Tauktae cyclone: तौक्ते चक्रीवादळ: वाऱ्याचा वेग अन पाऊस वाढणार; मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा

                बचाव व मदत





मुंबई, दि. १७ : राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदत कार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.




उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदत कार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.




उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदत करण्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.



मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा


ताऊक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.


रत्नागिरी  जिल्ह्यातील 3 हजार 896  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील  8 हजार  380  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. 



अलिबाग (रायगड)


ताउत्के चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.


या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी  9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.


 


जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.


 


तालुकानिहाय सविस्तर माहिती 


अलिबागमध्ये 22 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 24 मि.मी. असून, 156 कुटुंबातील 605 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


पेण मधील 1 घराचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 8 मि.मी. असून, 62 कुटुंबातील 193 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


मुरुड तालुक्यातील 5 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 32 मि.मी. इतकी आहे. 306 कुटुंबातील 1 हजार 67 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



पनवेल तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 50 मि.मी. इतके असून, 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


उरण तालुक्यातील 1 घराचे अंशतः नुकसान झाले असून, 1 व्यक्ती व 1 प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 27 मि.मी. आहे. 122 कुटुंबातील 451 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


कर्जत तालुक्यातील 17 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 80 मिमी. इतके असून, 48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



खालापूर तालुक्यातील 91 घराचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 12 मि.मी. इतके असून, 670 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



माणगाव तालुक्यातील 27 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 17 मि.मी. इतके असून, 291 कुटुंबातील 1 हजार 309 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



रोहा तालुक्यातील 10 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 19 मि.मी. इतके असून, 100 कुटुंबातील 523 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



सुधागड तालुक्यातील 20 घराचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 26 मि.मी. इतके असून असून, 45 कुटुंबातील 185 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



तळा तालुक्यातील 23 घराचे अंशत: नुकसान झाले असून, 1 घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 21 मि.मी. असून 36 कुटुंबातील 135 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



महाड तालुक्यातील 38 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 23 मि.मी. इतकी असून, 195 कुटुंबातील 1 हजार 80 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


पोलादपूर तालुक्यातील 96 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 व्यक्ती जखमी झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 41 मि.मी. इतके असून, 81 कुटुंबातील 295 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



म्हसळा तालुक्यातील 204 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 44 मि.मी. इतके असून, 134 कुटुंबातील 496 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.



श्रीवर्धन तालुक्यातील 335 घराचे अंशतः नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 48 मि.मी. इतके असून, 761 कुटुंबातील 1 हजार 158 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.




सिंधुदुर्गनगरी: चोवीस तासात अतिवृष्टी


ताउत्के चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 365 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 218 पूर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग - 250, सावंतवाडी - 265, वेंगुर्ला - 180, कुडाळ - 203, मालवण - 210, कणकवली - 192, देवगड - 199 आणि वैभववाडी - 149 या प्रमाणे पाऊस झाला आहे.




सिंधुदुर्गनगरी: दोन बोटी गेल्या वाहून;एका खलाशीचा मृत्यू,एक बेपत्ता


ताउत्के चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दीनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, रा.रत्नागिरी, विलास सुरेश राघव, रा. पुरळ - कळंबई, ता. देवगड, सूर्यकांत सायाजी सावंत, रा. हुंबरठ, ता. कणकवली हे सुखरूप बाहेर आले आहेत.



तीन खलाशी सुखरूप, चार गेले वाहून



याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दुपारी 3.30 वा. सुमारास आंनदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.



तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे कळाले.



पालघर: वाऱ्याचा वेग अन पाऊस वाढणार


वाऱ्याचा वेग व पाऊस वाढणार असून दुपारी भरती येणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.  पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. तसेच कच्च्या घरात असल्यास नजीकच्या जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या शाळेत आश्रय घ्यावा तसेच विजेच्या खांबापासून व झाडांपासून नागरिकांनी दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले आहे.



टिप्पण्या