Nagpur horror:Murder:crime story: क्रोधाग्नीच्या भडक्यात पाच होरपळले; हत्याकांड घडत असताना झाले ऑडिओ रेकॉर्डिंग; घटनाक्रम आला समोर

           

          हत्याकांड मागील गूढ

       ॲड. नीलिमा शिंगणे-जगड


                    घटनास्थळ: आरोपीचे घर



ठळक मुद्दे

*हत्येचा कट आधी पासूनच मनात रचला

*ऑनलाईन शॉपिंग ऍप वरून चाकू खरेदी

*ऑडिओ रेकॉर्डिंगने घटनाक्रम उघड

*सासरे घराबाहेर होते म्हणून बचावले

*पंधरा वर्षपूर्वी केला होता प्रेमविवाह

*मेहुणी सोबतही प्रेम संबंध




नागपूर: मध्यमवर्गीय चाळीशीतला युवक. साधारण दिसायला. स्वभाव मनमिळावू. सर्वसामान्य राहणी. कुटुंब वत्सल. परिवाराच्या सुखासाठी अपार कष्ट करणारा. व्यवसायने टेलर असलेला. त्यातही शर्ट शिवण्यात मास्टरकी मिळवलेला. असे सर्व चांगले असताना आयुष्यात अचानक असे काय घडलं की, आपल्या कुटुंबियांचा एका रात्रीतून खातमा करावा? रविवारीच्या काळरात्री क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की, तो रात्रभर हत्या करत सुटला. एका पाठोपाठ पाच हत्या करून, स्वतःची देखील जीवनयात्रा संपवली. हा भयंकर थरार सोमवार 21 जून रोजी एकीकडे जगभर आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असताना, सकाळी साडे दहाच्या सुमारास महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मधील टिमकी पाचपावली परिसरातील चिमाबाईपेठेत उघडकीस आला. एक मोठे हत्याकांड उघडकीस आल्याने संत्रा नगरी हादरली.




आलोकची पार्श्वभूमी

                        आरोपी व त्याची पत्नी



15 वर्षांपूर्वी आलोकने पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी त्याला आपल्या घरदारातून बहिष्कृत केल्यासारखे केले होते. त्याच्या सोबत बोलत देखील नव्हते. मात्र, या गोष्टींची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला. व्यवसाय वाढविला. पत्नी विजयावर खूप प्रेम करायचा. मुलगी परी आणि मुलगा साहिल या दोन्ही मुलांचा खूप लाड करायचा. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस राबायचा.  मेव्हणी (साळी) वरही त्याचा खूप जीव होता. नातेवाईक, शेजारी, दुकानातील ग्राहक यांच्या सोबत अदबीने वागत होता. असे असताना त्याने या सर्वांनाच एवढ्या निर्दयपणे कसे मारले असेल, असा प्रश्न नातेवाईकांसह त्याच्या परिचिताना पडला. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर काही अवधीतच उपराजधानी सह अवघ्या राज्यात ही वार्ता पसरली. या घटने मागील नेमके कारण काय असावे की, अत्यन्त साधारण असणाऱ्या माणसाने एवढा मोठा थरार केला. त्याचा राग एवढा टोकाला का गेला?  या सर्व प्रश्नांचे उत्तर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून मिळाली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या थरार, भयंकर हत्याकांडाला अनैतिक संबंध, आलोकची मानसिक व शारीरिक विकृती आणि यातून निर्माण झालेली एकूण परिस्थिती कारणीभूत ठरली. तर काही अंशी कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेली लॉकडाउन परिस्थिती जबाबदार असल्याचे देखील लोकांच्या चर्चेतून मत व्यक्त आहे. लॉकडाउनमुळे अलोकचा व्यवसाय ठप्प पडला होता.



अमरावतीला घेतला होता फ्लॅट


आरोपी अलोक मादूरकर हा शर्ट तयार करण्यात मास्टर होता. टेलरिंग व्यवसाय भरभराटीस आल्याने तो चार वर्षांपूर्वी पत्नी मुलांसह अमरावतीला वास्तव्यास गेला होता. मेहुणी अमिषालाही त्याने सोबत नेले होते. अत्यंत देखणी असलेल्या अमिषावर आलोक फिदा झाला होता. दरम्यान अलोकने 50 लाखांचा फ्लॅटही घेतला होता. परंतु मागीलवर्षी कोरोनाने कहर केल्याने लॉकडाऊन लागला. त्यामुळे बँकेने थकीत कर्ज वसूल करण्यासाठी फ्लॅट ताब्यात घेतला. परिणामी सहा महिन्यांपूर्वी अलोक कुटुंबासह नागपुरात परतला. नागपुरात त्याचे सासू, सासरे पाचपावलीतील बागल आखाडा, चिमाबाई पेठ परिसरात भाड्याने राहायचे. समोरच्या भागात आलोकने घर भाड्याने घेतले. तेथे तो पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होता.



