Touktae cyclone:सिंधुदुर्गनगरी: वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे वादळात प्रचंड नुकसान; जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न, समुद्र खवळलेलाच




सिंधुदुर्गनगरी: प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार  18 मे 2021 रोजी ताशी 65 - 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 16 मे 2021 रोजी सकाळी 8 वा. पासून ते  17 मे 2021 रोजी सकाळी 8 पर्यंत 218 पुर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच 16 तारखेला जिल्ह्यात ताशी 80 ते 90 कि.मी. वेगाने वारे वाहत होते. अतिवृष्टी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारा व विद्युत पोल पडणे अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र सदर स्थिती पुर्ववत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.


16 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडून रस्ता बंद झाला होता. सदर झाडे उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून बाजूला काढू रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात वादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणमार्फत काल रात्रीच सुरू करण्यात आला आहे.


महावितरणच्या एकूण 447 उच्चदाब वाहिन्या वादळामुळे पडलेल्या होत्या. तसेच 812 लघुदाब वाहिन्यांचा पुरवठा वादळामुळे बंद पडलेला होता. कोविड रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या 6 डीसीएच पैकी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मिळूण एकूण 5 डीसीएचचा, वादळामुळे बंद पडलेला, विद्युत पुरवठा महावितरण मार्फत सुरू करण्यात आलेला आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या 8 डीसीएचसी पैकी 2 डीसीएचसी चा वादळामुळे बंद झालेला विद्युत पुरवठा महावितरण मार्फत सुरू करण्यात आला आहे. ज्या कोविड रुग्णालयांचा वीज पुरवठा अजून सुरू झालेला नाही त्यांचा विद्युत पुरवठा प्राधान्याने सुरू  करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी महावितरणला दिल्या आहेत. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे एकूण 31 विद्युत उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यापैकी 19 उपकेंद्र दुरुस्त करून विद्युत पुरवठा आज 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठाही अतिरिक्त मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न महावितरण कडून करण्यात येत आहेत.


चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. त्यामध्ये सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातील 13 रस्त्यांवर झाडे पडून रस्ते बंद झाले होते. हे सर्व रस्ते झाडे बाजूला करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तसेच कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील 15 रस्त्यांवरही झाडे पडली होती. हे रस्तेही वाहतुकीसाठी पुर्ववत झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णांकरिता आवश्यक असलेला ऑक्सिजनच्या वाहतुकीत कोणताही खंड न पडता चक्रीवादळाच्या काळातही व्यवस्थित सुरू राहीला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील 40 रस्त्यांवर झाडे पडली होती. हे रस्तेही आता वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 84 रस्ते झाडे पडल्यामुळे वाहतुकीस बंद झाले होते. त्यापैकी 69 रस्त्यांवरील वाहतुक सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.




मोठा तडाखा  सिंधुदुर्ग जिल्ह्याला

तोक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा  सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे या वादळात फार मोठे नुकसान झाले आहे  अशी माहिती  पालकमंत्री  उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची मदत तातडीने मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.


या वादळात जिल्ह्यातील मच्छीमार, आंबा व काजू बागायतदार  तसेच अन्य फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, कृषि, महसूल या विभागाने तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश आपण दिले आहेत. जिल्ह्यातील शाळा, कॉलेजच्या इमारतीचे नुकसान झाले असेल तर त्यांचेही पंचनामे करावेत अशा आपण सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही आपण चर्चा केली असून  कोकणासाठी विशेष मदत देण्यासाठी पत्रही लिहले आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील बहुतांश  विद्युत पोल पडल्यामुळे  विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह  दूरध्वनी आणि मोबाइल सेवा ठप्प झाल्या आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक वसाहती तसेच खाजगी गृहनिर्माण संस्थांमधील तसेच वैयक्तिक स्वरुपाची विद्युत पंपाचे पुरवठा खंडित असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्यभरातून 130 जणांची एकूण 13 पथके जिल्ह्यासाठी पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये बारामती, सातारा, कोल्हापूर सह रत्नागिरी येथील पथकांचाही समावेश आहे. त्याशिवाय तज्ज्ञ अभियंत्यांचे एक पथकही जिल्ह्यात लवकरच दाखल होणार असल्याची माहितीही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.




सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान


तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.  नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.


एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे 16 लक्ष 94 हजार 100 रुपये, 19 शाळांचे 8 लक्ष 75 हजार 707 रुपयांचे, 11 शासकीय इमारतींचे 1 लक्ष 70 हजार रुपयांचे, 13 शेडचे 1 लक्ष 10 हजार रुपयांचे 4 सभागृहांचे 6 लक्ष 16 हजार रुपयांचे आणि इतर 6 लक्ष 38 हजार 300 असे नुकसान झाले आहे.


जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची विभाग निहाय व तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे असून सर्व नुकसानीची माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.


दोडामार्ग - 44 घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये 43 घरांचे अंशतः व  एका घराचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 2 शांळांचेही नुकसान झाले असून 43 ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत. 43 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.


सावंतवाडी - 116 घरांचे अंशतः तर 4 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 13 गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 350 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून 100 विद्युत पोलही पडले आहेत. एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे.



वेंगुर्ला - 87 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद असून 6 गोठ्यांचे, एका शाळेचे, 3 शासकीय इमारतींचे, 45 विद्युत पोल आणि 2 विद्युत वाहिन्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.



कुडाळ - 302 घरांचे, 22 गोठ्यांचे, 7 शाळांचे, 2 शेडचे व 2 सभागृहांचे अंशतः नुकसान झाले असून 120 विद्युत पोलचे अंशतः नुकसान झाले आहे.



मालवण - 972 घरांचे अंशतः तर 7 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 25 गोठ्यांचे, 2 शाळांचे, 8 शासकीय इमारती, 157 विद्युत पोल, 10 शेडचे व एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. 412 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.


कणकवली - 133 घरांचे, 29 गोठ्यांचे, एका शाळेचे, 66 विद्युत पोल, 16 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.


देवगड - 145 घरांचे, 36 गोठ्यांचे, 4 शाळांचे, 132 विद्युत पोल, 95 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.


वैभववाडी - 262 घरांचे, 8 गोठ्यांचे, एका शाळेचे, 120 विद्युत पोल, 35 विद्युत वाहिन्या आणि एका शेडचे अंशतः नुकसान झाले आहे.


जिल्ह्यात एकूण 907 ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


 


तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटता महावितरणला


तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरित सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.



टिप्पण्या