Fake call center: कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक; बनावट कॉल सेंटरवर पोलिसांची धाड, दोघे गजाआड


            प्रतिकात्मक/ संग्रहित छायाचित्र




ठळक मुद्दा

हे कॉल सेंटर उत्तर प्रदेशमधील काही संगणकतज्ज्ञ मंडळी आणि इतर २० जणांकडून चालविले जात होते.




डोंबिवली :  एमआयडीसीतील सीटी मॉल  पहिला मळ्यावर एका बनावट कॉल सेंटरवर नांदेड पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे शनिवारी धाड टाकली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २६ मोबाइल, लॅपटॉप, मोबाइल क्रमांकांची माहिती, असे एक लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


या सेंटर मधून दिनेश मनोहर चिंचकर (वय वर्ष ३१, रामदासवाडी, कल्याण), रोहित पांडुरंग शेरकर (वय वर्ष २८, काकाचा ढाबा जवळ, कल्याण पूर्व) या दोघांना पकडण्यात आले. इतर २० जणांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. 



अशी केली फसवणूक


हे कॉल सेंटर उत्तर प्रदेशमधील काही संगणकतज्ज्ञ मंडळी आणि इतर २० जणांकडून चालविले जात होते. ही टोळी नागरिकांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्याद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक करीत होते. या कॉल सेंटरमधून नांदेडमधील नागरिकांशी संपर्क साधून त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांना अगाऊ पैसे भरण्यास सांगितले होते. नागरिकांनी पैसे भरल्यानंतर कॉल सेंटरमधून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी  इतवारा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. 



असा झाला तपास


नांदेड सायबर विभागाच्या उपनिरीक्षक अनिता चव्हाण यांनी फसवणूक झालेल्या तक्रारदारांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केल्या नंतर, ते फोन डोंबिवली येथून येत असल्याचे निदर्शनात आले. चव्हाण यांनी लगेच कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्याआधारे त्यांनी डोंबिवलीतील सीटी मॉलमधील कॉल सेंटरवर पाळत ठेवली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉन आणि त्यांच्या पथकाने केंद्रावर परत पाळत ठेवली. या सेंटरमधून नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणाचे पाळेमूळे उत्तर प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्या दिशेने तपासाची चक्रे पोलिसांनी फिरविले आहे.दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्ती, फोन कॉल यापासून सावधान राहून, कोणतीही वयक्तिक माहिती देवू नये. तसेच कर्ज काढताना अधिकृत बँकेतून काढावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




टिप्पण्या