अनैतिक संबंधाची किनार


कोणताही गुन्हा घडण्यामागे काहीतरी कारण, काहीतरी उद्देश हा असतोच. या हत्याकांड मागे देखील अनैतिक संबंधाची किनार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेहुणी आमिषा ही केवळ 5 ते 7 वर्षांची होती. ती लहानपणा पासूनच आलोककडे राहायची. अलोकने देखील तिची सर्व जबाबदारी स्वीकारली होती.  मात्र, नवतरुणी अमिषाला पाहून अलोकची नियत बिघडली. तर ऐन तारुण्यात अमिषाचा देखील पाय घसरला. या दोघांनी नात्यातील सर्व समाज मर्यादा तोडल्या होत्या. नंतर मात्र, दुप्पट वयाच्या भावजी सोबत तीला रमणे शक्य नव्हते. दरम्यान तिचा मित्रवर्ग वाढत गेला. हे अलोकला सहन होत नव्हते. त्यामुळे अलोकचा क्रोध, आणि हस्तक्षेप अमिषाच्या जीवनात नको तेवढा वाढत गेला. त्यांच्यात नेहमी तू-तू मै-मै होत होती. नंतर प्रकरण मारहाणी पर्यंत पोहोचले. अलोक अमिषावर हक्क बजावू लागला. अलोकच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी अमिषाची धडपड चालली होती. सततची मारहाण, राग, क्रोध यात ती गुदमरत होती. शेवटी तिनेही हे कुठे तरी थांबावे, यासाठी ती देखील त्वेषात आली. अखेर आलोकच्या छळाविरुद्ध अमिषाने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.  पोलिसांनी या प्रकरणात अलोक विरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे प्रकरण जास्तच चिघळत गेले. 



चार दिवसांपूर्वीच ती वडिलांकडे परतली

दोन महिन्यापासून अमिषा आणि आलोक मधील वाद टोकाला गेला होता. यामुळे अमिषा तिच्या कळमेश्वर मधील बहिणीकडे निघून गेली होती. चार दिवसांपूर्वीच ती वडिलांकडे परतली होती. ती तिच्या मित्रांकडे गेली असावी, हा संशय बळावल्याने आरोपी आलोक वेड्यागत झाला होता. अमिषाला तीन दिवसांपासून त्याने अक्षरश: धारेवर धरले होते. त्यानंतर पुन्हा घटनेच्या दिवशी वाद उफाळून आला. रात्री 9 वाजताच्या सुमारास अलोकचे सासरे नोकरीवर निघून गेल्या नंतर सासू लक्ष्मीबाई आलोकच्या घरी त्याला जाब विचारण्यासाठी गेली होती. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे.




अखेर संतापाचा भडका उडाला

         घटनास्थळ:आरोपीची सासरवाडी


रविवार 20 जुनची रात्र. काळरात्र ठरली. रात्री 11.15 च्या सुमारास आमिषाने आपल्या मित्राला फोन करून आलोकला आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगितले होते. यानंतर सासू आलोकच्या घरी गेली. तेथे त्यांचे जोरदार भांडण झाले. येथे आलोकच्या मनात संतापाची ठिणगी पडली. यावेळी पत्नीने देखील त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारुन आणखीनच आगीत तेल ओतले. अन नवरा-बायको सुद्धा कडाक्याचे भांडण झाले. या सर्व परिस्थितीला आमिषाच  कारणीभूत असल्याचे अलोकच्या डोक्यात शिरले. अन क्रोधअग्नि पेटला. येथूनच एका भयंकर घटनाक्रमाची सुरुवात झाली. आणि एका रात्रीत एक कुटुंब होत्याचे नव्हते झाले.



अमिषाने शरणागती पत्करली 


प्रचंड रागाच्या भरात आरोपी अलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याचा रुद्र अवतार व हातात धारदार शस्त्र असल्याचे पाहून अमिषा पुरती घाबरून गेली. शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केला. नंतर तिचा गळा कापला. अर्धा वस्त्र अवस्थेत असलेला आमिषाचा मृतदेह सोडून अलोक निघण्याच्या तयारीत असतानाच त्याची सासू बाहेरून दारात धडकली. क्षणाचा विलंब न करता त्याने सासूचीही गळा चिरून हत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले.




