fungal bread: Food and Drug: म्युकर मायकोसीसचे भय; अन नामांकित बेकरीतील बुरशीजन्य ब्रेडची विक्री, अन्न व औषध प्रशासन गांभीर्याने कारवाई करणार का? अकोलेकरांचा सवाल






ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : सध्या कोरोना विषाणूचे भय लोकांमध्ये आहे. भरीसभर म्युकर मायकोसिसची लहर आल्याने त्याची धास्ती लोकांनी घेतली. बाहेरचे तयार खाद्यपदार्थ खाणे देखील बहुतांश नागरिकांनी बंद केले. मात्र, विश्वसनीय दुकान आणि ब्रॅण्डचे पदार्थ ग्राहक विश्वासाने खरेदी करीत आहेत. पण अशाच नामवंत व वर्षानुवर्षे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या बेकरीतील ब्रेडमुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा बसला आहे. शहरातील एका दुकानदाराने ग्राहकाला आनंद बेकरी निर्मित बुरशीजन्य ब्रेड विकल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (28 जून) समोर आली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे.




ब्रेडवर काळी बुरशी


शास्त्री नगरातील एका दुकानातून अश्विन श्यामकुमार लोहिया यांनी रविवारी आनंद बेकरीचे दोन ब्रेड पुडे विकत घेतले. याकरिता त्यांनी 24 रुपये मोजले. घरी आल्यावर लोहिया यांनी पुडे खोलले.मात्र, लोहिया यांना दोन्ही पुड्या मधील ब्रेडवर मोठ्या प्रमाणात काळी बुरशी आढळून आली. ब्रेड पुड्यावर निर्मिती तारीख,बॅच नंबर, किंमत आदी माहिती देखील दिसली नाही. याबाबत लोहिया यांनी आनंद बेकरीच्या मालक व संचालकासोबत संपर्क साधला असता, त्यांनी ब्रेड वर बुरशी येणे सामान्य बाब असल्याचे सहजपणे सांगून दुर्लक्ष केले. प्रकरण वाढल्यानंतर मात्र 'पैसे घेवून हे प्रकरण येथेच रफादफा करा', असे आनंद बेकरीच्या संचालकांनी म्हंटले असल्याचा आरोप लोहिया यांनी केला आहे. यानंतर लोहिया यांनी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे धाव घेतली. याबाबत तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. याबाबत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 



गांभीर्याने कारवाई होणार का?


म्युकर मायकोसिस आजार आणि खाद्य पदार्थचा थेट काही संबंध नसला तरी सामान्यांत सर्वच बुरशीजन्य वस्तू पासून म्युकरमायकोसिस होतो, अशी धारणा आहे. जर हे बुरशीजन्य ब्रेड कुणाच्या खाण्यात आले असते तर मोठा अनर्थ घडला असता. प्रसंगी जीवावरही बेतले असते. मात्र ब्रेडवर बुरशी येणे सामान्य बाब असल्याचे सांगत या प्रकरणी बेकरी संचालकांनी दुर्लक्ष केले. तर अन्न व औषध प्रशासन विभागाने देखील केवळ नियमित तक्रार समजून प्रकरण गांभीर्यने घेतले नाही. यापूर्वी देखील अकोल्यात एका नामवंत  पेढेवाला यांच्या प्रतिष्ठान मधील पदार्थात अळ्या दिसून आल्या होत्या. मात्र,अन्न व औषध प्रशासनाने थातूरमाथूर कारवाई करून प्रकरणाचा निपटारा केला होता. सध्या कोरोना काळात आरोग्य व स्वच्छताप्रती जनमाणसात जागृकता निर्माण झालेली आहे. अश्या वेळी अन्न व औषध प्रशासन विभाग या तक्रारीवर काय कारवाई करते, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. 


आरोग्य मंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री याकडे लक्ष देतील काय?

कोरोना विषाणूचा राज्यात कहर असताना आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,पालकमंत्री बच्चू कडू, स्थानिक लोकप्रतिनिधी हे या  प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील का? लोकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळणाऱ्या या बेजाबदार खाद्यपदार्थ विक्रेते आणि निर्मातावर शासन कठोर कारवाई करणार का, असे  एक ना अनेक प्रश्न अकोलेकरांनी उपस्थित केले आहेत.



नागरिकांनी घ्यावयाची काळजी


*शक्यतोवर बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे


*घरी बनवलेले ताजे अन्न व पदार्थ सेवन करावे


*पावसाळ्यात खाद्य पदार्थवर लवकर बुरशी तयार होत असल्याने शिळे अन्न खाणे टाळावे.


*हवाबंद व पॅकफूड खाणे टाळावे. विकत घेतल्यास पहिले चाचपणी करून मगच खावे.


*बाहेरून अन्न पदार्थ आणत असल्यास विकत घेताना त्यावरील निर्मिती व समाप्ती तारीख पाहावी. पाकिटावर माहिती अस्पष्ट असल्यास अथवा नसल्यास असे पदार्थ विकत घेवू नये.


*विकत घेतल्यावर पदार्थ खराब निघाल्यास विक्रेता, दुकानदार,निर्माता यांना याबाबत माहिती देवून अन्न व औषध प्रशासन विभाग कडे रीतसर तक्रार नोंदवावी.



टिप्पण्या