Milkha singh: "अकोल्याच्या मातीतून मिल्खा सिंग तयार व्हावेत "- मिल्खा सिंग यांनी अकोल्यात बोलून दाखवली होती त्यांची इच्छा

Akola 2015:Milkha Singh:Vasant Desai sport complex



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड


भारताचे महान धावपटू आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील पीजीआई रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी रात्री मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते. 



दरम्यान, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर चंडीगढ़ सेक्टर आठ स्थित घरी आणले. मिल्खा सिंग यांच्यावर शनिवारी दुपारी नंतर सेक्टर-25 येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या चाहत्यांना अंतिम दर्शन घेता येणार आहे.


पांच दिवसात आई आणि वडील दोघेही गेले


मिल्खा सिंग यांच्या  निधनानंतर त्यांचा मुलगा  व अंतरराष्ट्रीय गोल्फर जीव मिल्खा सिंह यांनी सांगितले की, माझ्या वडिलांचे   निधन रात्री 11.30 वाजताच्या सुमारास झाले. शुक्रवारी त्यांनी आपल्या जीवनासाठी खूप संघर्ष केला मात्र देवाची मर्जी काही वेगळी असते. हे खरे प्रेम आणि सहवास होता की, पांच दिवसात आई आणि वडील दोघेही गेले. आम्ही पीजीआई  डॉक्टरांचे साहसिक प्रयत्न आणि विश्वभरातून मिळालेले प्रेम आणि प्रार्थना यासाठी आभारी आहोत.



आठवण: मिल्खा सिंग यांचे अकोल्यात आगमन

      फोटो सौजन्य:प्रभजित बछेर


जानेवारी 2015 मध्ये मिल्खा सिंह अकोला (विदर्भ) येथे आय एम ए आयोजित वाकथॉन स्पर्धा निम्मित आले होते.  हजारो अकोलेकरांच्या मनात त्यांच्या आठवणी कायम घर करून आहेत. अकोल्याच्या मातीतून मिल्खा सिंग तयार व्हावेत, असे त्यांनी अकोलेकरांना संबोधित करताना म्हंटले होते.




काय म्हणाले होते मिल्खा सिंग


क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न हा मानाचा पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला देण्यात आला. त्याला माझा विरोध नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून या पुरस्कारासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद हेच पहिले दावेदार होते, असे मत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांनी एका विशेष मुलाखतीत अकोला येथे व्यक्त केले होते. 


सचिनला भारतरत्न देण्याबाबत माझी काहीच हरकत नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून जर भारतरत्न पुरस्कार द्यायचाच होता तर सर्वप्रथम तो मेजर ध्यानचंद यांना द्यायला हवा होता. मेजर ध्यानचंद यांचे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सचिनला नंतरही हा पुरस्कार देता आला असता. भारतरत्न पुरस्कार देताना त्या व्यक्तीने देशाप्रती दिलेले योगदान बघणे गरजेचे आहे. कुणाचे किती योगदान आहे, यावर पुरस्काराचे मापदंड ठरायला हवे. त्या खेळाडूनचा देशाच्या क्रीडा क्षेत्रास किती फायदा झाला, हे बघणे गरजेचे आहे. केवळ खेळाडूची लोकप्रियता बघणे योग्य नाही. मी माझ्यावतीने मला भारतरत्न द्या, अशी मागणी कधीच करणार नाही; मात्र मी त्या पुरस्काराच्या योग्यतेचा आहे, असे शासनाला वाटले तर शासन मला पुरस्कार देईल. हे शासनाने ठरवायला हवे. मी माझ्याकडून कोणतीही मागणी करणार नाही. कोणत्याही खेळाडूने कधीच कोणत्या पुरस्काराची मागणी करू नये. आपण त्या पुरस्काराच्या योग्य असलो तर पुरस्कार मिळतातच. खेळाडूंनी खेळत राहायला हवे. पदकाची अपेक्षा असली तरी, तेच मूळ ध्येय असायला नको. खेळण्यामुळे विविध आजार दूर पळतात व आरोग्य चांगले राहते, असेही ते म्हणाले होते.



अकोल्याच्या मातीतून मिल्खा सिंग तयार व्हावे


संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे मिल्खा सिंग यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम होता. त्यावेळी अकोलेकरांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते की, "अकोल्यात खेळासाठी पोषक वातावरण आहे. या मातीतून मिल्खा सिंग तयार व्हावे,अशी माझी इच्छा आहे. माझे हे स्वप्न लवकर प्रत्यक्षात उतरावे."




मिल्खा सिंग यांचे हे बोल केवळ बातम्यांचे मथळे न राहता अकोल्यातून एक नव्हेतर हजारो मिल्खा सिंग तयार व्हावे, ज्या दिवशी अकोला मधून आंतरराष्ट्रीय धावपटू निर्माण होतील, त्याचदिवशी मिल्खा सिंग यांना खरी श्रद्धांजली अर्पण केल्या जाईल.  



रविवारी 11 जानेवारी 2015 रोजी मिल्खा सिंग आय एम ए आयोजित वाकथॉन स्पर्धेनिम्मित अकोल्यात आले होते. त्यावेळी मला त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा, बोलण्याचा, क्रीडा विषयावर चर्चा करण्याचा सुवर्ण योग जुळून आला होता. हे सुवर्ण क्षण माझ्यासाठी सुवर्णपदका पेक्षाही लाख मोलाचे आहेत. 












टिप्पण्या