घरी परतुन पत्नी अन मुलांची हत्या

परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून निष्कर्ष 



अमिषा आणि सासूची हत्या करून मध्यरात्रीनंतर अलोक आपल्या घरी परतला. यावेळी त्याने पत्नी विजयाला जबरदस्तीने शय्यासोबत करण्याची मागणी केली असावी. मात्र, अलोकच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बघून विजयाने नकार दिल्याने, अलोकने विजयाचा देखील धारदार शस्त्राने गळा चिरला असावा. विजयाने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली असावी. परीने विरोध केल्याने  आलोकने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही ठार केले असावे. आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्याचीही हत्या केली असावी. यानंतर पाश्चातातून अलोकने स्वतःचे जीवनही संपविले असावे, असा प्रथम दर्शनी परिस्थिती वरून  पोलिसांनी कयास बांधला आहे. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढून, घटनाक्रम जुळवून पाहिला आहे. कारण याला पुष्टी देणारा ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे.



आमिषाच्या मोबाइल फोन मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग

         आरोपीचे मुले, मेहुणी आणि सासू


पत्नी व मुलांची हत्या करण्यापूर्वी अलोक अमिषाच्या घरी आला होता. अलोक घरात शिरताच आमिषाने तिच्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग ॲप सुरू केले. त्यामुळे आमिषावर शारीरिक अत्याचार करण्यापूर्वी तसेच नंतर आरोपी अलोक व अमिषा मधील वाद, त्यानंतर त्याने तिची आणि तिच्या आईची केलेली हत्या. या संपूर्ण घटनाक्रम दरम्यान झालेले या तिघांमधील वाद, आरोप, प्रत्यारोप, किंकाळ्या,आवाज हे सर्व आमिषाच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. हे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्याने संपूर्ण हत्याकांड उलगडले. 




ऑनलाईन चाकू सेट खरेदी


अलोकने या हत्याकांडाचा कट आधीच शांत दिमागाने रचला होता, हे आता उघडकीस आले आहे. याची पुष्टी देणारा महत्त्वाचा पुरावा देखील पोलिसांच्या हाती   लागला आहे. आरोपी आलोकने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून चाकूचा एक सेट मागवला होता. यामध्ये विविध प्रकारचे चाकू होते. त्याने घरगुती वापर करायचा आहे, असा उददेश सांगून आपल्या मुलीच्या नावावर हा चाकूचा सेट मागविला होता. तीन दिवसापूर्वीच त्याची डिलिव्हरी त्याला मिळाली होती. या सेट मधील एक धारदार चाकू अलोकने त्याची पत्नी, मेहुणी आणि सासूचा गळा चिरण्यासाठी वापरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.




सासरे बचावले


जुन्या नारायणराव निमजे चाळीत वृद्ध देवीदास बोबडे व त्यांचा परिवार दुसऱ्या माळ्यावर एका छोट्या खोलीत भाड्याने राहतात. बोबडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते कामावर निघून गेले होते. पोलीस सूत्रानुसार, बोबडे यांना दारूचे खूपच व्यसन आहे. सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास दारूच्या नशेतच ते घरात शिरले होते. पत्नी आणि मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना देखील त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्यावेळी पोलीस बोबडे यांच्या घरी दाखल झाले, त्यावेळी त्यांची नशा उतरली. या हत्याकांड बाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. बोबडे हे घराबाहेर असल्याने ते क्रूरकर्मा अलोकच्या तावडीतून बचावले. 



परिसरात गर्दी


या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सारंग आवाड, उपायुक्त लोहित मतानी, तसेच तहसील, अंबाझरी, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावलीचे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पंचनामे करून दुपारी चार वाजताच्या सुमारास  पाच पीडित आणि आरोपी यांचे मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मेयोत पाठविले. तपासणी अहवाल आल्यानंतर हत्याचे गूढ आणखी उकलणार. दरम्यान या हत्याकांडची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात बघेकऱ्यांनी गर्दी केली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना तगडा बंदोबस्त  लावला होता.




क्षणभराच्या रागातून एका क्षणात अवघे हसरे, सुखी कुटुंब आरोपीने संपविले. अलोकने स्वतःच्या कष्टाने फुलविलेला संसार एका संतापाच्या लाटेत नष्ट केला. या घटनेत दोन निष्पाप मुलांचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




टिप्पण्या