Coronavirus: Akola: Health: कोरोनाची लाट ओसरली असली तरी जनतेने काळजी घेणे गरजेचे; सौरभ कटियार यांचे प्रतिपादन




अकोला: संपूर्ण देशभरात गेल्या सोळा महिन्यांपासून थैमान घालीत असलेल्या कोरोनाची लाट सध्या ओसरली असली तरी नागरिकांनी तिस-या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने ख-या अर्थाने काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.



गेल्या सोळा महिन्यांपासून अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाने पाय पसरले होते. त्यामध्ये अनेक दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना तसेच वेळेवर उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करणा-यांना आपला जीव गमवावा लागला. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात सर्वत्र वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि मुखपट्टीचा वापर करणे या त्रिसूत्रींचा वापर करावा तसेच 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने लस टोचून घ्यावी, लस घेतल्यावर त्वरित घरी जाण्याची घाई करू नये, किमान अर्धा तास लसीकरणाच्या ठिकाणी थांबावे, कोणीही नियम मोडू नये, असे केल्यास आपल्या जीवावरही बेतू शकते, असे आवाहनही सौरभ कटियार यांनी केले आहे.



सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जाणा-या मजुरांचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत शेतमालकांनी एकाच वाहनातून जास्तीतजास्त शेतमजूर नेण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे कोरोनाला आणखी वाव मिळण्याची शक्यता असल्याचे सांगून कटियार म्हणाले, की शेतमजुरांनीही याची गंभीर दखल घ्यावी आणि गटागटाने शेतकामासाठी जाऊ नये. शेतात काम करतानाही त्रिसूत्रींचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




जिल्ह्यात सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे ग्रामीण भागात जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. त्यामध्ये साथीचे आजार, नियमित लसीकरण, कोरोना लसीकरण याकरिता ग्रामीण जनतेने आरोग्य विभागाला सहकार्य केले आहे येथून पुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे.




अकोला जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 'कोविशील्ड' आणि 'कोव्हॅक्सीन' या दोन्ही लसींच्या तब्बल 3 लाख 48 हजार 913 मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून 1 लाख 46 हजार 605 जणांनी या लसीकरणाचा लाभ घेतला असून, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीतील ग्रामीण रूग्णालये व उपजिल्हा रूग्णालयामध्ये आतापर्यंत 60 हजार 168 जणांनी या लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रांमधून 1 लाख 42 हजार 133 जणांनी या दोन्ही लसींचे डोस घेतले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागातील जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली आहे.


टिप्पण्या