Sunday stroke:पारा चढला: वाढता कोरोना अन तापत्या उन्हात पोलीस बजावत आहेत कर्तव्य चोख ; मूलभूत सुविधांचा अभाव


                         Photo:BAnews24





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : विदर्भात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाचा कहर. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत  देखील  पोलीस आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र, असे असतांनाही उन्हापासून संरक्षणासाठी त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही आहे. यामुळे वाढता कोरोना आणि तापते उन्ह या दोन्ही संकटांचा सामना सध्या पोलीस करीत असल्याचे दिसत आहे.



भन्नाट वेगाला आवर

मार्च ,एप्रिल आणि मे मध्ये तापमानात मोठी वाढ होते. सध्या कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी व्यवहार थंडावलेले दिसतात. मात्र काही महाभाग नियमांचे उल्लंघन करीत घराबाहेर पडतात. अश्या बेजबाबदार नागरिकांच्या भन्नाट वेगाला आणि कोरोनाला आवर घालणाऱ्या, नियमांचे पालन करून घेणाऱ्या पोलीस दादांची ही कर्मकहाणी. 



  नियमित कारवाई



                       


यावर्षी मार्च पासून उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट होती. विदर्भातील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती येथे सर्वधिक तापमानाची नोंद होत आहे. विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. अकोला शहराचे  तापमान गेल्या काही  दिवसांपासून ४२ डिग्री वर पोहचले आहे. तापत्या उन्हात वाहतूक पोलिसांना आपली कामगिरी करतांनाच त्यांना नियमित कारवाई सुद्धा करावीच लागते. मागील लॉकडाउनच्या काळात अकोल्यात विनाकारण फिरणाऱ्या ८५०० वाहनांवर कारवाई करत साडे पाच लाख दंड वसूल करण्यात आला होता. 



उड्डाणपूल निर्माण

                       Photo:BAnews24


कोरोनाच्या काळात अकोला पोलिसांना कोरोना सोबत उन्हासोबतही दोन हात करावे लागत आहे. त्यातच अकोला शहरामध्ये सध्या उड्डाण पूल आणि रस्ते निर्माण बांधकाम सुरू असल्याने वाहतूक पोलिसांचे संरक्षण शेडची सुविधा देखील कोलमडली आहे. तसेच अन्य मूलभूत सुविधा देखील पोलिसांना सध्या उपलब्ध नाहीत, अश्या स्थितीत देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस अधिकारी गजानन शेळके आणि त्यांचे सहकारी तटस्थ सेवा प्रदान करीत आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.



  


अकोल्यातील  पोलिसांची ही समस्या राज्यातील पोलिसांची व्यथा सांगणारी प्रातिनिधीक स्वरूप आहे.



टिप्पण्या