IIT Delhi:latest news:corona test कोविड-19 साठी आयआयटी दिल्लीने विकसित केलेला रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी संच संजय धोत्रे यांनी केला जारी

              Sanjay Dhotre



नवी दिल्‍ली: आयआयटी दिल्लीने कोविड-19 साठी विकसित केलेला रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट संच केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज जारी केला. आयआयटी दिल्ली संशोधकांनी, संस्थेच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी केंद्राचे प्राध्यापक डॉ हरपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा संच विकसित केला आहे.




आयआयटी दिल्ली संशोधकांचे आणि उत्पादक भागीदारांचे अभिनंदन करत हे तंत्रज्ञान, देशात कोविड चाचण्या उपलब्धतेत क्रांतिकारी बदल घडवेल असा विश्वास संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. आयआयटी दिल्ली मध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून हा संच विकसित करण्यात आला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


प्राध्यापक हरपाल सिंग, डॉ दिनेश कुमार यांचे अभिनंदन करतानाच देशातच विकसित केलेले तंत्रज्ञान आणि देशातच निर्मित उत्पादनांचा वापर करून कोरोना विरोधातल्या लढ्यात आत्मनिर्भर होण्यासाठी देशाला सहाय्य करत असल्याबद्दल धोत्रे यांनी आयआयटी दिल्लीचे आभार मानले. कोरोना काळात चाचणी संच, व्हेंटीलेटर विकसित करण्यासाठी प्रोत्साहनासाठीच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी देशातल्या प्रमुख संस्थांची प्रशंसा केली. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी दिल्ली आयआयटीची प्रशंसा केली.   




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, संशोधन, विकास आणि नवोन्मेश याद्वारे आत्मनिर्भर भारत अभियानावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनावर केंद्रित केलेले लक्ष, पीएम रिसर्च फेलोशिप सारखे उपक्रम यामुळे देशात संशोधनाचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले. संपत्ती निर्मितीत तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका असते असे सांगून आयआयटी ही प्रमुख तंत्रज्ञान संस्था यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते असे ते म्हणाले.




प्रमुख संस्थांनी आपल्या परिसरातली संशोधन केंद्रे आणि इनोव्हेशन पार्क अधिक जोमाने कार्यरत ठेवावीत आणि उद्योग आणि शैक्षणिक संबंध कार्यान्वित करण्याचे आवाहन त्यांनी केले. जनतेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानी या विषयावर लेख लिहावेत आणि आणि इतर माध्यमांचाही आधार घेत सर्व सामान्य जनतेत व्याख्याने घेण्याबरोबरच लोकप्रिय विज्ञान फिक्शन आणि नॉन फिक्शन लिखाण करावे असे त्यांनी सुचवले. शालेय विद्यार्थी आणि परिसरातले आयआयटी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात नियमित संवाद राहावा यातून शाळकरी विद्यार्थ्यांची विज्ञान तंत्रज्ञानाची गोडी वाढेल असे ते म्हणाले.


आयआयटी दिल्लीने जुलै 2020 मध्ये 399 रुपयात आरटी-पीसीआर संच जारी केला यामुळे या संचाची किंमत कमी आण्यासाठी मदत झाल्याचे आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक व्ही रामगोपाळ राव यांनी यावेळी बोलताना सांगितले. आज जारी करण्यात आलेल्या संचामुळे ग्रामीण भागात निदान सुलभ आणि माफक दरात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


प्राध्यापक हरपाल सिंग यांनी आयसीएमआर प्रमाणित तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये सांगितली.


कोरोना विषाणू अ‍ॅन्टीजेनसाठी मोनोक्लोनल प्रतिपिंडावर आधारित ही क्रिया राहील. यातून प्राप्त झालेले परिणाम गुणात्मक आधारित असतील आणि अनुमान केवळ साध्या डोळ्यांनी लावता येईल. तंत्रज्ञान आणि उत्पादन हे पूर्णपणे स्वदेशी आहे.

टिप्पण्या