही उगवा वाहिनीवर असल्याने या वाहिनीचे वीज खांब मोर्णा नदिच्या पुरात वाहून गेले आहे. शिवाय मोर्णा व पुर्णा नदिच्या पुरस्थितीमुळे या गावांना  जोडणारे रस्ते बंद असल्याने संपर्क होणे कठिण झाले आहे. पुरस्थिती ओसरताच या गावाचाही वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. 



हे करताहेत अहोरात्र मेहनत

विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनत आणि उपकार्यकारी अभियंता सारंगधर केनेकर यांच्या नेतृत्वात आणि अभियंते अजय भोकरे, हेमलता पाटील, दीपक देशमुख, प्रवीण बडुकले, सचिन कळूसे यांच्यासह जनमित्र श्रीशिव निंबेकर, प्रशांत शेळके, जितू गवई, शुभम मोहोड, अभय भारसाकळे ,संजय कागणे ,  विजय केने, ठेकेदार अनेश्र्वर इंजिनिअरिंग कंपनी, जयश्रीकृष्णा इलेक्ट्रिकलचे कर्मचारी कार्यरत आहेत.याशिवाय संबंधित सर्व परिस्थितीवर मुख्य अभियंता अनिल डोये, अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट हे  विशेष लक्ष ठेवून आहेत.

टिप्पण्या