Crime news: Murder: aadesh aatote: भीमगीत गायक धम्मपाल उर्फ आदेश आटोटेची हत्या:आरोपी दीपकराज डोंगरेचाही मृत्यू, घटनेला प्रेम प्रकरणाची झालर!

           हत्याकांड मागील गूढ

        ॲड. नीलिमा शिंगणे-जगड






अकोला: मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास 35 वर्षीय युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. ही वार्ता वाऱ्याचा सारखी अवघ्या महाराष्ट्रात पसरली. कारण मृतक सामाजिक आणि गायन कला क्षेत्रातील नामवंत नाव. प्रसिद्ध भीमगीत गायक आणि इंडियन आयडॉलचा रनर अप धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे याची हत्या. या घटनेला प्रेम प्रकरणाची झालर असल्याचे बोलल्या जात आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक धम्मपाल उर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता, वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी सेलचा सक्रिय पदाधिकारी व भीमगीत गायक म्हणून प्रसिद्ध होता. तो मूळ मूर्तिजापूरचा होता. मात्र, व्यवसाय निम्मित सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. आदेश हा त्याच्या भाच्याच्या लग्नासाठी 29 जून रोजी आपल्या मूळगावी समशेरपूर येथे आला होता. आदेश मूर्तिजापूरला आल्याचे कळताच आरोपी दीपकराज डोंगरे (अंदाजे वय  55, रा. प्रतिक नगर, मूर्तिजापुर) हा 29 जून पासून धम्मपाल उर्फ आदेशचा काटा काढण्यासाठी त्याच्या मागावर होता.




29 जून रोजी धम्मपालला मारण्याची संधी मिळाली नसल्याने 30 जून रोजी सकाळीच दीपकराज डोंगरे याने धम्मपाल याला त्याच्या समशेरपूर येथील घरीच थेट गाठून, त्याच्या पोटात चाकूने व कोयत्याने वार केले. यातच धम्मपालचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचा मोठा भाऊ भांडण सोडवण्यासाठी मधात गेला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो देखील जखमी झाला. 




आरोपी दिपकराज डोंगरे हा सुद्धा  मारहाणीत गंभीर जखमी झाला. आरोपी डोंगरे याला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचाही मृत्यू झाला. आरोपी दीपकराज डोंगरे हा अक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होता. आरोपीचा देखील सामाजिक राजकीय क्षेत्रात वावर होता.



ही हत्या सामाजिक राजकीय चढाओढीतुन झाली असावी,असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तर या घटनेमागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान, सम्यक कार्यकर्ते व लोकप्रिय भीमगीत गायक आदेश आटोटे याची हत्या झाल्याने त्याच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.



प्रेमप्रकरणाची झालर

मृतक व आरोपीचे दोन्ही कुटुंब वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षात सक्रिय आहेत. मृतक आदेश व आरोपी दीपकराज याच्या मुलीमध्ये प्रेमाचे नाते होते. मात्र,आरोपी दीपकराज याला हे नाते मान्य नव्हते. यामधूनच हे हत्याकांड घडले असल्याचे समोर येत आहे.



आरोपींमध्ये वाढ होण्याची शक्यता


आरोपी दीपकराज समशेरपूला गेला तेव्हा त्याच्यासोबत आणखी काही साथीदार होते. दीपकराजने आदेशवर हल्ला करून, त्याला जागीच ठार केले. यानंतर  धम्मपाल उर्फ आदेशच्या नातेवाईकांनीही दिपकराज वर हल्ला चढविला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण झालेला एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंचे आरोपी वाढण्याची शक्यता आहे.  मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत .




टिप्पण्या